Thursday, May 12, 2011

देवयानी (11)

कॉलेजचे सुरवातीचे दिवस असे त्रासाचे, डिप्रेसिंग गेले. अर्थात जे काही जमत होतं, जसं काही स्मजत होतं, त्याच्या आधारावर आलेल्या परीक्षांना सामोरं जाणं होतंच. अपुरी तयारी, सतत अभ्यासाचा ताण आणि तो ताण मोकळा करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध नसणं. बहुदा साडेसाती साडेसाती म्हणतात ती हीच असावी. आणि खरोखरच ती माझ्याबरोबर सात आठ वर्ष तरी राहिलीच, अगदी मराठे काकांची ओळख होईपर्यंत. अर्थात आताही मला सुखी माणसाचा सदरा किंवा बाईची साडी बिडी मिळालेय असं नव्हे, पण ते दिवस खरंच कठीण होते.

जाता जाता एक वर्ष गेलं. रडत खडत अकरावी पास झाले. कितवा नंबर वगैरे ह्याचा विचारही करण्याजोगे मार्क नव्हते. बुडत्याला काडीचा आधार तसे काठावरचे मार्क घेऊन मी पास झाले. रिसल्ट घेऊन घरी आले. घरी कुणीही नव्हतं. कित्येक तास मी एकटीच बसून होते. विचार करत. तहान भूक हरपली होती. डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. दहावीचा निकाल ते अकरावीचा निकाल ह्यात इतका फरक कसा पडला? ह्याचाच विचार करीत बसले. अकरावी पार पडल्याचं थोडं बरं वाटत होतं, पण बारावीचा डोंगर पुढे दिसत होता. कुणी अकरावीचे मार्क विचारत नाही, पण बारावीनंतर नक्की विचारणार, त्यात असे मार्क असले तर काय उत्तर द्यायचं?

आई बाबा घरी आले. अर्थातच रिसल्टबद्दल त्यांनी विचारलं. तो क्षण मला तसाच्या तसा आठवतोय. काय उत्तर द्यायचं? पण दोन क्षणांच्यावर थांबून चालणार नव्हतं. दिलं उत्तर. मारली थाप. दोघांपैकी कुणीही माझा रिसल्ट बघायला मागणार नव्हतं. इतर कोणत्या मार्गाने त्यांना तो कळणंही शक्य नव्हतं. मार्क ऐकले, आई काहीच बोलली नाही. काही बोलली नाही ह्याचा अर्थ मार्क चांगले आहेत असा होता. बाबा म्हणाले बारावीची तयारी चाललेय ना व्यवस्थित? मी हो म्हटलं. विषय संपला. गेलं वर्षभर मी कोणत्या मानसिक अवस्थेतून जात होते हे मी त्यांना सांगू शकले नाही तसं तेही कधी मला विचारू शकले नाहीत. अजूनही मी तेव्हा काठावर पास झाले होते हे त्यांना माहीत नाही. केवढं मोठं खोटं आणि केवढं मोठं दुर्दैव त्या मुलीचं आणि तिच्या पालकांचं? पालकांशी खरं बोलायची हिंमत त्या मुलीत आली नाही. ती तिच्या अंगी यावी म्हणून तिच्या पालकांनी कधी प्रयत्नही केले नाहीत.

आज आयुष्यात अनेकदा खोटं बोलायचा प्रसंग येतो. येतो म्हणजे खोटं बोलणं हा माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहे. अगदी धादांत खोटं नाही, पण अर्धसत्य तरी बोलावंच लागतं. प्रसंगी नरो वा कुंजरोवा करावं लागतं. दर वेळी खोटं बोललं की माझ्या अकरावीच्या रिसल्टची आठवण येते. खरंतर ती उभ्या आयुष्याच्या तुलनेत खूप क्षुल्लक बाब आहे. पण कुठेतरी अजूनही मी त्यांच्याशी खरं बोलले नाही हे बोचत राहातं.

असो, तर अशाप्रकारे अकरावी पार पडली. बारावीचं कॉलेज, क्लासेस करता करता दिवस कसे सरून जायचे कळायचं नाही. पण ज्वालामुखी खदखदत होताच. आल्या दिवसागणिक ताण वाढत होता. परीक्षेला अवकाश असला तरी गेल्या दिवसासरशी ती जवळ येतंच होती. घरातलं वातावरण तसंच मचूळ होतं. घरी जितकं कमी राहता येईल तितकं बरं असं म्हणून मी कॉलेजातंच वेळ काढायला लागले.

माझा असावा असा ग्रूप तोपर्यंत माझा नव्हता. कुणाशी सख्खी मैत्री नव्हती. कॉलेजाबाहेर घर सोडून दुसरी जाण्यासारखी जागा नव्हती. मग काय? कॉलेजातंच बसून राहायचं. सकाळचे क्लासेस, मग एकही लेक्चर, प्रॅक्टिकल्स न चुकवता कॉलेज, सगळं आटपलं की आठ वाजेपर्यंत लायब्ररी. काही मुलं नंतरही बसत तिथे, पण आमच्या कॉलेजपासून माझ्या घरापर्यंत जाणारा रस्ता फार सेफ नव्हता. त्याच्यामुळे मी आठाला निघायचे. रस्त्यावर तेव्हा बर्यापैकी गर्दी असते. मध्ये इस्ट वेस्ट जाणारा एकांडा पूल होता. तो पार करताना मात्र भीती वाटायची. मग मी स्टेशनात गाडी यायची वाट पाहत बसायचे. गाडी आली की कुणी ना कुणितरी वेस्ट इस्ट जाणारं असायचं. मग त्यांच्या पाठोपाठ मी जात राहायचे.

अशीच एकदा मी आठ वाजता लायब्ररीमधून निघाले. आमच्या कॉलेजातून बाहेर पडताना एक मोठ्ठं लॉन लागतं. ते पार केल्यावर गेट आणि मग मेन रोडला लागणारा रस्ता. लॉन पार करून मी गेटच्या दिशेने निघाले तेवढ्यात पाठून हॅलो हॅलो करून कुणीतरी ओरडत आलं. मला अंधारत निटसं दिसलं नाही, पण मी वळून पाहत होते. कॉलेजच्या बाहेर पडलेली नसल्याने भीती वगैरे काही वाटायचा प्रश्न नव्हता. हळू हळू ती आकृती माझ्यासमोर येऊन थांबली. जवळ आला तसं माझ्या लक्षात आलं की तो कुणीतरी मुलगा होता. खरं सांगायचं तर तो अतिशय देखणा होता.

माझं पेन लायब्ररीत राहिलं होतं आणि तो द्यायला तो माझ्या पाठी धावत आला होता. मला मी पेन बाहेर काढलेलंच आठवत नव्हतं. कारण मी काही लिखाण करतंच नव्हते आणि वाचताना पुस्तकात करायच्या खुणा मी पेन्सिलीने करत असे. पण त्याने दिलेलं पेन माझ्यासारखंच होतं. म्हणजे रेनॉल्डसचं. म्हटलं असेल. म्हणून मी ते घेतलं. थँक्स म्हटलं. मग त्याने मला त्याचं नाव सांगितलं. त्याला आपण अनुराग म्हणूया. कारण त्याचं खरं नावंही असं स्वप्नीलंच होतं. मीही त्याला माझं नाव सांगितलं आणि मी घरी जायला वळले.

- देवयानी

2 comments:

Gouri said...

अकरावी - बारावीचं अर्धवट वय, घरी संवाद नाही, मित्रमंडळ नाही. शाळेतल्या ‘हुशार’ मुलीचं कॉलेजमध्ये हरवून जाणं आणि आपल्या कोषात गुरफटणं ... खरंच अवघड दिवस आहेत हे तुझ्या आयुष्यातले.

Anonymous said...

sagle parts attach vachale...chan lihilay...kahi vela, aaplyach aayushyat mage valun baghitlyavar vatata, kharach..kasa sagla manage
kela asel apan!