Thursday, April 24, 2008

आजी आणि अर्धविराम

परवाच आजीकडे गेले होते. आजी म्हणजे माझी एकदम मैत्रीणच आहे. चक्क ऑफिसला दांडी मारली आणि तिकडे गेले. तसंही ऑफिसमध्ये काम कमी झालंय. रजा फुकट जायची ती घेऊन टाकली. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली दमतेस किती? सतत इकडे तिकडे धावत असतेस? म्हटलं आजी, त्यातच मजा असते. घरी बसून काय करायचं? नुसतं बसून वेळ फुकट जातो काहीतरी करत राहिलं की वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान मिळतं.

तशी ती मला तिच्या आईची गोष्ट सांगायला लागली. तिची आई म्हणजे माझी पणजी. मी तिला फार पाहिलं नाही, पण तिची मला भीतीच जास्त वाटली होती. कारण मी होते तीन-चार वर्षांची आणि ती नव्वदीतली. आलवण नेसायची ती. बहुतेक आलवणंच म्हणतात त्याला. म्हणजे कोंकणातल्या विधवा बायका पूर्वी घालायच्या ना, तो साडीचा प्रकार. डोकं सतत झाकलेलं. त्या साडीचा तो विचित्र रंग. ती आली की रडायलाच लागायचे मी. तिची गोष्ट.

अगदी शंभर वर्षाची झाली तरी एकटी राहायची कोंकणातल्या तिच्या घरात. एवढं मोठं ते घर. लाकडी होतं. माडीवर चालायला लागलं की करकर वाजायची ती लाकडं. घरासमोरच एक दोणी होती. दोणी म्हणजे एकदम छोटासा हौद. मी तीन-चार वर्षाची असतानापण पुरती बुडायचे नाही इतका छोटा. आणि त्या दोणीवर नेहमी एक भला थोरला बेडूक यायचा. त्याची मात्र भीती वाटायची नाही. बेडूक आला की मी तिकडे धावायची आणि आई मागेमागे. अर्थात मला त्या बेडकाबद्दल कितीही प्रेम असलं तरी मला बघून तो पळूनच जायचा.

घरामागेच एक टेकडी होती. मामा तिथे मला फिरायला घेऊन जायचा. माझा मामा एवढा उंच. त्याच्यापुढे तर मी एकदमच छोटी दिसायचे. लाल तपकिरी माती असावी बहुतेक तिथे. नीटसं आठवत नाही, पण खूप मस्त जागा होती ती. कधी बंदरावर घेऊन जायचा. तिथला मासळीचा वास बिलकुल आवडायचा नाही मला. किती छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या कुठे रेकॉर्ड होऊन जातात डोक्यात कुणास ठाऊक? पणजी आजीची गोष्ट सांगता सांगता कुठे येऊन पोचले.?

तर अशी आमची ही पणजी आजी. तिला स्वस्थ बसवत नसे. सतत काहीनं काहीतरी करत राहायचं. विश्रांती माहीतच नाही. आणि पूर्वी कामंपण जास्त असतील, जात्यावर पीठ दळण्यापासून ते जमीन सारवणे, लिंपणे सगळं सगळं एकटीच करायची, अगदी शेवटपर्यंत. कुणी तिला सांगितलं की आजी थोडा आराम कर, तर ऐकायची नाही. शेवटी शेवटी तिला अल्झायमर झाला होता. जुनं आठवायचं, नवं आठवायचं नाही. आजीला पण ओळखायची नाही बऱ्याच वेळा. तेव्हा सतत म्हणत राहायची ती. जरा पाच मिनिटं आडवी होते. मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच गेलं तिचं. ते असं शेवटच्या दिवसात बाहेर आलं. म्हणायची मला कुणी पाच मिनिटं स्वस्थ बसू देत नाही.


मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून. कधी कधी काही लोकं आपल्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात. मला एकदम वॉटर पिक्चरमधली ती आजीबाई आठवून गेली. तिला लाडू खायचा असतो पण तिला शेवटपर्यंत तो मिळत नाही. त्यासाठीच ती जगत असते आणि लाडूचा एक घास गिळल्यावर सुखाने मरते. तसं काहीसं, खूप आत आत धक्का देणारं.


आजी म्हणाली, ऐक माझं. आता थोडे दिवस सगळं बंद कर, विश्रांती घे. शरीर दमतंच. आपण समजावत राहतो स्वतःला की मी दमत नाही. माझी शक्ती अफाट आहे म्हणून. ताबडवत राहतो आपल्याच शरीराला. तसं करू नकोस. म्हणाली एक अर्धविराम घे. मॅट्रिकसुद्धा न झालेली माझी आजी. कसे चपखल शब्द वापरते. अर्धविराम. कुणी शिकवलं असेल तिला?


म्हणूनच, सगळ्या आवांतर ऍक्टिव्हीटीज काही दिवस बंद करायचं ठरवलंय. ह्या महिन्याच्या नाटकात मी म्युसिक करणार होते. त्यांनाही नाही सांगून टाकल. हा ब्लॉगही अवांतरच नाही का? मग इथेही एक पॉज घ्यायचं ठरवलंय. किती शक्य होतं ते माहीत नाही. पण प्रयत्न करून बघेन. इथे लिहिण्याचं व्यसनच लागलंय मला. पण तरीही. त्यामुळे पुढची भेट कदाचित मी पुण्याला गेल्यावरच होईल. कदाचित नाहीही. कारण तिथे काँप्युटर नाहीच आहे. ऑफिसमध्ये आहे, पण तिथे मराठी लिहिता येईल असं नाही. नव्या ऑफिसमध्ये सुरवातीला का होईना काम करण्याचं सोंग घ्यावं लागेल. त्यामुळे तसंही जमेलसं वाटत नाही. त्यामुळे माझा हा अर्धविराम.

पुन्हा भेटूच;

कधीतरी.

Thursday, April 17, 2008

सेंड ऑफ, समुद्र आणि पूर्व"पुण्या"ई

सध्या धमाल चालली आहे. मी पुण्याला जाणार हे लोकांनी फारच मनावर घेतलेलं आहे. ऑफिसमध्ये ठीक आहे पण माझ्या इथल्या मैत्रिणी, आमचे शेजारी, एवढंच काय? मामा, काका, आत्या, ह्या सगळ्यांनी असं ठरवूनच टाकलंय की आता मी पुण्याला गेले म्हणजे गेलेच. परत यायचे काही चान्सेस नाहीत. त्यामुळे सेंड ऑफ्स चाललेत सध्या. आणि त्याबरोबर मिळणारी आवडती गोष्ट म्हणजे गिफ्ट्स. अर्थात बऱ्याच जणांनी तारखा बुक करून ठेवल्यात त्याच्यामुळे अजून काही विशेष हाती लागलं नाहीये. पण येत्या काही आठवड्यात नको असलेली बरीचशी आणि हवी असलेली थोडीशी अशी गिफ्ट्स मिळणार आहेत.

हल्ली माझं सकाळी फिरणं पुरतं बंद झालेलं आहे, त्यामुळे आमच्या आजी आजोबा ग्रुपची भेट होत नाही. पण मुद्दाम त्यांना सांगायला म्हणून सोमवारी पॉइंटाला गेले. सगळ्यांना खूप आनंद झाला. जग्गूंना तर खूपच. त्यांनी तर एकदम मस्त प्लॅन ठरवलाय. चौपाटीला मफतलाल बाथ आहे ना, तिथे मला ब्रेकफास्ट ट्रीट आहे.

तिथला जिलबी फाफडा म्हणजे फर्स्ट क्लास. मी शाळेत होते ना? तेव्हा बाबा मला आणि विन्याला घेऊन सायकलिंगला यायचा. आणि घरी जाता जाता मफतलाल मध्ये थांबून जिलबी आणि फाफडा. आणि त्याच्यावर कडी म्हणजे नीरा. असलं काँबिनेशन फक्त बाबाच जाणे आणि आम्ही त्याचेच चेले, मग काय?

घरी येता येता उशीर झाला. उगाचच जरा समुद्रावर रेंगाळले. खरंतर समुद्राकडे बघत मी अख्खा दिवस घालवू शकेन. समुद्र आहेच तसा. सखा, सोबती, फ़्रेंड अँड फिलॉसॉफर. माझे कित्येक प्रॉब्लेम्स समुद्राने सोडवलेत. सीए चा अभ्यास करता करता कोणत्याही वेळी, अगदी टळटळीत दुपारी सुद्धा मी आलेय इथे. किती वेळा मुरूडला त्याच्या बाहूपाशात रमलेय, त्याचं ते अंजारणं, गोंजारणं, कधीकधी चिडून एखादा फटका मारणं, त्याचं ते संध्याकाळचं नयनरम्य रूप. खवळलेला तो, धीरगंभीर तो, मुलायम तो, रंगेल तो, रगेल तो. आयुष्याचा सोबती कसा हवा? समुद्रासारखा.

तो खारा वारा अंगावर घेत बसून राहायचं. एकदम फ्रेश वाटतं. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतात. पुण्याला हा माझा सखा नसेल.

गाण्याच्या बाईंना फोन केला. तसंही मी त्यांच्याकडे जाणं जवळजवळ बंदच केलं होतं पण फोन, कधीमधी भेट चालूच असते. त्या एकदम खूश झाल्या. त्या म्हणाल्या बरं आहे, तुझं नाटक सुटेल आता. तानपुरा घेऊन जा तिथे. तिथल्या एका प्रसिद्ध गुरुंना त्या माझ्यासाठी सांगणार आहेत. त्यांच्याकडे गाणं शिकायचं म्हणजे ड्रीम कम ट्रू आहे खरंतर. माझ्यापेक्षा बाबाला जास्त आनंद होईल कारण तो तर त्यांचा नंबर वन फॅन आहे. बघूया कसं जमतं ते.

आणि हल्ली माझे कुकिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. रोज संध्याकाळी आईबाईंच्या शाळेत आमची हजेरी असते. हळूहळू पोळ्या गोल व्हायला लागल्यात. मीठ, तिखटाची समज यायला लागली आहे. मी आईला म्हटलं, आई, समज विनय गेला असता पुण्याला, शिकवलं असतंसं काय त्याला? तर म्हणाली, तो म्हणाला असता तर शिकवलं असतं. पण तो वेगळा आणि तू वेगळी.

म्हटलं काय वेगळं आहे? मला अजिबात पटत नाही हे. सगळे सारखेच ना. उद्या विन्याचं लग्न झाल्यावर तो काय घरात तंगड्या वर करून बसून राहणार? त्याला नको यायला हे सगळं. मलाही यायला पाहिजे हे मान्य, पण कायदा सगळ्यांना सारखा नको का? हे मला तिचं पटत नाही आणि तिला माझं. आईला खरंतर एक बाई म्हणून माझं म्हणणं पटलं पाहिजे. पण आमच्याकडे उलट आहे. बाबाला पटतं. खरंतर तो मी म्हटलेलं काहीही पटवून घेतो, हेही खरंच. कितीही पटलं नाही तरी.

म्हणाली, उद्या तुझं लग्न होईल तेव्हा तर शिकायला लागेलच ना? हं. गाडी आली परत रुळावर. पण माझी पूर्वपुण्याई (की पूर्व"पुण्या"ई?) थोर म्हणून काही दिवस तरी गाडी यार्डातच राहील.

एकंदरीत काय तर सध्या ऑफिसमध्ये काम कमी होत चालल्यामुळे मजा, घरी कौतुक होतंय म्हणून मजा. सगळी मजा. पण कुठेतरी काहीतरी आतमध्ये जळतंय, सगळ्यांच्याच. माझ्याही. नव्या जगाची भीती, जुनं सोडायची हुरहूर. कदाचित लग्न होताना पण असंच वाटत असेल. नक्की. पण सध्या लगीन नव्या नोकरीच, मग जमलं तर माझं...

- संवादिनी

Thursday, April 10, 2008

नोकरी आणि भिजलेली रात्र

मिळाली. शेवटी मिळालीच.

गेल्या आठवड्यात लिहिलं नाही, पण नव्या नोकरीची बोलणी जवळ जवळ जमत आलेली होती. ह्या आठवड्यात ऑफर लेटर आलं. खूप छान वाटतंय. म्हणजे दहादा नाही ऐकल्यावर, दोन तीन वेळा नाही म्हटल्यावर, हो ऐकून, हो म्हणायचा आनंद काही वेगळाच असतो ना? तसा काहीसा आनंद झालाय मला.

कालच ऑफिसमध्ये सांगितलं. आमचा बुटकोबा तर एकदम सेंटीच झाला. म्हणाला, अभी मेरेसाथ कॉफी पिने कौन जायेगा? तशी काय मी त्याच्याबरोबर रोज नाही जायचे पण कधी कधी खूप वैताग आला सगळ्याचा की मला घेऊन जायचा कॉफी प्यायला. सगळ्या जगाला शिव्या घालायचा आणि मग शांत व्हायचा. त्याला माहीत होतं की मी इथली गोष्ट कधीही तिथे करणार नाही. आपल्याला काय, फुकट ते पौष्टिक. कॉफी आणि ऑफिसच्या पॉलिटिक्सचं ज्ञान फुकट कोण नाही म्हणेल?

त्याला सांगितलं, मग डिपार्टमेंट हेड कडे जाऊन रीतसर राजीनामा वगैरे दिला. आपण कुणीतरी मोठ्ठे झालोत असं वाटलं. त्यांनी विचारलं का चाललीस. काय उत्तर द्यायचं? का चालले? सूख खुपलं? अहं, असं काही मी बोलले नाही. मी सांगितलं, पगार चांगला आहे. आपली कंपनी पण छान आहे, पण तेवढा पगार नसता मिळाला म्हणून सोडतेय. खोटंच सांगितलं. पगार चांगला आहे, पण पगारासाठी नाही मी नोकरी सोडली. माझं आभाळ शोधण्यासाठी सोडली.

मग सगळ्या ऑफिसमध्ये बातमी पसरली. एकेक फोन यायला लागले. त्याचाही आला. मिशीवाल्याचा. ऑल द बेस्ट म्हणाला. काहीबाही बोलत गेला. पण त्याचं बोलणं काही डोक्यात गेलंच नाही. फक्त तो बोलत असल्याचा फील.

नेहमीची टेप लावायची. कुठली कंपनी, काय रोल, कुठलं शहर? मग पुणं म्हणून सांगितलं की मग तू एकटी राहणार? आमच्यासाठीपण बघा ना काहीतरी नव्या कंपनीत, इथपर्यंतच्या गप्पा. दिवस मोठा मजेत गेला.

घरी जायला निघाले, तेव्हा मात्र हुरहूर लागली. बरोबर पाच आठवडे राहिले. पाच आठवड्यांनंतर मी ह्या इथे येणार नाही. कुठेतरी दुसरीकडे जाईन. पण जग बदलणार नाही. तसंच राहील. लोकं ऑफिसात येतील, आपली कामं करतील आणि घरी जातील. मी मात्र इथे नसेन. माझा डेस्कही असेल, कॉमही असेल आणि तिथे दुसरंच कुणीतरी? छे, ही कल्पनाच असह्य आहे.

घरी पोचले. कालपासून घरी तशी शांतताच आहे. मी पुण्याला जाणार महिन्यांनी म्हणून. बाबाला मी म्हटलं, काय शोकसप्ताह वगैरे साजरा करताय का? नुसताच हसला. तो असा हसला ना की मला खूप वाईट वाटतं. खूप बिचारा वाटतो तो. बाबा. मुलगी जायला तर नकोय पण अडवायचं पण नाहीये अशी काहीशी हतबलता. काहीच बोलला नाही. मग मीच मुघल ए आझम ची सीडी लावली. ऐकत राहिला डोळे मिटून.

कधी नव्हे ते आत जाऊन आईला मदत केली थोडी. बाबापेक्षा आई ठीक वाटली. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलंय की मी जाणारे म्हणून. मग पोळ्या लाटल्या. अर्ध्या आईने पुन्हा लाटल्या. पण आमटी मात्र मीच बनवली. आता माझा स्वैपाक मलाच करायला लागेल ना ह्यापुढे?

आणि आज चक्क मी बनवलेल्या आमटीचं विन्यानी तोंडभरून कौतुक केलं. जेवणं झाली. नेहमीच्या गप्पा काही रंगल्या नाहीत. बाबा तर गप्प गप्पच होता. विन्या फुटकळ बोलत होता पण त्यालाही म्हणावा तसा उत्साह नव्हता. आई तर काय कामातच असते नेहमी ती तशी होतीच.

झोपायच्या आधी देवाला नमस्कार करायला गेले. म्हटलं बरोबर निर्णय घेतलाय ना? मला कोण उत्तर देणार? पाठी विन्या उभा होता. म्हणाला ताई तू आता अतिरेकी होणार पुण्याला जाऊन. आता मी कुणाशी भांडणार? कुणाच्या कुरापती काढणार? आय विल मिस यू यार.

आय विल मिस यू टू.

बिछान्यावर पडले तर झोप लागेना. खूप रडायला आलं. खूप खूप. सगळं आठवलं, माझा रिसल्ट, सेलेब्रेशन. बाबा तर अक्षरशः नाचला होता. आईच्या कंपनीत नोकरी, वेगळी वेगळी ऑफिसेस, आमचा बुटकोबा, मोठे सर, नवखी मी, रुळलेली मी, निराश मी, उत्साही मी, माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेय ही नोकरी. आणि तीच कापून दूर करायची?

पूर्ण रात्र भिजून निघाली.

- संवादिनी

Wednesday, April 2, 2008

मी आणि पिंपळपान

मी का लिहिते?

.....................................................................................

ऐलतीराच्या कुशीला, माझ्या काळजाचा ठाव
उगवतीच्या दिशेला, माझा जीवलग गाव

तिथे सोनेरी सकाळ, चढे चंदेरी दुपार
मन फिरे रानोमाळ, नाही काळजी चकार

बाबा मोठा तालेवार, त्याचा चिरेबंदी वाडा
माय मायेची फुंकर, दारी प्राजक्ताचा सडा

दृष्ट पडावी कुणाची, असा सखा भाऊराया
चौकोनी गुणांची, माझ्या वाड्याची हो माया

वाड्याच्या अंगणाला, आहे पिंपळाचं धन
आल्या गेल्या दिवसाला, एक पिंपळाचं पान

चोपडीत हो सारीलं, एक पिंपळाचं पान
एक पिंपळाचं पान, माझं तन मन धन

.....................................................................................

कदाचित माझं लिहिणं म्हणजे पिंपळपानं जपण्याची गरज असेल. हातात असलेलं निसटून चाललंय ही हतबलता असेल. मुठीत वाळू कधीच राहत नाही मला माहितेय. प्रयत्न वाळू पकडण्याचा नाहीये. प्रयत्न कधीतरी वाळू हातात होती ह्याची आठवण ठेवण्याचा आहे.

मी मनात येईल ते इथे लिहिते, कारण खऱ्या आयुष्यात खरं आणि स्पष्ट बोलण्याची ताकद माझ्यात नाही. मग भागवून घेते एक हौस, खरंखुरं बोलण्याची, प्रांजळ बिंजळ लिहिण्याची.

ही गरज शब्दात पकडणं कठीण आहे. कलाकाराला अव्यक्त राहण्यासारखी शिक्षा नाही. अव्यक्त व्यक्त करण्याची गरज म्हणून मी लिहिते. पण गंमत अशी की अव्यक्त ते व्यक्त करण्याच्या भानगडीत मी स्वतः अधिकाधिक अव्यक्त होत जातेय. कोंबडी आधी की अंडं? मी की माझ्या आयुष्यातलं अव्यक्त? माझ्यासाठी मी गौण आहे. माझ्या आयुष्यातलं अव्यक्त महत्त्वाचं आहे, म्हणून लिहिते, स्वतःला संवादिनीच्या सुरात लपवून.

उद्या खरंच भविष्य आलं वर्तमानात, तर उघडेन मी माझी चोपडी आणि पाहीन माझ्या गावातल्या पिंपळाचं विटलेलं, जराजर्जर पिंपळपान. हिरवेपणा हरवला असेल कदाचित पण तिथल्या सोनेरी सकाळी, चंदेरी दुपारी, चिरेबंदी वाडा आणि प्राजक्ताचा सडा तरी नक्कीच दिसतील त्या पानाच्या वृद्ध शिरांमध्ये.

कुठेतरी एखादी हास्याची लकेर, कुठे डोळ्यात ओघळलेला एखादा अश्रू, कुठे एखादा जमलेला मालकंस, एखादा विश्वासघातकी ब्रूटस, कधी एवढं एवढंसं झालेलं मन, हे सगळे हायलाईटस आहेत माझ्या आयुष्याचे. ते रेकॉर्ड करून ठेवावे आणि कधी निवांत रिप्ले करून बघता यावेत, म्हणून लिहिते. मी कशी आहे ह्याची आठवण व्यवहारी जगात कुठे गेलीच हरवून, तर ती इथे सापडेल, म्हणून मी लिहिते.

पण नकळतंच ह्या लिहिण्याला नवी किनार प्राप्त झालेय. कुणीतरी ते वाचण्याची. लिहिण्याला सुरुवात केली तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की कुणी हे वाचेल. कुठल्यातरी गजबजलेल्या हिडीस शहरातल्या एका कोपऱ्यातल्या खुराड्यात घडणारी गोष्ट, कुणाला वाचावीशी वाटते, बरं वाटतं. एका कोणत्याही सामान्य कुटुंबासारखं असावं असं आमचं कुटुंव. त्यातल्या आईला, विन्याला, बाबाला आणि मलादेखील थोडं ग्लॅमर प्राप्त होतं ह्या ब्लॉगवर म्हणून लिहिते.

अगदी जसं घडतं तसं. माझ्या गावातल्या पिंपळाच्या पानासारखं.

माझा खो यशोधराला

आणि मला खो दिल्याबद्धल थँक यू गं, जास्वंदी!

- संवादिनी