Thursday, February 26, 2009

एकलकोंड्याची गोष्ट

पहिला आठवडा सगळं बस्तान बसवण्यात गेला. शनिवारी रात्री पोचले. अर्थातच कंपनीने सगळी व्यवस्था केली होती. आणि दुसऱ्या वेळी येत असल्याने पहिल्या वेळी झालं तसं "धुंडो धुंडो रे" झालं नाही.

यंदा टॅक्सीवाला एकदम मस्त भेटला होता. इथिओपियन होता आणि रस्ताभर गप्पा मारत होता. आपणही किती रेसिस्ट असतो ना? काळा माणूस दिसला की उगागंच भीती वाटते. मला विचारत होता तू काय करतेस, तर सांगितलं त्याला. तसा म्हणाला पगार बरा मिळतो का? तर म्हटलं मला अलावन्स मिळतो. म्हणे किती? म्हटलं अमुक अमुक. तर म्हणे ते सोड टॅक्सी चालव ह्यात खूप पैसे आहेत. कपाळाला हात लावला. इथे आधीच लोकं कमी, त्यात मी टॅक्सी चालवायला लागले तर अजून काही देवाघरी धाडायचे.

तर रात्री हॉटेलवर पोचले. बाहेर जाऊन काही खायची इच्छा नव्हती. असं होईल हे माहीत असल्याने चक्क मॅगी घेऊन आले होते. शनिवार रात्र आणि रविवारची जेवणं मॅगीवरच झाली. सगळा दिवस झोपून काढला. फक्त ब्रेड आणि दूध आणायला गेले तेवढंच. माझी रूम विसाव्या मजल्यावर आहे. व्ह्यू मागच्यापेक्षा खूप छान आहे. पण एकटीला त्यात मजा वाटत नाही हेच खरं. तसे ऑफिसमधल्या काही लोकांना फोन केले. पण ते सगळे आपापल्या घरी असल्याने आणि माझं हॉटेल अगदी शहरात असल्याने भेट झाली नाही.

सोमवारी ऑफिसला गेले. कामाचा मूड नव्हताच. कॉफी आणखी कॉफी आणि आणखी आणखी कॉफी. एकटेपणा आणि व्यसन ह्यांची संगत अशीच होत असावी. एकटी नाहीये मी तसं. लोकं आहेत. पण आपल्या घरून आल्यावर कितीही लोकं असतील तरी एकटेपणा जाणवतोच.

रोज संध्याकाळी जॉगिंगचं सुरू केलंय. तेवढा टाइम पास होतो आणि व्यायामही. धावताना जो एक ऱ्हिदम मिळतो ना तो एकदम वेडावणारा आहे. इनटोक्सिकेटिंग हा शब्द जास्त योग्य वाटतो. सुरवातीला शरीराने नाही म्हणायचं, स्नायूंनी दुखायचं, श्वासाने भंजाळायचं, पण एकदा तो ऱ्हिदम मिळाला की मग सगळे शिस्तीत एका सुरात आणि एका तालात जणू गायला लागतात. दे बिकम वन टीम. माहीत नाही, पण मला ती स्टेज खूप आवडते. कानाला आयपॉड असेल तरी श्वास लख्ख ऐकू येतो. गाण्याचा ऱ्हिदम, श्वासांचा, पायांचा आणि विचारांचा सगळं एका पातळीवर येतं आणि विलक्षण आनंद मिळतो. अजून काही दिवस चालूदे हे मग बघूया माझं मत बदलतं का ते?

आणि एक सही काम झालं. इंटरनेटवर डिजीटल तानपुरा आणि तबला मिळाला, आता काँप्युटर लावून मस्त गाता येतं. जेट लॅग म्हणा किंवा आठवणी म्हणा रात्री झोपच येत नाही. ज्या दिवशी तानपुरा मिळाला, त्या रात्री अशीच झोप येत नव्हती. सगळ्या खिडक्या गच्च ओढून घेतल्या. एसी फुल चालू केला (थंडी नव्हती पण गाण्याचा त्रास दुसऱ्यांना होऊ न देण्याचा एक मार्ग म्हणजे दुसरा कसलातरी आवाज चालू करणे). मारवा घेतला. एकतर मध्यरात्रीची वेळ, त्याला साजेसा मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच.

सध्या भीमसेनांचं चरित्र वाचतेय. वाचताना असं जाणवतं की आपण किती अतिसामान्य आहोत. लहान वयात घर सोडून फक्त गाण्यासाठी पळून जाणं. गदगपासून जालंधरपर्यंत जाणं. स्वतःच्या हिमतीवर गाणं शिकणं. मग सवाई गंधर्वांच शिष्यत्व त्यात सोसलेले हाल केवळ गाण्यावरील प्रेमापोटी. असं आयुष्यात माणसाला काही ध्येय पाहिजे की ज्यापाठी त्यानं पागल व्हावं. वाचताना भान हरपून जातं. पंडितजी माझे खूप आवडते गायक आहेत, पण हे सगळं वाचल्यावर खरंतर माझे देवंच झालेत ते. नुसतं त्यांचं स्मरण केलं तरी माझं गाणं चांगलं होईल असं वाटतं.

असो, तर ह्या झाल्या माझ्या एकटेपणाच्या एकलकोंड्या गोष्टी. कशात ना कशात मन रमवत राहायचं दिवस घालवायचा. संध्याकाळ झाली आणि सूर्य नारायण मावळतीला परतायला लागले, झाडांच्या सावल्या लांबुडक्या व्हायला लागल्या की एक विलक्षण विषण्णता पसरते. आई बाबाची, नवऱ्याची खूप खूप आठवण येते. कधी रडायलाही येतं. पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे.

ह्या सर्वात एक नशा आहे. तो बोथट करतो आठवणी आणि देतो हुरूप नव्या दिवसाची वाट बघण्याचा.

- संवादिनी

10 comments:

Mahesh said...

ekdam sahi. esp. ...

"पण कधी धावता धावता स्वतःला दमवून, कधी सुरांच्या भुलभुलय्यामध्ये स्वतःला हरवून तर कधी पुस्तकांच्या छापील पानांत दडलेली प्रश्नांची उत्तरं शोधत दिवस घालवते आहे."

khup chhan.......keep blogging... :)

Sneha said...

hay sam.. vachun chan vatal pan kaa kon jane yaveles asa vataty .. amachya comments mule odhun tanun lihal aahes..(tula kala asav mala kay mhanayachay te)
baki mihi majha ekatepana ghalavanyasathi pustak vachat asate.. tujhyasarakh gata yet nahi chan ..( aani yav mhanun riyaj karayala lagale tar hostel madhun hakalavun detil)
paN it helps.. kashat tari gutavun ghyayach.. apan jevha guntavun ghyayach mhatalyavar guntat nahi pan aapalya manasanshivay aan ajun konavar prem karato mhanaje apalya aavdi..tyanch smaran karayach.. mag tu mhanates tas aathavani bothat hotat...

Deep said...

Sam,

पुन्हा एकदा जुनी संवादिनी दिसली :) असं वाटल क्षणभर पण ते क्षणभरच कारण, मेबी तू स्नेहानी म्हटल्याप्रमाणं जर अस लिहीत असशील तर ते फारच वाईट होईल कारण इथं जर तुला हव ते बोलायला मिळणार नसेल तर काय फायदा? कोणाला आपलं लिखाण एकसुरी वाटत असेल ह्या उद्देशाने जर तू हा चेंज केलेला असशील तर काय उपयोग? मला काय बोलाव ते खरच कळत नाहीये एकीकडे तुझी आजची पोस्ट वाचून मस्त वाटतय पण ते क्षणिकच!

वेल एक करशील का? लोकांच्या पोस्ट वरून अंदाज बांधून एडीटू नकोस! अस नसेल ही कदाचित पण तरीही!!


भीमसेन वाचत्येस? व्वा ग्रेट मी आत्ताच त्यांच "याचसाठी केला होता अट्टहास.. शेवटचा दिस गोड व्हावा" ऐकतोय :)

>> मारव्यासारखा धीरगंभीर राग. कोमल रे असा लागला की बस. चांगला एक तास मारवा गायले. ऐकायला कुणी नव्हतं पण स्वतःसाठी गाण्याची मजा वेगळीच>> अगदी कबुल! बघ जमल तर हे पण कर :- गाण रेकॉर्ड कर अन् आम्हाला पण ऐकव ना [ तू म्हणशील आयला किती स्वार्थी लोक... क्या करें कानसेन है तानसेन नहीं! ]

आता तू म्हणशील की कुणाच काय अन् कुणाच काय... :-)
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)

Jaswandi said...

mast! :)

Monsieur K said...

jogging, singing, reading - doing wot u enjoy and enjoying wot u do - u r keeping yourself occupied really well! :)

me said...

ekatepana antaratil kiwwa antaratil, bochara tar asatoch! pan swar ani sadhana parasparanna jawal aanate:) ek phukatacha salla deu? (plz dont mind)
jar jamala na tar tuze gane record karun nawaryala pathaw.... kharach sangate patkan jawal aalya sarkh watel,antarane ani antarane suddha :)

me said...
This comment has been removed by the author.
Maithili said...

Tumchya sagalya posts vachalya. khoop chhan lihita tumhi. pan ek saangoo phar bhiti vatayala lagli aahe overall lagna hya concept chich. kharech evdhe vichitra aani trasdayak asate ka he sagle??
Aani phakt mulinach ha svatache vishv haravalyacha tras hoto ki mulanahi hoto???

Bhagyashree said...

maithili, tension ani bhiti nako vatun gheus.. :)

sam, mi monseir k shi sahmat! :)

संवादिनी said...

@ महेश, जास्वंदी - धन्यवाद

@ स्नेहा - हं. नाही तसं काही समजू नकोस. खरोखरंच मला लिहिताना जसं वाटतं तसं मी लिहितेय. गेल्या वेळी लिहिताना मी बऱ्याचदा कमेंत्स च्या आहारी गेलेले आहे. पण ह्यावेळी नाही. ह्यावेळी मला वाटतं तसं आणि मलासुचतं तसं मी लिहितेय. म्हणून मला स्वतःला लिहिताना जास्त छान वाटतंय. वाचताना कदाचित ते थोडं बोरिंग होतही असेल, कारण तीच तीच रडगाणी रोज कोण आणि कशाला उत्साहाने वाचेल. पण ह्यावेळी वाचणाऱ्यापेक्षा मला काय लिहायचंत त्याला जास्त महत्त्व देतेय, कारण मी काही ललित लेखिका नव्हे की माझं लिखाण कुणाला आवडावं. जे काही थोडं थोडकं सुचतंय ते लिहायचं असं ठरवलंय. त्यामुळे माझे मूड स्विंग्ज सही सही उतरले तर त्यात नवल नाही.

@ दीप - थँक्स. स्नेहासाठी लिहिलेलं उत्तर वाच. पूर्वीची मी आणि आताची मी ह्यात काहीच फरक नाहीये रे. पण जे लिहावसं वाटतं त्यात नक्कीच बदल होत गेलेला आहे. तो बदल माझ्यातला नाहीये, माझ्या लिखाणातला आहे. म्हणून तुला कदाचित तसं वाटलं असेल. गाण्याचं बघुया जमतंय का.

@ केतन, भाग्यश्री - हं. नक्कीच आल्या आल्या वाटत असलेला एकटेपणा खूप कमी झालाय आता.

@ मी - खूप मस्त कमेंट लिहिलीस बरं का. मी त्याला पाठवते गाणं गिणं कधी कधी रेकॉर्ड करून. पण त्याची संगिताची आवड आणि माझी टोटली वेगळी आहे. मला मस्त असं ठाण मांडून गायलेलं गाणं आवडतं. त्याची आवड वेगळी आहे. पण गाणं पाठवायला हरकत नाही. तेसुद्धा त्याच्या आवडीचं.

@ मैथिली - अहो जाहो अजिबात नको. अगं मी जे लिहिलंय तो माझ्या आयुष्याचा एक भाग झाला. त्याबरोबरच खूप आनंद देणाऱ्या गोष्टीही घडतात. पण मी जे लिहिलंय ते सगळं मला जे सललं त्याच्याबद्दल. पण सगळंच काही वाईट नाहीये. खरं सांगायचं तर चांगलं जास्त आहे आणि खुपणारं कमीच आहे. पण लग्नाच्या बाबतीत खुपणाऱ्या गोष्टीच मी जास्त लिहिल्यात. पण त्यात काही अवघड आहे असं अजिबात वाटून घेऊ नकोस. इतक्या मुलींची लग्न होतात. त्यात कसली भीती? आणि नवऱ्याचं म्हणशील तर त्यालाही ऍडजस्ट करावं लागतंच पण त्याचं सगळं होम ग्राउंडवर असतं. आपल्याला दुसरीकडे जाऊन ऍडजस्ट व्हावं लागतं आणि तसही परदुःख शीतलम हेही आहे. त्याला काय प्रॉब्लेम्स येतात हे खरं आपल्याला कसं कळणार?