Thursday, May 10, 2012

प्रश्न आणि उत्तर

मध्ये एक खासंच गंमत झाली. लिहावी का लिहू नये असा विचार बऱ्याच वेळा आला. शेवटी मनाचा हिय्या करून लिहायचंच ठरवलं. काही गोष्टी खूप हळूवार असतात पण आपल्या संसाराच्या, कामाच्या रगाड्यामध्ये कुठेतरी हरवून गेलेल्या असतात. एखाद्या जिवलग पुस्तकावर धुळीची पुटं साचली की त्या जीवलगाचं अस्तीत्वच विसरायला होतं, तसंच काहीतरी. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे.

आमच्या शाळेच्या दहावीच्या वर्गाचं रियुनिअन झालं. खरंतर मी ह्या शाळेतली उपरी. नववीच्या वर्षात मी ह्या शाळेत आले आणि दहावीत बाहेर पडले. बऱ्याच वर्षांनी आम्ही सर्वजणं भेटलो. अगदी काही लोकांना तर मी शाळा सोडल्यावर पहिल्यांदा पाहिलं.

त्यातलाच एक तो. तिशीच्या आसपास, डोळ्यावरचा चस्मा तसाच. वजन बऱ्यापैकी वाढलेलं. एका मुलाचा बाप झाल्यावर जो संथपणा आपोआपच पुरुषाच्या देहबोलीत येतो तो आलेला. बरच काही बदललेलं. फक्त एक गोष्ट मात्र तशीच. त्याची स्माइल. पण एक मात्र नक्की आता तो माझ्यासाठी तितकासा महत्त्वाचा न राहिलेला आणि बहुदा मीही त्याच्यासाठी. पण ज्या हळूवार आठवणींच्या प्लॅशबॅकमध्ये तो मला घेऊन गेला आणि कदाचित मीही त्याला घेऊन गेले त्या महत्त्वाच्या.

मी नवीनच शाळेत यायला लागलेले होते. फार कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं. जुन्या मुलींचे आपापले ग्रूप्स होते. त्यांच्या ग्रूप्समध्ये घुसायला मिळणं कठीण होतं. मलाही नवी शाळा फारशी आवडलेली नव्हती. दोन वर्ष कशीबशी काढायची आणि आपण आपलं बाहेर पडायचं हे मी स्वतःला सतत पढवत होते. मघाशी म्हणाले, तो आमच्याच सोसायटीत राहणारा. कधीमधी चुकून रस्त्यात भेट व्हायला लागली. कधी शाळेत एकत्र जायला लागलो.

पण हा मोठा मजेशीर होता. काही बोलायचाच नाही. मीच आपली त्याला काहीबाही विचारत राहायचे आणि अगदीच नाईलाज म्हणून हा उत्तरं द्यायचा. मित्रांबरोबर तो असताना मी समोरून आले की नजर टाळायचा. मला गंमतच वाटायची. मग मी मुद्दाम तो त्याच्या मित्रांसोबत असताना त्याला जाऊन उगाचंच अभ्यासाचं काहीतरी विचारायचे. एकदम वरमून जायचा तो. पण एकटा असेल तर मात्र अगदी एक क्षण का होईना वर बघून हसायचा.

गोरा गोमटा, काळा काड्यांचा चस्मा. विखुरलेले केस आणि तेच ते क्यूट स्माईल. ते वयच वेगळं असतं. प्रेम म्हणजे काय असू शकतं ह्याचा फक्त अंदाज यायला लागलेला असतो. प्रेमात पडावसं वाटत असतं पण का कोण जाणे प्रेमात पडणं भयंकर वाईट कृत्य आहे असंही वाटत असतं. मी प्रेमात पडले होते असं नक्कीच म्हणणार नाही. पण त्याचं माझ्यासोबत असणं. हसणं, शब्दाला शब्द एवढंच बोलणं हे कुठेतरी आवडायला लागलेलं. आणि त्यालाही.

वर्गात ह्या गोष्टीचं गॉसिपतर भयंकर चालायचं. मग थोडी चिडवा चिडवी, भांडणं हे सगळं आलंच. बरं तिच्या मनातलं त्याच्यापर्यंत आणि त्याच्या मनातलं तिच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिच्या मैत्रिणींनी आणि त्याच्या मित्रांनी घेतलेली असते. अशी सगळी धमाल चालू असताना एक दिवस माझ्या मैत्रिणीनी मला निरोप दिला. गणिताच्या क्लासच्या आधी अर्धा तास त्यानं बोलावलंय.

मनात खूप धाकधूक होती. एकतर दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली. अभ्यासाचं टेन्शन होतं. पण कुठेतरी हे सगळंही हवं हवसं वाटणारं होतं. तो बहुतेक आज मला विचारणार होता. विचारणार म्हणजे प्रपोज करणार होता. जावं की न जावं? शेवटी मनाचा हिय्या करून जायचं ठरवलं. आई बाबा कामावर गेलेले होते. आजीला खोटंच सांगितलं आज लवकर बोलावलंय आणि बाहेर पडले. माझ्या घरापासून साधारण पाचव्या मिनिटाला मी क्लासच्या इथे पोचायचं. पण त्या पाच मिनिटात किमान पाच हजार वेळा छाती धडधडली असेल. जे होत होतं ते हवसं होतं आणि नकोसंही.

तो तिथे आधीच आलेला होता. मी आले आणि त्याच्या बाजूला जाऊन बसले. तो जबरदस्त टेन्शनमध्ये होता. खरंतर तिथे अर्धा तास आधी जाणं हाच होकार होता आता फक्त त्याने मला विचारायचं मी हो म्हणायचं इतकंच शिल्लक होतं. ऍड दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती. पण प्रश्न विचारायला तो इतका घाबरला की त्याने प्रश्न विचारलाच नाही. मी न विचारता उत्तर द्यायचा प्रश्नच नव्हता. अर्धा तास संपून गेला आणि दहावीचं वर्षही.

कॉलेज वेगळं, विषय वेगळे. पुढे ते लोकं मुंबई सोडून गेले. कुठे गेले कधी गेले काही पत्ता लागला नाही. आज हा असा अनेक वर्षांनी भेटला. आम्ही खूप गप्पा मारल्या. हसलो, खिदळलो. आमच्या त्या इअवल्याश्या जगातून बाहेर पडल्यावर आम्ही किती काय काय केलं ह्याचे हिशेब मांडत बसलो. अगदी निरोपाचं बाय बाय करायची वेळ आली. तू मला तेव्हा का विचारलं नाहीस रे? असं अनेकदा त्याला विचारावंसं वाटलं पण नाही विचारू शकले. न विचारलेल्या प्रश्नाचं त्यानं उत्तर देण्याचा प्रश्नच नव्हता.

तेव्हा त्यानं एक विचारलं नाही आणि आता मी दुसरं. पण काही प्रश्न बहुदा असे अनुत्तरीतच ठेवण्यात गंमत असावी.



- संवादिनी



8 comments:

Yogini said...

kitee god lihilays gg.. :)
lagech pudhachi post pahun far far bara watala..

Mohana Prabhudesai Joglekar said...

सुंदर, शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या :-)

अनिकेत वैद्य said...

आता पुन्हा एकदा गुरुवार सुरु का?
लिहित रहा.

निनाद कुलकर्णी said...

काही प्रश्न अनुतीर्ण राहिले की आयुष्यभर त्या निमिताने तो प्रश्न व त्यांच्याशी निगडीत आठवणी मनाशी रुंजी घालतात.
लिखाणातील सादगी आवडेश.

aativas said...

प्रश्नच नाही म्हटल्यावर उत्तर कुठून येणार? 'अनुत्तरित प्रश्न' असं म्हणण्यापेक्षा 'अप्रश्नित भावना' असं म्हणावं का यांना?

अनघा said...

welcome back....I read all your write up when you were not writing.... keep writing...:)

Anonymous said...

nice 1 ... Bharpur ...divasani..lihiles...

i was visiting the blog..but nothing showed up... glad to c u r back... keep writing..

Nirbhay

संवादिनी said...

योगिनी, अनिकेत, अनघा, निर्भय - पुन्हा रेग्युलरली लिहायचा विचार आहे. बघुया कसं काय जमतंय ते.
मोहना - धन्यवाद, शाळेतल्या आठवणी वेगळ्याच, शब्दशः अवीट.
निनाद - खरं आहे. उत्तरं न मिळाल्यानंच बहुदा आठवणी इतक्या घट्ट टिकून असतील.
अतिवास - अप्रश्नीत भावना. एकदम पटलं.