Thursday, August 13, 2009

आपली गर्दी

गेल्या आठवड्यात एका खास कार्यक्रमाला गेले होते. खास अशासाठी की इथे येऊन बरेच महिने झाले, पण मराठी बोलण्याची संधी फारशी मिळत नव्हती. कोणतंही कारण नसताना आमचं सगळं मित्रमंडळ अमराठी झालं होतं. पण परवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी धन्य झाले. इतके सगळे मराठी लोकं एकत्र बघून एकदम अभिमान वगैरे वाटायला लागला. कशाचा ते माहीत नाही, पण खूप छान वाटलं.

खरंतर कार्यक्रमाची जागा आमच्या घरापासून बऱ्यापैकी दूर होती. येऊन जाऊन साडेतीन चार तासाचा प्रवास होता. मला कार्यक्रमाबद्दल माहिती होती, पण माझ्या नवऱ्याला मराठी कार्यक्रमात वगैरे फार रस नाहीये. मग त्याला बिचाऱ्याला एवढं ड्रायव्हिंग करून माझ्याबरोबर यायला लागलं असतं. म्हणून काही बोललेच नव्हते. अगदी आदल्या दिवशी चुकून (थोडंसं मुद्दाम) बोलून गेले, तर उत्साहाने नवरोबा तयार.

तिथे पोचलो तर इतकी लोकं होती. सगळी मराठी बोलत होती. मध्येच कुणीतरी इंग्रजी झाडणारंही होतं. बरीच मुलं मुली होती. ती मात्र सरळ इंग्लिशमध्ये बोलत होती. अगदी अनोळखी माणसंही हसत होती. बोलत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी पुस्तकांची खाण भेटली मला तिथे. आता हवी तितकी पुस्तकं वाचता येतील ह्या जाणीवेनेच एकदम छान वाटलं. बाकी काहीही मागितलं तरी बाबा लगेच हो म्हणायचा नाही. कंडिशन घालायचा. पिकनिकला जायचंय? मग अमुक रागाच्या ताना बसव, मगच जा. उगीचच नवा ड्रेस घ्यायचाय? मग अभ्यासातलंच काहीतरी कर आधी, वगैरे वगैरे. पण पुस्तक मागितलं तर मात्र दुसऱ्या दिवशी हजर. मी नुसतं पुस्तकाचं नाव घ्यायचा अवकाश. घरी माझ्या पुस्तकांनी भरलेलं एक कपाट आहे. अगदी चांदोबा, ठकठक पासून ज्ञानेश्वरीपर्यंत सगळं आहे. अर्थात ज्ञानेश्वरी मी कधी वाचली नाही. तसा तो पुस्तकांनी भरलेला टब पाहिला आणि एकदम भरून आलं.

कार्यक्रम सुरू झाला. थीम छान होती. तरुणांचा कार्यक्रम. सगळ्या लहान लहान मुलांनी कार्यक्रम बसवलेले. नाच होते, गाणी होती, नाटक सुद्धा होतं. मला तर एकदम आमच्या चाळीतल्या गणपतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आठवण झाली. तोच बाज होता. देश फक्त वेगळा होता इतकंच. एका नाचामध्ये एका मुलीने थेट मला माझीच लहानपणाची आठवण करून दिली. नाचता नाचता मध्येच तिला तिचे आई बाबा दिसले असणार. पठ्ठी नाच सोडून त्यांनाच हात दाखवत बसली. आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये एका नाचात मला परी केलं होतं. बाबा ऑफिसमधून अर्धा दिवस सुट्टी घेऊन येणार होता. नाच सुरू झाला तरी तो येईना. मग माझा चेहरा एकदम पडलेला. आईशेजारी तो दिसला तेव्हा मात्र एकदम कळी खुलली आणि मी चक्क नाच विसरून त्यालाच हात दाखवत बसले.

कशी गंमत असते ना? आई वडलांशिवाय पानही न हालणारे आपण कधी मोठे होतो, कधी त्यांचा घट्ट पकडलेला हात अलगद सोडून पुढे पसार होतो, ना त्यांना कळतं ना आपल्याला. मग कधीतरी अशा एखाद्या बेसावध क्षणी, कुणीतरी दुसऱ्याने त्याच्या आई बाबांचा घट्ट पकडलेला हात पाहिला ना, की आपल्या हातात त्यांचा हात नसल्याची जाणीव होते.

बाकीचे कार्यक्रमही छानच होते. मुळात सगळी मुलं असल्याने कार्यक्रमाला एक वेगळीच एनर्जी होती. त्यानेच खूप बरं वाटलं. तरुणांच्या कार्यक्रमात आपण नुसते प्रेक्षकांत बसून आहोत ह्याचं वाईटही वाटलं. पण खरंच सगळी मुलं विशीच्या आसपासची होती. मीही हळूहळू तरुण वयोगटातून रिटायर होत आहे असं उगाचच वाटलं. नवऱ्याला सांगितलं तर नुसतं हसला. म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट. ह्याला काय उत्तर देणार? म्हटलं गप, मराठी कार्यक्रमात मराठी बोल उगाच इंग्लिश झाडू नको.

कार्यक्रम संपल्यावर जेवण पण होतं. ते ठीकंच होतं, पण सगळे लोकं आपापसात बोलत होते. कुणी कलाकारांचं जाऊन कौतुक करत होते. कौतुक म्हणजे कलाकाराचं इंधनच. पटकन मला वाटलं किती महिने झाले आपण परफॉर्म केलं नाही? पण एकंदरीतच लोकांच्या उत्साहात मी परफॉर्म करत नसल्याचं दुःख मागे पडलं. गर्दी खूप होती, पण आम्ही कुणालाच ओळखत नव्हतो. हॉलच्या एका कोपऱ्यात दोघंच उभे होतो. कुणी ओळखीचं दिसण्याची शक्यता नव्हतीच, पण तरीही ओळखीचे चेहरे शोधत राहिलो. नवरा म्हणाला निघूया का, म्हटलं थांब पाच मिनिटं.

ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो.

असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?

5 comments:

Deep said...

ह्म्म्म्म शमे,

सह्हीच लिहिलय! एकदम टॉप!! "असलेलं नको असणं आणि नको असलेलं हवं असणं, कुणाला चुकलंय?" _/\_


मीही हळूहळू तरुण वयोगटातून>> हाहाहा हे असं कधीपास्न वाटतय तुला? ;) म्हणाला तू हो म्हातारी आय ऍम यंग ऍट हार्ट.>> हेच बरोबर आहे :)
मराठी पुस्तकांची खाण>> ह्म्म वॉव काय काय घेतलस?
आता जाता जाता एक प्रश्न: "जीलांब" हे जे काय लेबल लावलस ना त्याचा अर्थ काये?

मी काय तुझी वाक्य ढापणार नाहीये तुझ्याच ब्लॉगच्या (दुव्यासकट) लिंकसकट पब्लिश करणारे :P

Ajay Sonawane said...

"ओळखीची नसली तरी ती गर्दी आपली वाटत होती. देशामध्ये गर्दीला नाकं मुरडणारी आम्ही, देशाबाहेर पडलो की मात्र तीच हरवलेली गर्दी शोधत राहतो."

हे वाक्य खुप भावुन गेलं...लेख छान जमलाय.

Maithili said...

I realy like this post.....
khoopach chhan

संवादिनी said...

@ दीपक - जिलांब हा कोड वर्ड आहे. मझा एकटीचाच बरं का, दुसऱ्या कुणाला माहीत नाहिये तो. पंचवीस वर्षांनंतर वाचताना मला कळायला नको मला नक्की कशाबद्दल लिहायचं होतं पंचवीस वर्षापूर्वी? म्हणून तो आहे. त्याचा अर्थ कळण्याचा कोणताही फायदा वाचकांना नाही.

@ अजय - धन्यवाद. हा खरंच माझा अनुभव आहे. इथे खूप बरं वाटतं अगदी कोलाहल, गलका आणि गर्दी असली की. कारण एरवी सारं कसं शांत शांतच असतं.

@ मैथिली - थँक्स. मी तुला टेंप्लेट बद्दल मेल केली होती ती मिळाली का? कारण तुझं काही उत्तर आलं नाही म्हणून विचारतेय.

Deep said...

अर्थ कळण्याचा कोणताही फायदा >>>> haahhaa phaaydaa vhaavaa asa hetu hee naahiye :) arth samjla naahi mhnun vicharle itkech. (tevdheech gyaanaat bhr padlee astee itkch pan code lingo nako sangus tuzee. hahaha