Thursday, August 6, 2009

रेघोट्या

शेजारच्या घरातल्या आजी परवा दुपारी फिरायला गेले होते तेव्हा रस्त्यात भेटल्या. त्यांचं नाव करीन. मी त्यांना म्हटलं एका सुंदर बॉलीवूड ऍक्ट्रेसचं नाव करीना आहे. तर म्हणतात कशा, सुंदर आहे ना खूप? म्हटलं हो. मग म्हणाल्या तू मला करीन ऐवजी करीना म्हण. म्हटलं बरं. ह्या आजी त्यांच्या नवऱ्याबरोबर राहतात. आमच्या अगदी बाजूच्या घरात. नवऱ्याचं नाव डेव्ह. मला त्यांच्याशी नीट ओळख करायचीच होती. मग लगेचच त्यांना चहाला बोलावलं.

त्याचीही एक गंमत झाली. इथे "टी" ला बोलावलं तर त्याचा अर्थ संध्याकाळचं जेवण असा घेतला जातो. त्यामुळे ओळख नसताना कुणी एकमेकाकडे "टी" ला जात नाही. हा आधी शिकलेला धडा मी विसरले आणि त्यांना टी ला बोलावलं. आजी बाई जराश्या संकोचल्या म्हणाल्या "टी" नको, आम्ही फक्त थोडा वेळ येऊन जातो. मग माझं आपलं भारतीय आदरातिथ्य उफाळून आलं. म्हटलं चहा नको तर कॉफी करेन. मग आजीबाईंच्या सगळा घोळ लक्षात आला आणि माझ्याही. शेवटी फक्त चहाच प्यायला बोलावलंय हे कंफर्म करून करीना आजीबाई गेल्या.

शनिवारी संध्याकाळी पाचाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. करीनाआजी आणि डेव्ह आजोबा वेळेवर हजर. आजींनी जुन्या धाटणीचा एक ड्रेस घातला होता. गळ्यामध्ये मोत्याची सुरेख माळ. आजी चपला न काढताच आत घुसल्या. मला घरात कुणी चपला घालून आलेलं अजिबात चालत नाही. पण त्यांना सांगणार कसं. तितक्यात आजोबांनीच आजींना पाठी खेचलं. आणि चपला कुठे काढायच्या हे मला विचारलं. बहुतेक आमच्या पायात चपला किंवा बूट नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं असणार.

मग थोड्या इकडच्या, तिकडच्या गप्पा झाल्या. आम्ही कुठून आलो काय करतो वगैरे आजोबांनी विचारून घेतलं. सगळ्या विषयांत त्यांना भारी रस. अगदी भारतात सासऱ्यांच्या वर्कशॉपमध्ये काय चालतं इथपर्यंत सगळं विचारलं. ते स्वतः खाणकामगार होते. आता रिटायर झालेत. पण त्यांची एकंदरीत शरीरयष्टी बघून ह्यांनी अनेक वर्ष अंगमेहनतीचं काम केलं असणार हे कळत होतं. आजी लोकल काउन्सिल मध्ये कामाला होत्या. त्यांनीही रिटायरमेंट घेतली होती. इथे एक गंमत आहे. माणसं अमुक एक वय झालं की रिटायर होत नाहीत. त्यांना वाटेल तेव्हा होतात आणि त्यांना वाटेल तितकी वर्ष ती काम करू शकतात.

आजोबांना चाय लाटे भयंकर आवडतो असं आजींनी बोलता बोलता सांगितलं होतं. त्यामुळे मी आजोबांना इंडिअन चाय लाटे बनवलाय असं सांगितलं. इंडियन चाय लाटे म्हणजे अर्ध्या दुधाचा कडकडीत उकडवून केलेला ताजमहाल चहा! बेकरीतून नवऱ्याने पेस्ट्रीज आणल्या होत्या आणि चितळ्यांच्या बाकरवड्या आमच्या घरी खोक्यांनी पडलेल्या असतात त्या काढल्या. घरी केलेला चिवडा काढला. झाली तयारी. आजोबांना बाकरवड्या खूप आवडल्या. आजींना कवळी असल्यामुळे त्या नीट खाता येणार नाहीत हे आजोबांनीच आम्हाला सांगितलं आणि आजी चिडल्या. मला एकदम पुलंच्या पेस्तनकाका आणि पेस्तनकाकूंचीच आठवण झाली. चहा मात्र दोघांना खूप आवडला. आजोबांनी तर पुन्हा मागून घेतला.

मग बराच वेळ ते दोघं खूप बोलत राहिले. आम्हालाही खूप बरं वाटलं. परदेशात आलेले आम्ही दोघं. त्यात ह्या गावांत भारतीयांचं दर्शन कमीच. आधीच्या शहरी तसं नव्हतं. ओळखी झाल्या होत्या. मित्रमंडळ जमलं होतं. इथे आल्यापासून प्रथमच कुणी घरी आलं, खूप बरं वाटलं. कुठे कुठे फिरून जमवलेल्या भिंतीवर लावलेल्या एकेका शोपीसचं जेव्हा आजोबांनी भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाच अगदी पिसासारखं हलकं वाटलं. घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे.

बऱ्याच गप्पा झाल्या. आजोबा आजींना एक मुलगी आहे, तिलाही दोन मुलं आहेत. नातवंड मोठी हुशार आहेत. खेळात आणि अभ्यासातही पुढे आहेत. त्यांनी काढलेली ड्रॉइंग्ज बघायला लगेच आजींनी मला आमंत्रण दिलं. त्यांची मुलगी इथे नसते ती दुसऱ्या शहरात आहे. तिचा नवरा चायनीज आहे आणि त्याने बनवलेलं चायनीज आजोबा आजी दोघांनाही अजिबात आवडत नाही, इथपर्यंत गोष्टी झाल्या. वेळ कसा गेला कळलं नाही.

शेवटी आजी आजोबा जायला निघाले. आम्ही दोघंही त्यांना सोडायला दरवाज्यापर्यंत गेलो. आपले संस्कार कुठेतरी खोलवर मनात रुजलेले असतात आणि काही गोष्टी प्रतिक्षिप्त क्रिया असल्यासारख्या आपण करतो. दुसऱ्या देशी, दुसऱ्या संस्कृतीत कुठेतरी त्यांना आवर घालून ठेवावा लागतो. मला खूप वाटलं, त्यांना वाकून नमस्कार करावा. पण नाही करता आला. त्याऐवजी आजींनी जवळ घेऊन गालाला गाल लावला. अतिशय मायेने त्यांनी पाठीवरून हात फिरवला. एकदम थेट आजीच आठवली. अगदी मनात येईल तेव्हा मी आजीकडे जायचे. जे खावंसं वाटेल ते सांगायचे आणि तीही करून घालायची. आजी भारतात हरवली आणि आम्ही इकडे हरवलो. शेजारच्या आजी आजोबांची मुलगी दुसऱ्या शहरात हरवली आणि ते इथे.

आईचं रेघोट्यांचं पेंटिंग आठवलं. आमच्या हॉलमध्ये समोरच लावलेलं आहे अगदी. तिचा विचार हा की माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं.

असं बनतंय आमचं इथलं रेघोट्यांचं पेंटिंग.

19 comments:

अनिकेत said...

लेख आणि लेखन शैली दोन्ही आवडले :-)

Nivedita said...

खूप सुंदर लिहिलं आहेस! मस्त!

mugdha said...

" घरी पाहुणे येणं ही घरातल्या बाईची एक गरज आहे असं मला वाटलं. तिने छान ठेवलेल्या घराचं कुणी केलेलं कौतुक ऐकणं हे फक्त लोकांना घरी बोलावल्यावरच शक्य आहे." अगदी, अगदी संवादिनी मलाही असंच वाटतं नेहमी..
नेहेमीप्रमाणेच छान लेख !!

Manjiri said...

mastch ga!

Jaswandi said...

khup sahi..vachun khupch chhan vatala... :)

Ajay Sonawane said...

lekh khupach aavdala ...

Deep said...

Hmmm _/\_ :)

faar faar awadly he. ka kon jaane mansala maans vishesh karun olkheeche kinwa navin... pan maans laagtaat!! mala aadhe vaatl hote ki he sagle khare naste all this is emotional drama but when I'm in pune now kalun chukty ki olkheechee or navi maanse kiti prkrshaane jodawee as vaaty! unfortunately te tase nahi hote aso.. jaude to vishy ithe nako.

shama tu tuzee thevneetlee vaaky kaaym lihites phaar kalpak ritya!

{aata nehmi parmane mhnsheel kiti moth post aawdle na mag bharun paawl pan kaaye mi nust chaan/ aawdl naahi lihu shkt! may be coz bheed main bhe tanha hu kida situation)

Deep said...

mi tula n vicharta shevtchee sign line coy paste kartoy ha!

यशोधरा said...

मस्त जमली आहे ही पोस्ट!

Vidya Bhutkar said...

Really nice post. Very touching and very true. :P
-Vidya.

a Sane man said...

chhan zalay!

Samved said...

as i said, Samwadini is back! Good one

संवादिनी said...

@ अनिकेत, निवेदिता, मंजिरी, अजय, यशोधरा, विद्या, निमिष - तुमच्या अभिप्रायाबद्दल मनापासून थँक्स.

@ मुग्धा - बघ ना. आपण एवढी सजावट वगैरे करतो, मग एवढ्या मेहेनतीचं चीज व्हायला थोडी शाबासकीही हवीच की.

@ जास्वंदी - तुला छान वाटलं ना? म्हणून मलाही वाटलं.

@ दीपक - नो प्रॉब्लेम. अगदी मला न सांगता वापरलंस तरीही काही हरकत नाही. एकदा वाक्य लिहिलं की दुसऱ्यांचं झालं वगैरे एका महान लेखकाने लिहिलेलं मी शाळेत वाचलं होतं. तेवढं जरी निरंकार होता येत नसलं तरी तू बिनधास्त घे. नो प्रॉब्लेम.

Maithili said...

reghotyanpasoon phakt guntach naahi tar ek vishw hi banu shakate he pahilyandach jaanavale. sahi..

भानस said...

अप्रतिम!! जियो.

Sakhee said...

reghotya saheech aahet.

प्रशांत said...

मस्त. सुरेख.

"कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. "
हे एक नंबर.

sahajach said...

मस्तच आहे ग पोस्ट आणि तुझे लिखाणही एक नंबर....आता एक एक करून तुझ्या सगळ्या पोस्ट वाचून काढायच्या आहेत....
तन्वी

सुधन्वा आगवेकर said...

Blogger's Park mule mala tumchya ya blog post baddal kalale. Khupach chaan aani marmik shabdat sampoorna anubhav tumhi sangitla aahe aani tyatu yenari bhavani dekhil khup sundar prakare baher aali aahe.

Sudhanwa Agawekar