Thursday, March 19, 2009

शोध

स्वतःच्या घरी शिफ्ट झाले.

स्वतःच्या म्हणजे भाड्याच्या. पण तरीही हॉटेलात राहण्यापेक्षा चांगलंच आहे की. अर्थात साप सफाई वगैरे अंगावर पडणार पण ते ठिके. तिथे राहून राहून भयंकर कंटाळा आला होता. अपार्टमेंट चांगला असला तरीदेखील, घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल. आता काही महिने तरी इथून हालणार नाही. अर्थात नवरा आल्यावर जागा बघितल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं पण तोपर्यंत कंपनी मला हॉटेलमध्ये ठेवायला तयार नव्हती. शेवटी मला आधीच घर बघून शिफ्ट व्हावं लागलं.

अगदी दहा दिवसात घर मिळालंसुद्धा. गेल्या आठवड्यात दोन तीन जागा पाहिल्या होत्या. पण ही जागा अगदी मनासारखी होती. एकमजली घर आहे. खाली किचन आणि बैठकीची खोली आणि वरच्या मजल्यावर दोन बेडरूम्स आणि बाथरुम, टॉयलेट वगैरे. एका बेडरूमला छान बाल्कनी आहे. खाली व्हरांडा आहे. तिथे काही खुर्च्या आणि टेबल आहे. घरात काहीही फर्निचर नाही. अजून मी काही घेतलंही नाहीये. भारतातून येताना काही भांडी आणली होती तेवढीच आणि बाबाने मला पुण्याला जाताना घेऊन दिलेला लॅपटॉप सोडला तर काहीच नाही.

पण घर एकदम सही आहे. भरपूर उजेड. ऐसपैस जागा, हीटर, एसी, गरम पाण्याची सोय. आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की. मी एकटी काय करणार इथे? अहो लवकर पोचले तर बरं होईल. मग मजा येईल. सोसायटीच्या आवारातंच झाडं गिडं आहेत. शिवाय स्विमिंग पूलही आहे. त्याला पोहता येत नाही. मी त्याला शिकवणारे. त्याला आधीच सांगून ठेवलंय.

ज्या दिवशी चावी घेतली त्या दिवशी एकटीला एकदम विचित्र वाटत होतं त्या रिकाम्या घरात. शेवटी लॅपटॉपवर गाणी लावली आणि ऐकत बसले. आवाजाने घर भरल्यावर जरा बरं वाटलं. होतं ते सगळं सामान नीट लावलं. बॅगा रिकाम्या केल्या. कपडे कपाटात व्यवस्थित लावून ठेवले. एकदम असं घरगुती झाल्यासारखं वाटलं. एक क्षण मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ. घर नेटकं ठेवावं, आपलं गाणं गिणं करावं आणि बाहेरच्या लढाईची जबाबदारी नवऱ्यावर टाकावी. दुसऱ्याच क्षणाला तो विचार झटकून टाकला. ऑफिसमधून बॉसचा फोन आला. ताबडतोब बोलावलं. मी ऑन कॉल होते, पण ऑफिसमध्ये जायचा अजिबात मूड नव्हता पण जावंच लागलं. दोन क्षणापूर्वीच्या स्वप्नातल्या हाऊस वाइफ स्वप्नातच राहिल्या.

हे म्हणजे खरं माझं घर असल्यासारखं वाटतं. लग्न झाल्यावर गेले ते त्याच्या घरी. पण हे घर ना त्याचं ना माझं. आमच्या दोघांचं आहे. दोघांची नवी सुरुवात. म्हणून काही फर्निचरही घेणार नाहीये तो येईपर्यंत. आला की दोघं मिळून घेऊ. मी घेतलं तर त्याला आवडणार नाही असं नाही, पण घरटं दोघांनी बांधलं तर जास्त मजा येईल. अर्थात माझ्या दुकानांच्या वाऱ्या सुरू झालेल्या आहेत.

काही गोष्टी खूप आवडल्यात. पण जे आवडतंय ते सगळं खिशाच्या पालीकडलं आहे. जे स्वस्त आहे ते चांगलं नाहीये. बघूया सध्या तरी फक्त एक मॅट्रेस घेतली आहे. ती जमिनीवर घातली आहे. उशा, हंतरूण, पांघरूण मी घेऊन आले होते भारतातून. त्यामुळे सध्या एकदम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हेच माझं जीवनमान आहे.

घरी फोन केला तेव्हा हे सगळं आईला सांगितलं. तिचं लगेच सुरू झालं. नीट विचार करून सगळं घे. एकदा घेतलं की बदलता येत नाही काही वर्ष. नवऱ्याला सगळं विचारून घे. उगाच महागाचं घेऊ नको. तुला सवय आहे खर्चीक गोष्टी घ्यायची वगैरे वगैरे. असं सुरू झालं की बाबा पॉलिसी अंगिकारायची. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. तसंच केलं. सगळ्याला हो, बरं, हो बरं म्हणत संपवलं.

आईला कोण समजावणार? आमची काळजी करण्यात तिचं अख्खं आयुष्य गेलं, त्यामुळे तिचा अधिकारही आहे तो.

बाबाशी मात्र खूप गप्पा मारल्या. तो कुठल्याशा कार्यक्रमाला गेला होता त्याचा सगळा रिपोर्ट दिला. म्हणाला गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको. मी काय सांगणार त्याला? दोन आठवड्यात तंबोरा लावला सुद्धा नाही म्हणून?

लग्न झाल्यापासून एक गोष्ट जाणवतेय. आई बाबा, विन्या यांच्या मनात मी अजून तीच आहे, पुण्याला जायच्या आधीची, घर सोडायच्या आधीची, धडपडी, सतत कशात ना कशात गुंतलेली. ऑफिसातून थेट सुटून नाटकाच्या तालमी करून आल्यावर कितीही दमली असली तरी थोडा का होईना रियाज करणारी. मनातली प्रत्येक गोष्ट घरी बोलून दाखवणारी. खळखळून हसणारी आणि भडभडा रडणारी. पण आता जाणवतंय, की मी किती बदललेय.

घराचा शोध आता संपला, आता स्वतःचा शोध पुन्हा घ्यायला हवा.

- संवादिनी

7 comments:

अनिकेत वैद्य said...

संवादिनी,
नेहमीप्रमाणेच एक सुंदर पोस्ट, छान विचार.


अनिकेत वैद्य.

Manjiri said...

किती मस्त आणि मनापासुन लिहितेस गं! अगदी मलाच वाटलेलं सगळं सांगते आहेस असं वाटलं मला.
मला नेहमी वाटत आलंय की इतरांच्या मनात आपली जी छबी असतेना ती फोटोसारखी एका क्षणी फ्रीज झालेली असते.

Anonymous said...

मनातले विचार कागदावर उतरवायला पण एक ’ नॅक ’ लागते, ती तुमच्या लिखाणात जाणवते. छान पोस्ट आहे. किप इट अप..

Maithili said...

mast aahe post.
Tumchya posts vachoon vicharancha bhunga satat bhunbhun karat raahato manat. mala vaatate hech khare yash aahe tumchya likhanaach, sahaj vaachale aani sodun dile ase naahi karata yet.

Dk said...

काँगो!!!

घर ते घर आणि हॉटेल ते हॉटेल>> हम्म खराय! (पण मला मात्र एकटा असताना हॉटेलातच राहायला आवडतं! पैसा फेकला की सारी भौतिक सुख हात जोडून समोर!)

आणखी काय पाहिजे? हा पाहिजे की>> हेहे.. हे मात्र खरच! सोबत हवीच :)

मनात आलं असंच राहावं. म्हणजे हाऊस वाइफ>> ह्म्म अगं राहा की मग...नाहीतर नवर्‍याला सांग तस. (किंवा त्यालाच विचार हाऊसहसबंड म्हणून राहतोस का? hehhe just kiddin!)

आई हा प्रकार असाच असतो थोड्या बहुत फरकान सगळीकडे!

>>गाणं सोडू नकोस. एकवेळ जेवण विसरलीस तरी चालेल पण रियाज विसरू नको.>> ह्म्म्म बाबा ग्रेटच! इथं नाव नाही घेत पण एका मुलीच्या बाबांनी असच काहीस जरास वेगळ सांगितल होत मुलीला>>(नोकरी अन् गाणं सोडू नकोस. एकवेळ नवरा सोडलास तरी चालेल!)

[इथली ही प्रतिक्रिया जर तुला वेगळी वाटत असेल तर ती तू उडवू शकतेस :) हल्ली काय होत माहित नाही मला स्वतःची पोस्टस् लिहायच्या ऐवजी प्रतिक्रिया लिहायला जास्त आवडत (की जमतय? :( मे बी अनुल्लेखाचा
प्रभाव. ]

आणि एक थोड्या बहुत टायपो एरर्स आहेत त्या बदलशीलच :) जरा खटकतायत वाचताना म्हणून सांगितल! बाकी अंथरूण असा शब्द आहे नं?

बाकी जास्वंदी सारखा तुझ्या गाण्यांचा ब्लॉग काढायच घ्या की मनावर. कस आहे नं माणूस कायम अजून हवय अजून हवय म्हणत जातो त्यातलाच हा एक प्रकार. :)

बास करतो आता खरच पण राहावल नाही म्हणून सांगितल.

*********************

"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे!
आणि ते जास्त परिणामकारक आहे"

संवादिनी said...

@ अनिकेत - धन्यवाद.

@ मंजिरी - धन्यवाद. मला आताशा ते पटायला लागलंय. आपल्यापेक्षा आपल्या छबीचंच महत्त्व जास्त असतं. ह्या सगळ्या गोष्टी लिहिणं म्हणजे मनाशी उजळणी करण्यासारखंच आहे. कधी कधी त्यातूनंच आपला थिटेपणा जाणवतो.

@ काव्या - धन्यवाद. नॅक बिक काही नाही. मला वाटतं माझा टाइपिंग चा स्पीड चांगला आहे. वाटतं तसं पटापट उतरवता येतं. पण तरीही कौतूक केल्याबद्दल थँक्स.

@ मैथिली - अगं खरंच अहो जाहो नको. आपण बहुतेक एकाच वयोगटातल्या असू. गंमत बघ. मी त्याच त्याच गोष्टींचा विचार करून करून कंटाळते आणि त्या विचारांपासून सुटका म्हणून लिहिते आणि आपला सगळा ताण वाचकाच्या माथी मारते. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? पण लिखाणाचं य्श बीश म्हणालीस त्याने एकदम अंगावर मूठभर मांस चढलं (अरेरे, धावा आता वजन कमी करत)

@ दीप - अरे देवा, केवढी ही मोठी कमेंट. तुला एक गंमत सांगू का, तुझ्या कमेंटस चा का नाही एक ब्लॉग सुरू करत? त्यातही विचार असतातच की. आमच्या पोस्टचा संदर्भ काढून टाकलास तर मस्त पोस्ट तयार होईल. हा आपला एक आगावू सल्ला. टायपो चुका असायच्याच. आपण लिहिलेलं वाक्य हे ब्रम्हवाक्य आहे अशा थाटात पुन्हा वाचयाचा आळस केला की असंच व्हायचं. जित्याची खोड. अंथरूण पुस्तकी आहे बरोबर. हंतरूण बोलीभषेतला. अर्थ एकच. भापो झालं म्हणजे झालं. बाकी मी कुठे सगळं शास्त्र्शुद्ध लिहायला? आणि चूक झाली माझी तरी मी मान्य करणारे थोडीच? गाण्यांचा ब्लॉग? अरे हो जास्वंदीचा तो ब्लॉग ऐकला. कसला सही आहे. पण कष्टपण आहेत रे तेवढेच. खरंतर ह्या आठवड्याला एक गाणंच टाकायचा विचार करत होते. पण ते बरोबर रेकॉर्ड होत नाही. तानपुऱ्याचा आवाज पलिकडल्या गावातून आल्यासारखा येतो आणि माझा आवा कानात शिरून माशीने गाणं म्हटल्यासारखा येतो. मी बाबाला जुनी एखादी रेकॉर्ड दिजिटल करून पाठ्वायला सांगितल्येय. आली ह्या आठवड्यात तर पुढच्या आठवड्यात लावीन.

Dk said...

अगं बाई कमेंटसचा ब्लॉग सुरू केला ना तर ते संदर्भा रहित स्पष्टीकरण होईल पण बघतो फार न एडिटता जमतय का ते :)

चूक झाली माझी तरी मी मान्य करणारे थोडीच? हेहेहे तू चुक मान्य करावीस म्हणून नव्हतो म्हणालो.
जास्वंदीचा तो ब्लॉग ऐकला सही आहेच पण कष्टपण होय कष्ट आहेतच म्हणूनच मी एक आयडिया करणार आहे माझाही गाण्यांचा ब्लॉग काढायच काम जास्वंदीलाच आऊटसोर्स करणार आहे :) (का कस ते सविस्तर माझ्या ब्लॉगवर लिहिलेलच आहे मी तेवढच तुला माझ्या ब्लॉगवर जायला मोटीव्हेशन ;) )

पुढच्या आठवड्यात लावीन>> नक्की लाव.

तुम्हा लोकांच मला खरच फार कौतुक वाटत तानपुऱ्याचा आवाज नीट येत नाही वगैरे कारण सुचून तुम्ही लोक रेकॉर्ड वगैरे डिजीटल करता आमच्या सारख्या कानसेनांसाठी ;) आणि मी मुलुखाचा आळशी की स्वतः च्या ब्लॉगवर न लिहिता आता गाण्यांचा ब्लॉग आऊटसोर्स करणार असा विचार करत बसतो.

प्रो. गायकांची बातच न्यारी आहे आणि आमच्या सारख्यांची चैनच चैन!!

हां जाता जाता मी लिहिलेल्या कमेन्टसचा ब्लॉग काढण्याचा आगाऊ सल्ला आवडला :)

मैथिली - अगं खरंच अहो जाहो नको> अगं बाई ती साधारण १० पास वयोगटातली असेल. तरी नशीब तुला काकू म्हणत नाहीये ;)

फिरून पुन्हा: आपला जर गुगलेश्वरांकडे अकाउंट असेल तर त्याचा इ पत्ता अस्मादिकांना मिळेल काय? काम होत!