Thursday, February 19, 2009

शॉर्टकट

लग्न म्हणजे एक रोलर कोस्टर राइड आहे. बरंचसं सुख आणि त्याला दुःखाची किनार. म्हणजे नवऱ्याचा विरह संपल्याचा आनंद आणि घरापासून दूर गेल्याचं दुःख. पार्टनर मिळाल्याचा आनंद पण स्वातंत्र्य गेल्याचं दुःख. शेअर करता येतंय हा आनंद पण अवलंबी झाल्याचं दुःख. कधी भेटला नाही असा उधाणलेला समुद्र आणि त्याने अस्ताव्यस्त केलेला किनारा. समुद्राच्या उधाणाचा आनंद, किनारा अस्ताव्यस्त झाल्याचं दुःख. कधी कधी मला वाटतं हे सगळ्यांचंच होतं की हा माझाच प्रॉब्लेम आहे? सुख नाही असं नाही, पण दुःख नाही असंही नाही अशी काहीशी विचित्र परिस्थिती.

जाऊदे. नवा भिडू, नवं राज्य. माझा मुंबईचा मुक्काम संपत आला. पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कामावर रुजू होईन. परका देश परके लोक आणि एकटी मी. इथेसुद्धा फिफ्टी फिफ्टी आहे. आपल्या लोकांपासून दूर जायचं हे दुःख पण सासरी राहण्याचं जे अवघडलेपण आहे, त्यातून सुटका होण्याचा आनंद. कदाचित मी खूप सेल्फ सेंटर्ड वगैरे वाटत असीन. पण स्वतःचं विश्व निर्माण करताना होणारे कष्ट अपार आनंद देऊन जातात. एका विश्वातून दुसऱ्या विश्वात सामावून जाण्यातले कष्ट खूप त्रासदायक आहेत.

हे सगळं सांगावं तरी कुणाला? आईला सांगितलं तर आई म्हणणार मुलीच्या जातीला हे सगळं करावंच लागतं. नवऱ्याला ह्याची डेप्थ समजणार का? त्याच्या दृष्टीने त्याचं विश्व चांगलंच आहे. आणि चांगलं आहेच. वाईट काहीच नाहीये, पण ते माझ्या विश्वापेक्षा खूप वेगळं आहे म्हणूनही त्रास होऊ शकतो ते त्याला कसं पटवायचं? हा अनुभव आल्याशिवाय कळावं तरी कसं किती अवघड आहे हे सगळं? म्हणून त्याला काही बोलत नाही. बाबाला सांगावं खूप वाटतं पण त्याच्या डोक्याला त्रास नको म्हणून नाही सांगत. जीवाभावाच्या मैत्रिणीही आता जवळ राहिल्या नाहीत की उचलला फोन आणि बोललं तासभर. एकंदरीत सुखमय शोक किंवा शोकमय सुख असं काहीसं आयुष्य झालंय.

पण लवकरंच ते बदलेल. तिथून निघतानाचा विमानतळावरचा उत्साह इथून निघताना नक्कीच नसेल. का कुणास ठाऊक, भारत सोडताना मी नेहमी भावुक होते. विमान उडाल्यावर मुंबईचे दिवे, झोपड्या ढगाआड जाईपर्यंत बघत राहते. पुन्हा कधी दिसाल? असं त्यांना विचारत राहते. ह्या वेळी नवऱ्याचा विरहही सोबतीला असेल. गंमत आहे. सोबत नसली म्हणजे होतो तो विरह आणि अशा विरहाचीही सोबत. निदान दोन अडीच महिनेतरी सोबतीला राहीलच तो.

पुन्हा तिकडे गेल्यावरचं काम, एकटेपण, कंटाळा, सगळं सगळं डोळ्यासमोर दिसतंय. मी जेव्हा शाळेत होते अगदी लहान असताना तेव्हा वाटायचं आज जोरात पाऊस पडूदे आणि शाळा बुडूदे. तसंच काहीसं वाटतं, काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि रद्दच व्हावं जाणं. मग समोर दिसतो एक डोंगर, माझ्यासारख्या कित्येकींनी चढलेला. स्वतःला दुसऱ्या एका साच्यात कोंबायचा.

मग एक मन पळपुटं होतं. म्हणतं जाऊदे तो डोंगर, पळायची संधी मिळतेय, पळ काढ. मग एकदम खूप खूप उदास वाटतं. मनापासून प्रमाने वागवणारे सासू सासरे, मी त्यांच्यात स्वतःला सामावून घ्यावं अशी रास्त अपेक्षा बाळगणारा नवरा. ह्यांचा आपण कुठेतरी अपेक्षाभंग करतोय असं वाटत राहतं. एक न्यूनगंडही येतो. आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. असा.

जाऊदे, सध्या तरी जे जमत नाही त्याला सामोरं जाण्याऐवजी त्याला पाठ दाखवण्याचा शॉर्टकट मी घेतलाय. जेव्हा वेळ येईल तेव्हा बघता येईल. सध्या शोवटच्या काही दिवसातली मुंवई आणि नवरा मनात साठवून ठेवायचा प्रयत्न करतेय.

- संवादिनी

4 comments:

सखी said...

परका देश,परकी माणसं;पण तुझे विचार आणि तुझी तू असशील नं.... देन फ़िकर not :)

Vidya Bhutkar said...

"आपणच असे आहोत. इतक्या चांगल्या लोकांत मिसळायला खरंच त्रास होण्याची गरज नाही, पण आपल्यालाच तो होतो, म्हणजे आपणंच कुठेतरी चुकतो आहोत. "

मला तरी असं वाटत नाही. मी जेव्हा ५ वर्षापासून ओळखत असणाऱ्या माणसासोबत लग्न केलं तेव्हाही मला भीति वाटत होती की मी कशी राहीन त्याच्याबरोबर.फोनवर बोलणं, थोडावेळ भेटणं वेगळं आणि २४ तास कुणीतरी आपल्या आयुष्याचा भाग असणं हे मला अडचणीचं वाटत होतं. समोरचा कितीही चांगला असला तरी स्वत्व विसरून त्याच्यात सामावून जाणे खूप अवघड आहे. उदा: त्याचे मित्र हे ’आपले’ मित्र लगेच होत नाहीत, ना त्याचे नातेवाईक. या सर्वांवर ’काळ’ हेच उत्तर आहे. Give ur relationship some time to evolve.
मलातरी वाटतं की तुझं थोड्या वेळासाठी हे दूर राहणं हे पळवाट नसून, तुझ्यासाठी योग्य असा ब्रेकच होईल कारण मग तेव्हा तू आई-बाबा आणि सासु-सासरे यांची तुलना न करता नवऱ्याला भेटायची वाट पहात असशील. :-)
All the best.

-विद्या.

Deep said...

hmmm sometimes that's the only option u have! ;) well I hope U'll relaize that it's not that big "SAMASYA" :P

संवादिनी said...

@ सखी - फिकर नॉट. येस. मै और मेरी तनहाई वगैरे वगैरे लिहावसं वाटतंय. अक्सर बाते बिते करतो आम्ही. पण आत जाऊदे.

@ विद्या - तुझं एकदम पटलं. म्हणजे आता पटतंय. ती कनफ्युस्ड फेज मागे पडली असं वाटतंय. आणि तसंच असुदे.

@ दीप - नाही. पहिल्या दिवशी समस्या वाटणारी समस्या दहाव्या दिवशी नाहीच समस्या वाटत. वेळ जातो तशी आपल्याला तिची सवय होते किंवा उत्तरं सापडत जातात