Thursday, March 12, 2009

न पाहिलेला ऑपेरा

बरेच दिवस मनात एक विचार घोळत होता. ऑपेरा बघायचा होता. आधी कंपनी नाही म्हणून आणि मग वेळ नाही म्हणून चालढकल केली. खरी गोम तर वेगळीच होती. अजूनही बिझनेस व्हीसा वर असल्याने कंपनीच्या अलावन्स वरच भागवावं लागत होतं. तो काही विशेष नव्हता. जरी घराचं भाडं कंपनी देत असली तरी बाकी सगळा खर्च आमचा आम्हालाच करायचा होता. त्यासाठी अलावन्स पुरेसा होता पण एकदम तीन दिवसाचा अलावन्स ऑपेरावर खर्च करावा इतकीही माझी परिस्थिती चांगली नव्हती. वर्क परमिट होईपर्यंत कळ काढणं आवश्यक होतं. मग इथेच पगार मिळाला असता आणि खर्चावरची बंधनं थोडीशी सैल झाली असती.

दरम्यानच्या काळात आमच्या टीममध्ये एक रोमानिअन मुलगी सामील झाली. जॉर्जिना तिचं नाव. तर ह्या जॉर्जला पण थिएटर ची प्रचंड आवड. बोलता बोलता मी तिला म्हटलं की मलाही एकदा ऑपेराला जायचंय. अगदी पिटातलं तिकिट काढलं तरी चालेल. ती म्हणाली चांगला ऑपेरा बघायचा असेल तर पिटातल्या तिकिटात पूर्ण स्टेज दिसत नाही. म्हणजे पुढची तिकिटं काढणं आलं, अर्थात पूर्ण पैसे भरावे लागणार.

आमच्या कंपनीचा वेळकाढूपणा इतका होता की शेवटी मी डेली अलावन्स मधली पंचवीस टक्के रक्कम ऑपेरासाठी बाजूला काढायला लागले. दोन आठवड्यात मला पाहिजे तेवढे पैसे जमणार होते म्हणून मी जॉर्जीला सांगून टाकलं की आपण ऑपेराला जाऊया. एका शनिवारची तारीखही ठरली. तिने ऑफिसमधल्या अजून सात-आठ गोऱ्यांना जमवलं. आपले लोक खर्च करण्याच्या बाबतीत मागे असल्याने देशी कुणीच नव्हतं. पुढच्या शनिवारचं तिकीट असल्याने सोमवारी ते काढायचं असं ठरलं आणि पैसेपण सोमवारी जॉर्जीकडे द्यायचे असं ठरलं.

पुढच्या विकेंडला ऑपेरा बघायला मिळणार ह्या आनंदातच शुक्रवारी घरी पोचले. नेहमीची विकेंड दंगामस्ती चालू होती. झोपणे, जेवण बनवणे आणि जेवणे ह्यात शनिवार कसा निघून गेला ते कळलंच नाही. रविवारी उशीरा उठून टीव्ही लावून बसले तर बातम्या लागलेल्या.

न भूतो न भविष्यती अशी आग शेजारच्या राज्यात लागलेली. जंगलंच्या जंगलं जळून खाक झाली. साडेसातशे घरं जळून गेलेली. सव्वाशेच्या आसपास माणूस मारला गेलेला. एकदम सुन्न झाले. रडणाऱ्या लोकांचे चेहरे पाहून मलाच रडू यायला लागलेलं. एवढा संपन्न देश. प्रगत प्रगत म्हणून मिरवणारा पण वाऱ्याच्या वेगाने पसरलेल्या वणव्याला काही रोखता आलं नाही. बऱ्याच लोकांना आग लागलेय हेच समजलं नाही आणि त्यांची घरं त्यांच्यासकट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ज्यांना पळता आलं ते पळाले, पण नेसत्या कपड्यांशिवाय त्यांच्याकडे काहीही नव्हतं. आईविना मुलं, मुलं शोधणारी आई, कुणाचं कोण अजून दिसलं नव्हतं, पत्ता लागत नव्हता. निसर्गाचा कोप दुसरं काय?

चटकन मला देश आठवला. देशावर आलेली संकटं. मुंबईचा सव्वीस जुलैचा पाऊस, त्सुनामी, लातूरचा भूकंप. अगदी सगळं सगळं डोळ्यासमोर आलं. लातूरच्या वेळी तर अगदी डबे घेऊन फिरले होते तेपण आठवलं. दुःख आणि अश्रू ह्यांना देशांच्या सीमारेषा समजतंच नाहीत आणि निसर्गालाही. कोण प्रगत, कोण अप्रगत असला विचार निसर्ग कधीच करत नाही, सगळ्यांना सारखाच न्याय.

त्या सुन्न वातावरणातच रविवार निघून गेला. सोमवारी सकाळी नेहमीसारखी ऑफिसात पोचले. ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे एफ्. एम. चालू होता. बातम्या येत होत्या, मृतांचे आकडे, नुकसानीचे आकडे वाढत होते, मदतीसाठी फोन नंबर सांगितले जात होते, वेबसाइट सांगत होते. एकदम डोकं भणभणायला लागलं, तिथून पळून जावं असं वाटायला लागलं. आपण किती असहाय असतो ह्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

थोड्या वेळाने जॉर्जी आली. तिच्या बोलण्याचा विषयही हाच. जाता जाता म्हणाली अगं तू ऑपेरा चे पैसे ट्रान्स्फर केलेस का? मला बहुतेक ह्यावेळी नाही जमणार. पुढच्या महिन्यात एखाद्या छानशा ऑपेराला जाऊया. तुम्ही जा माझ्याशिवाय. जॉर्जी नाराज झाली. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता.
पंधरा दिवस ऑपेरासाठी साठवलेले पैसे घेऊन मी रेडक्रॉसच्या काउंटरला गेले. मला नव्हता ऑपेरा बघायला मिळणार ह्या आठवड्यात पण कुणालातरी त्या पैशाचा माझ्यापेक्षा जास्त, खूप जास्त उपयोग होणार होता. म्हणून ते पैसे देऊन टाकले.

आजपासून परत साठवायला सुरवात केलीय.

- संवादिनी

4 comments:

Kiran said...

संवादिनी ,

बरेच दिवस तुझा ब्लॉग वाचत आहे
आज ज्या देशात तू राहते आहेस ते वर्णन वाचून अस वाटल की तू ऑस्ट्रेलिया त राहत आहेस
खरच का तू ऑस्ट्रेलिया त आहेस?
मी पण ऑस्ट्रेलिया राहते म्हणून विचारते आहे

किरण

Dk said...

सिंपली ग्रेट!!!
तू ऑपेरासाठी साठवलेली रक्कम किती सहजतेने रेडक्रॉसला दिलीस :) जॉर्जीला सांगितल असतस तर तिनही मदत केलीच असती ना? माणसान एवढ संवेदनशील असायलाच हव.

संवादिनी said...

@ किरण - होय. मी तिथेच आहे.

@ दीप - जितकं सहजतेने लिहिलं तितकी सहजतेने नाही दिली मी ती रक्कम. हजार वेळा विचार केला. आता मागे वळून पाहिलं तर असं वाटतं की माझ्या इवल्याश्या रकमेने काही विशेष फरक पडला नाही. पण त्यावेळी द्यावीशी वाटली, दिली. जॉर्जीनेही दिलंच असेल काही. फक्त तिने ऑपेराही पाहिला. इतकंच.

Maithili said...

khoop chhan ; donhi post sudhha aani tumacha svabhav sudhha.