Thursday, September 3, 2009

हरवलेली माणसं

रोज साधारण दुपारी दोनच्या सुमाराला आमचा पोस्टमन येतो. इथला पोस्टमन आणि आपला देशी पोस्टमन ह्यात जमीन असमानाचं अंतर आहे. आपला डोक्याला टोपी घालतो, तर ह्याच्या डोक्याला असतं हेल्मेट. आपला सायकल चालवतो तर ह्याला मिळते लुनासारखी बाइक. मग हा पाठीला दप्तर लावून फुटपाथवरून लुना चालवत चालवत प्रत्येक घराच्या समोर थांबतो. सगळ्या पत्रांचा रबरबँड लावून एक गठ्ठा केलेला असतो आणि तो गठ्ठा घराच्या लेटर बॉक्समध्ये टाकून स्वारी पुढच्या घराकडे वळते.

हल्ली पत्र हा प्रकार फक्त घेणेकऱ्यांनी देणेकऱ्यांना पाठवायचाच उरलेला आहे. आमचा लेटरबॉक्स टेलिफोन, इलेक्ट्रिसिटीची बिलं किंवा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट असले फारसे आवडीचे नसलेले प्रकार सोडले तर बाकी इथल्या तिथल्या मॉल्सचे कॅटलॉग्ज, टेक अवे च्या जाहिराती वगैरे वगैरे कचऱ्याच्या टोपलीत (नव्हे रिसायकल बीनमध्ये ) टाकायच्या लायकीच्या गोष्टींनी भरलेला असतो.

पण तरीही पोस्टमन येऊन गेला की ताबडतोब बाहेर जाऊन आपली पत्र घेऊन यायला मला आवडतं. असंच परवा पोस्टमन साहेब येऊन गेल्यावर मी पटकन अंगणात उतरून पत्र आणायला गेले. रोजचा कचरा होताच. पण एक पत्र वेगळंच वाटलं. माझ्याच नावाचं होतं. वेगळंच म्हणजे चक्क हाताने त्यावर माझं नाव आणि पत्ता लिहिला होता. उलटं करून पाहिलं तर कुणाचा पत्ता नव्हता. हं. नाही म्हटलं तरी थोडी उत्सुकता वाढलीच. मनात माहीत होतं की हे काही कामाचं पत्र नाही.

घरात शिरले आणि पत्र उघडलं. चक्क हाताने लिहिलेलं पत्र होतं. भरभर वाचून काढलं. चक्क जग्गूंचं पत्र होतं. किती मोठ्ठं असावं? दोन मोठे फुलस्केप भरून. मला एकदम कसंसंच वाटलं. भारत सुटल्यापासून मी त्यांना पत्र फोन वगैरे काही करण्याचा वीचारसुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कधी मधी बाबाकडून कळायचं त्यांच्याबद्दल. हल्ली पाय दुखतात म्हणून पॉइंटापर्यंत जात नाहीत, वगैरे माहीत होतं. पण ह्या उप्पर काही विचारण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि बाबाने त्याहून अधिक काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्यांनी चक्क बाबाकडून माझा पत्ता घेऊन मला पत्र पाठवलं. अगदी सगळं सगळं लिहिलं. आमच्या नाना नानी ग्रुपबद्दल लिहिलं. एका आजोबांना तिसरी नात झाली म्हणून त्यांच्या मुलाला शिव्या देऊन झाल्या. म्हणे मुलासाठी कशाला देशाची लोकसंख्या वाढवता? एका आजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं. त्या आता फिरायला येत नाहीत. स्वतःबद्दलही खूप लिहिलं. गाण्याचे कार्यक्रम वगैरे जोरदार चाललेत म्हणे. गणपतीचे कार्यक्रम कुठे कुठे काय काय आहेत आणि ते कोणते कोणते पाहायला जाणारेत.

एकदम मस्त वाटलं. आपल्याकडे असलेली एखादी छानशी वस्तू आहे हेच आपण विसरून जातो आणि कधीतरी साफसफाई करताना एकदम ती वस्तू डोळ्यासमोर येते आणि नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं तसं झालं.

जुने दिवस आठवले. रोज सकाळी न चुकता जायचे मी फिरायला. समुद्राचं वेड होतंच पण आमच्या नाना नानी ग्रुपचं त्याहून होतं. सगळ्या ओल्डीजमध्ये मी एकटी विशीतली होते. सगळ्यांची लाडकी नात. आणि जग्गूंची आणि माझी तर विशेष मैत्री. कारण आम्ही घरी चालत एकत्र जायचो. आणि तो माणूसही असा इंटरेस्टिंग की खूप मजा यायची. त्यांच्या गमती जमती विनोद वगैरे सांगायची पद्धतही खूप छान होती.

पण वेळ बदलते तसं आपलं जग बदलतं. जुने लोकं दूर होतात, नवे लोकं जवळ येतात. रहाटगाडगं चालू असतं. पण कधीतरी असं जुनं काहीतरी आठवतं. वाईट वाटतं. म्हणजे जुने दिवस गेले ह्याचं नाही वाईट वाटत. कारण तेव्हा जी मजा करायची होती ती भरपूर केली. वाईट अशाचं वाटतं की कधी काळी आपल्या आयुष्यात रोजच्या असलेल्या व्यक्तींना आपण पार विसरतो ह्याचं. जग्गू वन्स वॉज लाइक अ बेस्ट फ़्रेंड.

असो, तर अशी त्यांच्या पत्राची मजा. मग मीही त्यांना पत्र लिहायला घेतलं, पण अर्ध्यावरच लक्षात आलं की मला त्यांचा पूर्ण पत्ता कुठे माहितेय, त्यांनी पत्रातही लिहिला नव्हता. जुनी एक सुटकेस आहे माझी, त्यात माझं जुनं सामान भरलंय. ती उपडी करून त्यातून माझी जुनी डायरी शोधायचा प्रयत्न केला. नाही सापडली. जुन्या फोनमध्येही पाहिलं. त्यातही नव्हता. मग सरळ बाबाला फोन केला, त्याला विचारलं त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे जग्गूंचा फोन असण्याचं कारणंही नव्हतं. तो म्हणाला मी त्यांना विचारून देतो म्हणून. पण मला ते नको होतं. मला आताच्या आता त्यांच्याशी बोलायचं होतं.

खूप शोधाशोध केली. नाही सापडला. मग स्वतःवरच चिडून खिडकीत जाऊन बसले. हरवलेली माणसं शोधत.

4 comments:

अनिकेत said...

छान जमली आहे पोस्ट.

पत्रात जी मज्जा आहे ती इमेल मध्ये कुठे. फार-पुर्वी पेन-फ्रेंड नावाचा एक प्रकार प्रचलीत होता. म्हणजे आताही आहे, पण फारच विरळ झाला आहे. तर त्याकाळी ऑस्ट्रेलियामधील एक युवती माझी पेन फ्रेंड होती. तिला पत्र लिहीण्यात किंवा तिच्याकडुन आलेली पत्र वाचण्यात मज्जा यायची.

हळु-हळु पत्रांची जागा इ-मेल्स ने घेतली. पण खरं सांगु त्यात ती जम्मत नाही. आपलं उगाचचं Gr8 किंवा LOL कसले हे अपभ्रंश छ्चा.

Anonymous said...

tu khupach chan lihtes!!vachun mast vatat..harvun jayala hote!! I always keep waiting for your posts!! keep writing!!

संवादिनी said...

@ अनिकेत - हो पूर्वी पेन फ्रेंडचं खूपंच होतं. माझीही एक पेन फ्रेंड होती. आता त्या संस्थेचं नाव आठवत नाही पण त्यांच्याकडून अशा उत्सुक मित्रांचे पत्ते मिळत असत. मला पाकिस्तानी पेन फ्रेंड मिळवायची खूप इच्छा होती पण ते शक्य झालं नाही दुर्दैवाने.

@ ऍनॉनिमस - धन्यवाद. तुमची प्रतिक्रीया वाचून खूप छान वाटलं.

@ ऍनॉनिमस काका आणि मनीष - माझ्या ब्लॉगबद्दल तुम्ही केलेल्या विचाराबद्दल आभारी आहे. हे खरं आहे की पुर्वी निषेद्धाच्या कमेंट आल्या होत्या. त्यात माझीही तेवढीच चूक होती हेही मी मान्य करते. पण बहुतेक ते दिवस पाठी सरले आहेत. नव्या दमाने नवी सुरुवात केल्यावर पुर्वीइतकं प्रेम मिळत नसलं तरी द्वेषही मिळत नाहीये ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. आपण आपला हा संवाद (वादविवाद नव्हे) असाच चालू ठेऊया, माझा इ-मेल samvaadini@gmail.com आहे. तुम्हाला जर सोयिस्कर वाटत असेल तर आपली चर्चा आपण तिथे चालू ठेऊ.

@ बाबा - हे काय? नो कमेंट? मी सांगितलंय ना आवडला नाही पोस्ट तरी कमेंट हवीच तुझ्याकडून.

Deep said...

Hey sorry vaachl pan comment karn rahunch gelo! turaataas evdhch lihito patr lihinyat majja astech pan.. sadhya epatre jaast prefer karto! suvaachy tyaapta yete aani mail kel ki uttr lagech milu shkt!

baki nishedhaachya prtikriya mhnsheel tar... mail lihitoch ahe ti vaacha :D :D