Thursday, January 27, 2011

कल्याण

सध्या आमच्याकडे प्रचंड धामधुमीचे दिवस आहेत. सईकडे पाहता पाहता अगदी नाकी नऊ येतात. रात्रीची झोप दुरापास्त नाही म्हणता येणार, पण तुटक झालेली आहे. त्यात कुंभकर्णाशीच लग्न केलंय असा भास व्हावा अशी परिस्थिती असल्याने, इकडनं किंवा तिकडनं काही मदत होण्याची शक्यता नाहीच. आणि आमची गंमत वेगळी आहे. सईला झोपवून मला स्वतःला झोप येईपर्यंत पुन्हा तिची जागं होण्याची वेळ झालेली असते. झोप येईपर्यंत रात्र रात्र करायचं काय हा प्रश्न असतो.

परत सई का रडते हा एक मोठा परिसंवादाचा विषय जेव्हा जेव्हा ती रडते तेव्हा होतो. आईला, बाबाला, मला आणि कुंभकर्णाच्या मावस भावाला सर्वांनाच तिच्या रडण्याचं कारण वेगवेगळं आहे असं वाटतं. मग कारणमीमांसेतच बराचसा वेळ निघून जातो. मग तिचं रडं थांबवण्याच्या कॢप्त्या शोधून काढायचं काम जोरात चाललंय.

गुगलबाबा आहेतच. कुणी सांगितलं हेअरड्रायरचा आवाज लहान मुलांना झोपायला मदत करतो कारण त्यांना म्हणे पोटात असताना तसाच आवाज येतो. बाबा मला गाणं म्हणायला सांगतो. उगाचच. माझा रियाज इतका झालेला नाहीये की माझ्या गाण्याने ती झोपण्याऐवजी अजून जागी होऊन रडायला लागण्याची शक्यता आहे. तिच्या बापाने, म्हणजेच कुंभकर्णाच्या मावस भावाने चक्क आयफोन ऍप्लिकेशन शोधून काढलं तिला झोपवण्यासाठी. त्यातून हृदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येतो. त्याने म्हणे बाळं झोपतात. एका मैत्रिणीनं एक सीडी आणून दिली. बाळाच्या रडण्याचे पाच प्रकार आणि प्रत्येक वेळी बाळ का रडतंय हे कसं ओळखायचं ते शिकवणारी.

एक ना एक अनेक साधनं उपलब्ध आहेत. पण आमच्या राजकन्येवर कशाचाच काहीच परिणाम होत नाही. मी बाबाला विचारलं की आम्ही कसे होतो? मजा आहे ना. आपल्या स्वतःलाच आपण कसे होतो हे आठवत नाही. बाबा म्हणाला की मी लहानपणी तानपुरा लावला किंवा संवादिनीवर सूर धरला की एकटक बघत बसायचे आणि रडायचं विसरून जायचे. हा प्रयोग सईवर झालेला आहे, पण तिच्यावर काही तानपुऱ्याचा फारसा परिणाम झाला नाही.

परवा बाबा म्हणाला कल्याण लावून बघ. कल्याण म्हणे लहान मुलांच्या मनावर चांगले संस्कार करतो. म्हटलं बरं आहे. माझ्या कडच्या ज्या काही सीडीज आहेत त्यातून शोधून एक सीडी काढली. तेवढ्यात आईनं जोरात हाक मारली म्हणून बाहेर गेले. आई काँप्युटरवर पेपर वाचीत होती. मी बाहेर गेले तशी ती म्हणाली भीमसेन जोशी गेले.

काळजात चर्र झालं. मी त्यांना कधीही भेटलेले नाही, कधी त्यांच्याशी बोललेले नाही. पण माझ्याच आयुष्यातलं काहीतरी हरवल्याचा एक क्षण भास झाला. अगदी बाबाच्या मांडीवर बसून मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. माझ्या जन्माच्या खूप खूप आधीपासून माझ्या बाबाच्या जन्माच्याही आधीपासून ते गात होते. मला त्यांचं गाणं तर आवडायचंच पण त्याहीपेक्षा आवडायच्या त्यांच्या भावमुद्रा. गाण्यामध्ये समरसून जाणं पण तरीही अलिप्त असणं. पिसाळलेल्या घोड्याला काबूत आणावं तसं बैठकीला आणि श्रोत्यांच्या मनाला काबूत ठेवणारा त्यांचा सूर आणि त्यांची नजर. सगळं क्षणार्धात नजरेसमोरून गेलं.

बाबाला सांगायला म्हणून आत गेले, तर बाबानं सीडी चालू केलेली. त्यांचाच कल्याण लागलेला. तोच तो धीरगंभीर खर्ज. सईचं रडं कसं कुणास ठाऊक त्या क्षणी मात्र थांबलेलं. माझ्या बाबांच्या मांडीवरून मी ऐकलेला अलौकिक माणूस ती कधीच माझ्यासोबत ऐकू शकणार नाही ह्याचं मला सर्वाधिक दुःख वाटलं. काळ बदलत जातो, माणसं बदलत जातात. बदलणाऱ्या काळाबरोबर हरवत चाललेली आपल्या जीवनातली श्रद्धास्थानं मात्र क्षणभर का होईना आपल्याला हळवं बनवून जातात.

1 comment: