Thursday, March 26, 2009

नाती आणि आठवणी

खूप खूप दमलेय.

आताच ऑफिसमधून परत आले. कामाचा व्याप विलक्षण वाढलाय अचानक. दिवसभर मीटिंगच मीटिंग चालल्यात. पण त्यात एक विलक्षण आनंद आहे. आपण केलेलं काम कुणालातरी आवडतंय. आपलं काही महत्त्व आहे आपल्या ऑफिसमध्ये ह्या गोष्टी जरी अहं सुखावणाऱ्या असल्या तरी हव्या हव्याशा आहेत. गंमत आहे. काम खूप वाढल्याचा त्रास आहे, पण आपण महत्त्वाचे आहोत ह्याचं समाधान आहे. आपल्या चाकरांना ते महत्त्वाचे आहेत असं भासवून किती मालकांनी आपापले खिसे भरले असतील कुणास ठाऊक.

असो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा लवकरच येईल. तसं आमच्या ऑफिसमधे त्यांनी कळवलंय. इतकी वाट कोणत्याही गोष्टीची पाहिली नव्हती, तितकी ह्या व्हिसाची पाहिली. तसा मला येऊन जास्त वेळ झाला नाहीये. लग्न व्हायच्या आधीही मी इथेच होते कित्येक दिवस, पण आता तो सतत जवळ असावा असं वाटतं. एका नात्यातून दुसऱ्या नात्यात शिरल्याने एवढा फरक पडावा?

काल एक गंमत झाली. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगला गेले होते. कानाला गाणं चाललं होतं. काय झालं कुणास ठाऊक, एकदम कशात तरी पाय अडखळला आणि धम्मकन पडले. समोरून एक मुलगा धावत चालला होता. तो पटकन आला, उठायला मदत वगैरे केली. खरं मला काही लागलं नव्हतं, पण असं कुणासमोर धसमुसळेपण केल्यानं फारच एंबॅरॅसिंग झालं. मुलगा छान होता. उंचापुरा, देखणा. म्हटलं चला, एवढं पडले ते अगदीच फुकट नाही गेलं. बाई पुरे, लग्न झालंय आपलं. पण खरं सांगायचं तर लग्न झालं म्हणून आजूबाजूची देखणी मुलं काय कमी देखणी होतात का? पण नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात. आणि त्या कायद्यांची पण मोठी गंमत आहे. तुमच्या मनात काही चुकीचं असो किंवा नसो. त्यातून काही चुकीचे संकेत गेले तरी तुम्ही अट्टल गुन्हेगार ठरता.

नवऱ्याशी बोलत होते. त्याला सांगितलं हे. त्याला म्हटलं, तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला, पण एखादी चांगली पोरगी दिसली की बघितलं जातंच. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त बघणारंच असशील तर. आणि तुलाही नको, मी कुणाला बघितलं तर. हो म्हणाला. तसा समजूतदार आहे.

विन्या दुबईला चाललाय. एक दिवस सटाक त्याचा फोन आला. म्हणाला ताई मी चाललो दुबईला. त्याला काही बोलून दाखवलं नाही, पण मनातून मला वाईटच वाटलं. एकतर सध्याच्या परिस्थितीत लोकं दुबईवरून पळ काढतायत असं बातम्यांत ऐकतेय आणि हा तिथे कशाला तडमडायला चाललाय असं वाटलं. पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना, अशी त्याने स्वतः तयार केलेली म्हण आहे, त्यामुळे तो जाणार म्हणजे जाणार.

पण त्याहीपेक्षा आता आई बाबा अजून एकटे होणार ह्याचं जास्त वाईट वाटलं. मुलगी लग्न होऊन गेली की ती दुसऱ्याची झाली आणि मुलगा परदेशी निघून गेला तर? आपला असूनसुद्धा जवळ नाहीच ना. हा विचार मनात आला आणि लगेच वाटलं की मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर काय वेगळं करतेय? माझ्यामुळे त्यांचा मुलगा देश सोडून चाललाच आहे ना? असो, आई बाबांचं दुःख जास्त बोचतं मनाला. सासू सासऱ्यांचं तितकंसं नाही. प्रॉब्लेम एकंच पण नातं बदललं की त्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलतो बघा.

घरी फोन केला मग. बाबा नव्हता. आईशीच बोलले. अख्खा वेळ तिचं विनोबा आख्यान चाललं होतं. कौतुकंच करत होती त्याचं. पण आमच्या आईला ना, मनात असेल तरी सांगता येणार नाही की तो जातोय ते तिला नाही आवडत आहे. आणि हेही तितकंच खरं की कितीही प्रयत्न केला तरी तिला ते लपवता येणार नाही. आम्हा दोघांच्यात विन्या तिचा जास्त लाडका. आणि बाबाची मी. दिसायला तो डिट्टो आईसारखा आणि मी डिट्टो बाबासारखी. राहून राहून मला जुने दिवस आठवत राहिले. जुन्या मैफिली घरगुती आठवल्या.

दिवस निघून जातात पण आपल्या मनावर आठवणी कायमचे कोरून जातात. त्यांना आठवून आपल्याला खूप आनंद होतो, जेव्हा त्या घटना परत घडणं सहज शक्य असतं. पण एकदा का पुनरावृत्तीच्या शक्यता विरळ व्हायला लागल्या की मात्र त्याच आठवणी डोळ्यात रडू आणतात.

नात्यांचे संदर्भ आणि आठवणी ह्यांचंही काही नातं असेल का?

- संवादिनी

9 comments:

Dk said...

ह्म्म्म ऑफीस ऑफिस चालू झाल का ग्रेट!
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहोंचा व्हिसा हेहे हेच जास्त महत्वाच होत नं आजच्या अजेंड्यावर ;) बादवे अहो ब्लॉग लिहितात का?

^^नात्यांची लेबलं लागली की मग त्यांचे कायदे येतात.^^ हे वाक्य एकदम गौरी, सानियासारख आहे आवडलच एकदम

तू लग्न झालं म्हणून इतर पोरी बाळींकडे बघायचं सोडलंस का? तर म्हणाला खरं सांगायचं तर प्रयत्न केला>> आयला तू अस विचारलस अशक्य आहेस हेहे आणि आमच्याइकडची सो कॉल्ड कपल्स तू हिच्याकडे का बघितलस आणि तू ह्याला फोन का केलास ह्यावरून ब्रेकअप करतात माठ एकदम माठ.

पण आले विनोबांच्या मना तेथे कोणाचे चालेना हाहाहा

खुपदा मनात आल होत आत्ता बोलतोच एकदा तुझ्या ह्या सुखी चौकोनी कुटुंबाला भेटता येईल का? जास्त नाही गं "कोल्हापुरी चिवडात" चहा कॉफी घेऊ मिसळ खाऊ बस्स्स काय योग येईल का?


बादवे माझ्या मोठ्या मोठ्या प्रतिसादांची सवय झाली असेलच. अगं मी पण करतोय आता तयारी नव्या पोस्टसची "महान ब्लॉग अन् लहान प्रतिसाद" हेहे


आपला जर गुगलेश्वरांकडे अकाउंट असेल तर त्याचा इ पत्ता अस्मादिकांना मिळेल काय? काम होत!

किंवा आमचा पत्ता देतो इ पत्र पाठवा

Dk said...

kuldeep1312@gmail.com visrloch mee :(

Unknown said...

मस्त!

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

mast!!:)

te nati,kayda vakya too good!!

HAREKRISHNAJI said...

कश्या आहात

Sneha said...

hay sam.. baryach diwasaani vachal tula ... jamala tar mail tak bolan nahi jhal barech diwas

संवादिनी said...

@ दीप - अहो आणि ब्लॉग? नाही बुवा. मराठी तर अशक्य आहे, इंग्लिश चांगलं लिहू शकेल, पण लिहिलं पाहिजे ना? आपल्या भावना वगैरे व्यक्त करण्यासारख्या फडतूस कामांसाठी वेळ नसतो सगळ्यांना बरं. पोरींकडे बघतो का एवढं विचारायला काय झालं? मला उत्तर माहीत होतं पण तरीही विचारलंच.

@ भाग्यश्री - धन्यवाद.

@ हरेकृष्णाजी - आता तुम्ही पण मला अहो जाहो करायला लागलात? अगं तुगं जास्त बरं वाटतं. मी मजेत आहे आणि तुमच्या ब्लॉगवर नियमीत येत असते. बरेचदा गिरगावातलं काही वाचायला मिळतं, कधी गाण्या बजावण्यातलं काही दिसतं. बरेचदा ओळख झालेले पण बरेच दिवसात काही संपर्क नसलेले लोकही दिसतात आणि खूपंच बरं वाटतं.

@ स्नेहा - अगं मी कुठे जाणार. मेल केलाय. तूच हल्ली गायब झालेस.

Shreya Bapat said...

Hi,

Khoop sundar lihilay! Me pan atta hech anubhavtey. Me aai-baba pasun lagnantar door aale, Bahrain la. Ani aata maza bhau pudhil shikshanasathi Indiachya baher jaychya vicharat aahe. Tumhi lihilela agadi khara aahe!!

Shreya