Thursday, February 5, 2009

मचाण, कलकत्ता आणि बदललेलं जग

परवा कोलकात्याहून परत आलो. गेले दहा-बारा दिवस कसे गेले कळलंच नाही.

निबिड जंगल, निरभ्र आकाश, चांदणी रात्र, दूरवर लावलेल्या ट्यूबमधून यावा असा चंद्रप्रकाश, बांबूचा मचाण, अशक्य शांतता, वाऱ्याबरोबर होणारा बांबूची कचकच. पाण्याचा एक आवाज मात्र कायम. मध्येच पायाखाली वाजणारी पानं? कुणाचे बरं असतील ते पाय ह्याचा अंदाज बांधत मचाणावर बसलेली सहा जणं. आम्ही दोघं, एक आजी आजोबा आणि दोघं टिपीकल सोल्जर स्टाइल ड्रेसिंग, वर हाफ जॅकेट, रात्री उगाचच घातलेल्या टोप्या अशा अवतारातले सो कॉल्ड नेचर लव्हर्स.

त्यातल्या
आजींशी माझी खासंच गट्टी जमली होती. म्हणजे आजी फक्त वयानेच आजी होत्या. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. खरंतर अहोंना असलं रात्री बेरात्री मचाणावर वगैरे बसायला बिलकुल मानवत नाही. पण आजींनी भरीस पाडलं. बघायला काय मिळालं? काहीच नाही. तशा दुर्बिणी वगैरे नेल्या होत्या. पण मला आवाजाची दिशा समजून मी दुर्बीण फोकस करेपर्यंत जे काही होतं ते पळून गेलेलं असायचं. मग नेचर लव्हर्स मला नक्की काय होतं ते सांगायचे.

पण अशा ठिकाणी प्राणी बिणी बघायला कोण जातं. मचाणाखाली सळसळलेल्या पानांनी शांततेच्या अंगावर शहारा आणावा. मनात एकदम धस्स व्हावं, मी अहोंचा दंड पकडावा आणि एकदम आश्वस्त वाटावं, ह्यातला जो रोमान्स आहे तो आपल्या नागरी संवेदनांना उलगडावा तरी कसा? त्यासाठी अशा मचाणांवर बसूनच संवेदना धारदार करायला हव्यात.

हे माझं लॉजिक नाहीये. आजींचं आहे. हे सांगून त्यांनी माझ्या अहोंना रात्र मचाणावर काढायला पटवलं. मी काय? असल्या गोष्टीत प्रचंड उत्साही आहे. पण त्याला पटवणं कठीण. पण बिचारा माझ्यासाठी तयार झाला. त्याच्यापेक्षा नेचर लव्हर्सच माझ्याशी जास्त बोलत होते. आणि बिचाऱ्याला चरफडण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नव्हतं. असो, तरी आला हेच खूप झालं. जंगलातल्या ट्रीपचा हा हायलाइट.

तिथून कलकत्त्याला पोचलो. माणसांच्या जंगलात आल्यावर अहोंना बरं वाटलं. त्याचे बरेच मित्र भेटले. शिकायला तो कलकत्त्याला होता. एक वेगळाच तो दिसला मला तिथे. म्हणजे माझ्याशी अगदी मृदूपणे बोलणारा, एकदम संयत, मितभाषी मुलगा मित्रांच्या घोळक्यात शिरल्यावर प्रचंड बदलला. त्याच्या मित्रांनीपण त्याच्या जुन्या कुलंगड्या बाहेर काढल्या. मजा आली. एवढा मोकळा ढाकळा त्याला पहिल्यांदाच पहिला. म्हटलं तू तर अगदी माझ्यासारखा आहेस. माझ्याशीपण अशीच मस्ती कर. हो म्हणाला, पण मुंबईला आल्यावर ये रे माझ्या मागल्या.

तिथून रोज घरी फोन करीत होते. शेवटच्या दिवशी आई म्हणाली आता मुंवईला पोचल्यावर रोज फोन करू नको. उगाच सासू-सासऱ्यांच्या डोळ्यात येईल. मला तिचा रागच आला. अरे, फोन नको करू म्हणजे काय? माझी स्वतःची आई मला हे सांगते ह्याचं दुःख जास्त. मग तिचंही म्हणणं थोडंसं पटलं. मग एक मध्यममार्ग काढला. कुणी घरी नसताना किंवा मी बाहेर असताना कॅजुअली फोन करायचा. आणि आठवड्यातून एक दोन वेळा ऑफिशिअली करायचा.

बाकी नवं घर मस्त आहे. सासू सासरे सुद्धा. फिरायला जाईपर्यंत माझा चेहरा पडलेला होता. घरची खूप म्हणजे खूप आठवण यायची. अगदी रडायला यायचं. पण आता ठीके. सवय झाली थोडीफार. माणसं कळायला लागली थोडीफार. पण त्याबद्दल पुढच्यावेळी.

"आणि माझं जगंच बदलून गेलं" हा वाक्प्रचार आपण कित्येक वेळा ऐकतो. सध्या मी ते अक्षरशः अनुभवतेय. कालपर्यंत मी माझ्या बाबालाच बाबा म्हणायचे. आता मी त्याच्याही बाबांना बाबा म्हणते, आईला आई म्हणते. पण म्हणून एका दिवसात ते मला माझ्या आई बाबांसारखे वाटतील का? नाहीच वाटत. मग तशी अपेक्षा मुलीकडून करावीच का?

माझे सासरे ह्यावर फार मार्मिक बोलले. म्हणाले, आपण म्हणतो आता सून घरी आली, ती आम्हाला मुलीसारखीच आहे. "सारखी" आहे, पण मुलगी नाहीच असंच आपण बोलून दाखवतो ना? माझ्या बाबाला सांगत होते. मग म्हणाले, म्हणून आम्ही म्हणतो, ही आमची मुलगीच आहे. तिने फक्त आम्हाला तुमच्याइतकं जवळचं स्थान द्यावं. ते म्हणतात ते मला शंभर टक्के पटलं. पण मी त्यांना माझ्या बाबाची जागा देऊ शकते का? नक्कीच नाही. मग त्यांनी मला त्यांच्या मुलीची जागा द्यावी अशी अपेक्षा मी कशी करू शकेन?

काही अंतर कधीच कापली जात नसावीत. कुणाची चूक म्हणून नाही पण परिस्थितीची असहायता म्हणून.
- संवादिनी

3 comments:

Satish said...

"माझे सासरे ह्यावर फार मार्मिक बोलले. म्हणाले, आपण म्हणतो आता सून घरी आली, ती आम्हाला मुलीसारखीच आहे. "सारखी" आहे, पण मुलगी नाहीच असंच आपण बोलून दाखवतो ना? माझ्या बाबाला सांगत होते. मग म्हणाले, म्हणून आम्ही म्हणतो, ही आमची मुलगीच आहे. तिने फक्त आम्हाला तुमच्याइतकं जवळचं स्थान द्यावं. ते म्हणतात ते मला शंभर टक्के पटलं. पण मी त्यांना माझ्या बाबाची जागा देऊ शकते का? नक्कीच नाही. मग त्यांनी मला त्यांच्या मुलीची जागा द्यावी अशी अपेक्षा मी कशी करू शकेन? "

- हम्म... पटण्यासारख आहे.

संवादिनी said...

बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टी दुसऱ्या बाजूनी विचार केल्यावर पटायला लागतात. आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत, न पटणारे मुद्दे सोडून आपण जमवून घेतो, घेऊ शकतो. पण जी नाती जाणत्या वयात लादली जातात, तिथे न पटणारे मुद्धेच लोकं धरून बसतात. म्हणूनच शक्य तेवढं दुसऱ्या बाजूने विचार करायचा प्रयत्न करते. बघुया कसं काय जमतं.

saanasi said...

मला पण नवर्‍याच्या आई बाबांना 'आई-बाबा' म्हणणं फारच जड जातं.

मी त्यांना 'मॉं आणि पपा' असं म्हणते. मला तरी तेच बरं वाटतं. त्यांनाही सुदैवाने काही प्रोब्लेम नाहीये.