Thursday, March 5, 2009

स्वप्नांच्या गावा

हल्ली भन्नाट स्वप्न पडायला लागलीत.

भन्नाट म्हणजे भन्नाटंच. मला वाटतं आपण जितका अधिक विचार करतो तितकी स्वप्न जास्त आणि मनोरंजक पडत असावीत. आता माझंच बघा. मला कधी म्हणजे कधी स्वप्न पडायची नाहीत. रात्री बिछान्यावर पडल्यावर डोळा लागला की सकाळी आईची कातावलेली दुसरी किंवा तिसरी हाक ऐकू येईपर्यंत काहीही कळत नसे. झोपणे ही आयुष्यातली एकमेव आनंददायक घटना असायची, कारण दिवस सगळा कामात जायचा. ऑफिस आणि काही अंगावर घेतलेल्या तर बऱ्याचशा अंगावर पडलेल्या अनंत ऍक्टिव्हीटीज. जीव इतका दमून जायचा की झोपायचा जो वेळ आहे तो स्वप्नातही फुकट घालवायची कल्पना मी कधी केली नव्हती.

पण सध्या सगळाच आनंदी आनंद गडे आहे. काम यथा तथाच आहे. गोऱ्यांच्या देशात जर मला सर्वाधिक काही आवडत असेल तर कामाच्या वेळा. आठ म्हणजे आठला हजर आणि पाच म्हणजे पाचाला फुटास्को. त्यातही डोक्यावर कामाचा डोंगर आहे असं नाही. सगळ्या प्रकारचा वेळकाढूपणा केल्यावरही काम संपवायला भरपूर वेळ असतो. चकाट्या पिटायला ऑफिसात कोणी नाही, अपार्टमेंटवर एकटीच. मग करायचं काय? टी. व्ही? मला फारसा आवडत नाही. मग काय करायचं? विचार करायचा. कशाचा? कशाचाही? अगदी रस्त्यावरून चाललेल्या माणसाच्या डोक्यात काय चाललंय इथपासून सेम दिसणाऱ्या गाड्यांच्या किमतीत इतका फरक का पडतो इथपर्यंत काहीही.

मूळ लिहायचं होतं ते राहिलंच. तर स्वप्न पडतात. आणि त्याची आठवण का झाली तर कुणीतरी मला एक ऑनलाईन सर्व्हे पाठवला, स्वप्नांवरती. त्यात एक प्रश्न होता तुम्हाला कुणाची स्वप्न पडावीशी वाटतात? उत्तर, नवऱ्याची. तुम्हाला त्या व्यक्तीची स्वप्न पडतात का? उत्तर, अजिबात नाही. आपल्याला हवी ती स्वप्न का नाही पडू शकत आपल्याला? काही गोष्टी सत्यात शक्य नसतात स्वप्नात तरी व्हाव्यात की नाही?

आता माला वाटतं माझ्या नवऱ्याने माझ्या गाण्याचं कौतुक करावं. पण आमचे साहेब आलाप सुरू झाले की जांभया द्यायला लागतात. आता गेलाबाजार पडलं एखादं स्वप्न की ज्यात मी जोरजोरात गातेय आणि साहेब मनापासून दाद देतायत तर काय हरकत आहे? पण असलं काहीही स्वप्न न पडता मला काय स्वप्न पडावं?

मला ऑफिसला जायला उशीर झालाय मी धावत पळत माझ्या अपार्टमेंटमधून बाहेर पडते तर लिफ्ट बंद मग एवढे प्रचंड मजले उतरून खाली येते तर आपली मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी उभी. (मुळात माझं ऑफिस पाच मिनिटावर चालत आणि तीन मिनिटांवर धावत असताना मी टॅक्सी का घेते हा वेगळा प्रश्न झाला) टॅक्सीवाला चक्क भाड्याला नाही म्हणतो. काहीच वाहन मिळत नसल्याने टेन्शन वाढ वाढ वाढतं. घामाघूम होते मी आणि ढँटडँ..... जाग येते.

ह्याला काही अर्थ आहे का? अजून एक आठवणारं स्वप्न म्हणजे मी बारमध्ये (मी आणि बारमधे? ) पंजाबी ड्रेस घालून एक पेय (कोणतं ते कळत नाही) पीत बसलेय. आणि काहीही करत नाहीये. पेय पितेय संपलं की रिफिल. बस.

पण सगळ्यात भन्नाट स्वप्न पडतायत ती भुतांची. ती मात्र पडली की मग झोप लागत नाही मग डोक्यावर पांघरूण घेऊन उशीखाली डोकं खुपसून रामरक्षा म्हणायला लागते झोप येईपर्यंत. इथले काही हॉरर कार्यक्रम बघितल्याचा परिणाम असेल. आणि एकटी असल्याने भीती अजून वाटते. मग उगाचच कोपऱ्यातलं रोपटं रात्रीच्या अंधारात कुणाच्यातरी नखं वाढलेल्या लांब हातासारखं दिसतं. किंवा वाऱ्याचा आवाज भुताच्या श्वासासारखा वाटतो. मग रामरक्षा आणि अजून रामरक्षा आणि अजून अजून रामरक्षा. रामाला लवकरच माझा कंटाळा येणारे.

कशी पडत असतील स्वप्न? मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणावं तर माझ्या मनी न वसणाऱ्यांचीच स्वप्न मला जास्त पडतात. ज्याला आपण घाबरतो त्याची स्वप्न पडावी तर थोडंफार खरं आहे.

हे सगळं लिहिताना एकदम आजीची आठवण झाली. आजी म्हणजे बाबाची आई. ती कधीच देवाघरी गेली. स्पष्ट आठवतंय ती एकदा सांगतानाचं, तिच्या स्वप्नाबद्दल. म्हणाली होती की एक खूप छान स्वप्न पडलं. डोंगर होते, दऱ्या होत्या, नद्या होत्या, डोंगरावरचे पांढरे शुभ्र ढग, त्यांच्या पाठचं निळं आकाश, हिरवे डोंगर, त्यातून वाहणारं नदीचं पाणी. मग म्हणाली मी जिथे उभी होते तिथे खूप फुलं होती. वेगवेगळ्या रंगांची आणि त्याला इतका छान वास येत होता. मग म्हणाली अजून तो वास मनात दरवळतोय.

इतकं छान स्वप्न? अगदी टुडी नाही थ्रीडी नाही फोरडी स्वप्न पडलं तिला. असं मला का पडू नये? फार कुठे बाहेर न पडलेल्या माझ्या आजीला स्वित्झरलंड ची स्वप्न पडावीत आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन आलेल्या मला त्याच्या जवळपासचही काही दिसू नये, असं का व्हावं? की ही एक प्रकारची क्रिएटिव्हीटी आहे. तिची कंस्ट्रक्टिव्ह असेल, माझी कदाचित डिस्ट्रक्टिव्ह किंवा न्युट्रल असेल.

कुणी सांगावं?

- संवादिनी

9 comments:

Yawning Dog said...

फारच सही ब्लॉग आहे - फुटास्को कसला डेडली शब्द आहे.

Bhagyashree said...

hehe sahi lihIlays.. asli dhinchyak swapna malahi padtat.. mi nakki lihnar ata tyavar !! :))

futasko malahi lay awdla!

me said...

wait swapn ! mostly pot bighadalyawar. acidity zalyawar kiwwa heavy diner zalyawar. pot rikame assel tar padatat, kiwwa bhutache karyakram pahun zopale tari padatat,diwasatun ekdach pan patkan manat yeun geleli wyakti patkan swapnat yete, khup diwasanpasun dabun thewalele wichar swapnat yetat ani ulagadalehi jatat! aapan diwasbhar aapalya dokyawar rajya karat asato, hawe te hawe titakech wichar yeun det asto ani tyawarach kaam karat asto, pan ratri, mendu tumachya hatatun sutato ani swatahachya rajyat tumhala gheun jato! diwasatun conciously utkatatene ekhadya goshticha wichar kelas tar ti swapnat yeu shakel! try! it might work! :)

Sneha said...

he he majhahi swapnachya babat asach kahich aahe.. kuchachya kuthe kadhi v4 kela nahit asali vichitra swapn agadi 4Dt sudhdha badhayala milatat... :( :P

(sadya ol nasates?)

सखी said...

स्वप्नांच्या गावांसारखे पोस्टस सुद्धा खुलतायत बरं :)
खरंच मस्त वाटलं वाचताना आणि होssss फ़ुटास्को खरंच डेडली वाटतोय :P
बाकी ते बारमधलं स्वप्नं वगैरे बेश्ट!!! ;)
मला पडलेली काही wild, weird, fukat सगळी स्वप्नं आठवली.

Innocent Warrior said...

chan lihile aahe.

Maithili said...

Hey chhan aahe post. phutasko shabd lay bhari aahe.
bar vaale swapn supperb!

संवादिनी said...

@ यॉनिंग डॉग - फुटास्को हा शब्द कुठल्यातरी नाटकातला आहे असं आठवतंय. नक्की कुठल्या ते माहीत नाही. पण आमच्या शाळेत अगदी रोजचा शब्द होता तो. तो शब्द इतका वेगळा आहे हे तुमच्या कमेंटस वाचल्यावरंच जाणवलं. बाकी मी तुझा ब्लॉगही वाचते आणि मला तो खूप आवडतो.

@ भाग्यश्री - कधी लिहितेयंस? लवकर लिही. मी वाट बघतेय.

@ मी - हं. तसंच असेल स्वप्नांच्या बाबतीत. सध्या विचारच विचार चाललाय म्हणून स्वप्नच स्वप्न पडत असतील. दिवसातून उत्कटतेने विचार केला तर त्याची स्वप्न मला बिलकुल पदत नाहीत, हे मात्र माझ्या बाबतीत खरं आहे.

@ स्नेहा - हीही, होना. स्वप्नातही दिसणार नाहीत असं ज्याबाबत वाटेल अशा गोष्टी चक्क दिसतात. ऑला नसते हल्ली. वाढलेलं काम हे त्याचं एक कारण आहे. दुसरं तू भेटलीस की सांगेन.

@ सखी - धन्यावाद. वाइल्ड आणि विअर्ड स्वप्न माहितेयत. पण फुकट स्वप्न हा काय प्रकार आहे? विकतंची दुखणी माहीत आहेत पण स्वप्नही?

@ वॉरिअर - धन्यवाद.

@ मैथिली - होना कस्लं विचित्र स्वप्न आहे ते. पुन्हा पडलं नाही पण. हेच नशीब.

Deep said...

आपल्याला बर्‍याचदा पडणारी स्वप्न ही आपल्या Fantasies वर अवलंबून असतात! आता तू स्वित्झरलंडला गेल्येस म्हणून कदाचित तुला नाही पडत तशी स्वप्न! हेच बघ ना: जस की तुला स्वप्नात मुंबईतली पिवळी काळी टॅक्सी दिसते ह्याअर्थी मनान तू मुंबईत आहेस. अगदी तसच बारमध्ये पंजाबी ड्रेस घालून एक पेय पीत बसलेय.>> हे स्वप्न तुला फारदा पडत असेल ना तर जाऊन ये ना एकदा बारमध्ये :) मी आणि बारमधे?>> हे काय? एवढं आश्चर्य? once in a blue moon जाव की ;)

मला काय असली स्वप्न पडत नाहीत ;) मी आपला फार पूर्वी एकच एक भयानक स्वप्न पहात आलेलो: मी रेल्वेनं प्रवास करतोय.. आणि गाडी पुलावरून खाली पाण्यात कोसळत्ये अन् एका क्षणात मी स्वर्गात... :(

बाकी बरीच गोड गोड स्वप्न पडत होती आधी आत्ता मात्र वास्तवाची प्रखर जाणिव झाली अन् तसली स्वप्न पडत नाहीत! बादवे मी ही लिहिन म्हणतो या स्वप्नांवर...