Thursday, January 29, 2009

अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर

गंगेत घोडं न्हालं एकदाचं. करायचं करायचं म्हणून ठरत नसलेलं आणि मग अचानक ठरलेलं आणि येतंय, जवळ येतंय म्हणून येऊ घातलेलं लग्न एकदाचं पार पडलं.

कसं वाटलं लग्नाला? माझ्याच. अगदी ईदच्या कुर्बानीच्या सजवलेल्या बोकडासारखं वाटलं नसलं तरी गेलाबाजार पोळ्याच्या सजवलेल्या बैलासारखं वाटलंच. आपल्या स्वतःच्या लग्नात आपल्या स्वतःलाच इतकं बोअर व्हावं ह्यासारखं दुर्दैवं ते कोणतं. नटून सजून दृष्टिकर्कश्श फ्लड लाइट्सच्या समोर उभं राहा. एसी चालू असूनसुद्धा भयंकर उकडत होतं. नको तो मेक अप आणि नको ती हेअरस्टाईल असं झालं होतं. त्यात मेकअप करणाऱ्या बाईने आपलं कौशल्य जरा जास्तच पणाला लावलं. इतकं की माझ्या नवऱ्यालादेखील मी अनोळखी वाटावे.

मग ते लग्नाचे सोपस्कार. सिंहासनावर बसणं किंवा न बसणं. ती सिंहासनवजा खुर्ची तिथे ठेवली कशाला होती कुणास ठाऊक? कारण पहिली दहा मिनिटं सोडली तर आम्हा दोघांनाही तिच्यावर बसायला मिळालं नाही. भेटायला आलेल्यांची ही भली मोठी लाइन. त्यातले कोण आपले कोण समोरचे काही कळत नव्हतं.

लहानपणी भेटलेल्या कुठल्यातरी लांबच्या आत्या किंवा मावशीने त्यानंतर एकदम लग्नात उपटून "ओळखलंस का? " म्हणून विचारणं, मी त्याला ओशाळत "हो" असं जोरदार ठोकून देणं, मनात अशा करत की ती आत्या किंवा मावशी मला "सांग बरं कोण?" म्हणून विचारणार नाही. एकमेकांच्या नातेवाईकांच्या ओळख करून देणाऱ्यालाही फार काळ लक्षात न राहणाऱ्या ओळखी आणि एकंदरीतच लग्न ह्या प्रकारात आलेल्या पाहुण्यांना नसलेला रस.

तीन साडेतीन वाजल्यानंतर झालेलं किंवा नकोसं झालेलं जेवण. बळेबळेच एकमेकांना भरवणं वगैरे. पण तेव्हाच मला समजलं की ही लग्नात नवरा नवरीने एकमेकांना भरवायची पद्धत का रूढ झाली असावी. बाय द टाइम, उत्सवमूर्ती असलेल्या दांपत्याचं जेवण होतं, त्याची जेवणावरची वासनाच मेलेली असते. निदान आपल्या नवपरिणित जोडीदारच्या हातून तरी ते घास दोन घास खाऊन पुढच्या कार्यक्रमासाठी थोडी शक्ती मिळवतील म्हणून असेल कदाचित.

मग ते नाव घेणं. आता मी त्याचं नाव दर मिनिटाला पंचवीस वेळा घेते. अजून उखाण्यात काय वेगळं घ्यायचं. पण ते घेतलं. त्याने माझं नाव घेतलं ते ऐकून हसून हसून मुरकुंडी वळली. मराठी भाषेचं सामान्य ज्ञान आधीच कमी, त्यात आकडे सांभाळण्यात आयुष्य गेलेलं त्याचा उखाणाही तसाच असायचा. मी खरं त्याला आधीच एक मस्त उखाणा सांगितला होता, पण साहेबांना स्वतःची क्रिएटिव्हीटी दाखवायची हौस आली.

असो. हे सगळं होता होता घरी जायची वेळ आली आणि लक्षात आलं अरे, आज तर आपलं घर बदललं. कालपर्यंत अल्लडपणे माहेरी वावरणाऱ्या आपण आज एकदम अचानक मोठ्या झालो. सूनबाई झालो. एका नव्या विश्वात प्रवेश. त्याच्या घरी मी पहिल्यांदाच जात होते असं नाही. पण आतापर्यंत त्याच्या घरी म्हणून जात होते. आता माझ्या घरी म्हणून जायचं होतं. माझ्या घरी वगैरे फक्त म्हणायला कारण आत कुठेतरी खोलवर मला माहितेय माझं घर म्हणजे माझ्या आई बाबांचंच घर. आणि त्याचं घर म्हणजे त्याच्या आई बाबांचं घर. पुढे कधी आमचं एखादं घर झालं तरच कदाचित हा कन्सेप्ट बदलेल.

नेहमी होते ती रडारडी भरपूर झाली. इतरांना रडतात म्हणून हसणारी मीदेखील धाय मोकलून रडले. पण नंतर त्यावेळी झालेला माझ्या नवऱ्याचा चेहरा आठवून खुदकन हसू देखील आलं. म्हणजे, बिचाऱ्याला फार गिल्टी फीलिंग वगैरे आलं होतं. सगळे रडतायत आणि ह्या सगळ्या रडारडीला आपण कारणीभूत आहोत असा काहीसा भाव. फारच बिचारा चेहरा करून उभा होता तो.

त्याच्या घरी पोचले. त्याच्या बिल्डिंगमधल्या लोकांनी एकदम जोरदार स्वागत केलं. पायघड्या काय, फुलं काय. मजा आली. खरंच आपण कुणीतरी स्पेशल आहोत असं वाटलं. लग्नाच्या ह्या दिवसात जर मी काही एन्जॉय केलं असेल तर हे स्वागत. घरी पोचल्यावर पुन्हा एकदा सर्व नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या ओळखीच सेशन झालं. नव्या सूनबाईच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही झाला. मनात नव्हतं पण सगळ्यांनी भरीला पाडलं.

एव्हाना दिवस सरला होताच. रात्रीचे रंग पसरायला लागले आणि एक वेगळीच जाणीव झाली. कालपर्यंत मी एकटी होते पण आजपासून तो बरोबर होता. रोमँटिक कल्पना वगैरे डोक्यात नव्हत्या असं नाही, पण आजपासून जो माझा हक्काचा स्वतःचा एकटीचा वेळ होता, झोपण्याचा तोपण शेअर करायला लागणार ह्या कल्पनेचं दडपण वगैरे आलं.

भरजरी साडीमध्ये नटून थटून, फुलांनी सजवलेल्या पलंगावर, भरजरी पोषाख घालून बसलेल्या नवऱ्यासाठी बदामाचं दूध वगैरे घेऊन जाणाऱ्या, लाजऱ्या बुजऱ्या, मान खाली घातलेल्या बॉलीवूड चित्रपटांमधल्या नवपरिणितेच्या कल्पनेला जमिनीवर दाणकन आपटत जेव्हा मी माझा घरचा अगदी रोजच्या वापरातला गाऊन घालून जांभया देत आणि नवऱ्याची वाट पाहत गॅलेरीत उभी होते, तेव्हा कळलं. की परिकधा आता संपली.

"अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर" हे साकारणं हे खरं चॅलेंज आहे.

- संवादिनी

13 comments:

me said...

खुप तायां कडून खुप वेळा ऐकलेली गोश्ट ! पण तरी पुन्हा ऐकायला चान वाटली :)

Anand Sarolkar said...

Congrats:) I am sure you will enjoy this phase of life.

HAREKRISHNAJI said...

Congrats

Maithili said...

congrats!!! may god give you special and wonderfull married life........

Deep said...

Congo!!! :) aataa nidaan paarteee kadhee te tri saang! ;)

Shashank said...

Congratulations !!

Jaswandi said...

:)

माझं नाव रोहन said...

अगदी तुझं स्वप्न आहे तसंच घडणार याची खात्री बाळग! विश्वास ठेव...आणि तुझं स्वप्नच प्रत्यक्षात अवतरेल.अभिनंदन :-)

zhamaal said...

hi
congratulations!!!!!!

संवादिनी said...

@ मी - हं. सगळ्यांचच असं होत असणार. मला मोठी बहीणच नाहीये. अगदी चुलत मावस सुद्धा. पण मैत्रिणींकडून जे ऐकला होता ते जवळपासचंच होतं.

@ आनंद - धन्यावाद. मी सोडून बाकी सगळे शुअर आहेत. lol

@ हरेकृष्णाजी, शशांक, जास्वंदी, झमाल - धन्यवाद

@ मैथिली - मनापासून धन्यवाद. देवाने तुझं नक्की ऐकावं.

@ दीप - अरे माझं आडनाव नाही का माहीत? पार्टी कसली मागतोस. पार्टी बिर्टी झाली सगळी.

@ रोहन - अशी काही खास स्वप्न नाहीयेत. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. जेवढ्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या होतायत असं वाटतंय.

Deep said...

अरे माझं आडनाव नाही का माहीत? >>> naahee!!! ag eka kobra ne dusrya 99% kobra la dete ha tula party ase (chtekho ;) ) mhnayla kaay harkt aahe? BTW mala tuze KHARE naavhi mahit naahi :-( aani tu gtalk / yahoo var hi aad kele nahiyes aso (aata tu phaarch bizi asnaar :P) bgh jamle tar ;)

:-)मी सोडून बाकी सगळे शुअर आहेत>> aani he phar vait barka :) u should be sure! atleast pretend ;) [AWANTAR Prashna: tu gauri/saaniya/ meghna pethe vahtyes ki kaay? (lon te nko vicharus)]

नितिज..... said...

Congrats!!!!!.... And they are livin happly... :) kay khar na...

Avantika said...

Really good blog post ! I got married exactly 1 year before you got married. But my feelings were quiet similar to you on the wedding day. Would like to read more posts on this blog.
Keep on writing and best wishes for happy married life.