Thursday, May 17, 2012

स्वप्न आणि सत्य

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नुकतीच माझी सी. ए. ची परीक्षा झालेली होती. करण्यासारखं काहीच नव्हतं. नाही म्हणायला आर्टिकलशिप चालू होती, पण त्यात काही लक्ष लागत नव्हतं. एका रविवारी मी आई आणि बाबा क्लबवर गेलो होतो. तिथे जाणं मला काही नवीन नव्हतं. मुंबईचे हुज हु तिथे असायचे. अर्थात बाबा म्हणायचा कि हे काही त्याचं कर्तुत्व नव्हे. त्याच्या बाबाचं. असो सांगायचा मुद्दा असा कि तिथे कधी मधी सेलिब्रिटी लोकांचं दर्शन व्हायचं. काही बाबाच्या ओळखीचेही होते.

त्या दिवशी आम्हाला सिनेमा क्षेत्रात प्रसिद्ध असलेली एक व्यक्ती भेटली. अर्थात ते बाबाच्या ओळखीचे असल्याने थोड्या गप्पा झाल्या. माझा विषय निघाल्यावर मी नाटकात वगैरे कामं करते, गाणं म्हणते वगैरे आईने उगा सांगून टाकलं. काय त्यांच्या डोक्यात आलं कोण जाणे, ते म्हणाले एका नाटकाची ऑडिशन चाललेय. तुला इच्छा असेल तर ये. तसंही काही दुसरं हातात नव्हतं, मी जायचं ठरवलं. काही मुलं मुली आलेले होते. त्या गर्दीत खरं सांगायचं तर मी बुजून गेलेले होते, पण तरी मोठा धैर्याधाराचा आव आणून मी तिथे उभी होते. एक एक करत माझा नंबर आला. मला आत बोलावलं. काय रोल आहे ते सांगितलं. रोल साधासाच होता. काय दोन चार वाक्य दिली होती हातात ती मी म्हटली आणि मी घरी आले.

एकंदरीत ह्या सगळ्या प्रकारात मला काही विशेष रस वाटला नव्हता. त्यामुळे आमच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे हा वृत्तांत रात्री घरी सांगितल्यावर आणि ह्या सगळ्या प्रकारावर भरपूर हास्य विनोद करून मी झोपी गेले. दोन दिवस काहीही झालं नाही तेव्हा मीही नाद सोडून दिला. तिथे बऱ्याच मुली होत्या, त्यांचा अनुभवही कदाचित जास्त असेल, मला तसा चान्स नव्हता. वर रोलही आजुबाजुचाच होता. माझ्यापुरता विषय संपला.

अजून महिन्याभराने सी. ए. चा निकाल लागला. कॅम्पस राउंड सुरु होत्या. आणि अचानक मला त्या सिनेमावाल्या काकांचा फोन आला. काहीही न सांगता त्यांनी मला भेटायला बोलावलं. का बोलावलं असेल हा विचार करत करतंच मी गेले. काका भारी चिंतेत वाटले. ते म्हणाले कि नाटक आठवड्यावर येऊन ठेपलंय, मुहूर्ताचा शो ठरलाय आणि ऐन वेळी नाटकाच्या हिरोईननं माघार घेतलेली आहे. आणि मी ते काम करावं अशी गळ त्यांनी मला घातली. मुळात मला मेन रोलच्या ऑडीशानला बोलावाल्म्च नव्हतं त्यामुळे हे कसं काय झालं ह्याचा विचार करीत करीतच मी घरी आले.

आई बाबांना विचारलं. दोघांनाही मी हि संधी सोडू नये असं वाटलं. त्यानंतरचे पाच दिवस सही गेले. सगळे गाजलेले नट, पण सगळे मला सांभाळून घेत होते. तयारी मस्त चाललेली होती. माझा स्वतःचा confidence खूप वाढलेला होता. दिवसभर तालमी करून दमून भागून रात्री परत आले कि बिछान्यावर पडल्या पडल्या भविष्याची स्वप्न पडायला लागली. हे नाटक, नाटकाचे येणारे रिव्ह्यूज, माझं कौतुक, मग अजून एखादं नाटक, मग सिनेमा, मराठी, हिंदी. मोठं करिअर मोठी स्वप्न. दोन दिवसावर पहिला प्रयोग आलेला, सगळं सुरळीत चालू होतं.

सहाव्या दिवशी मी तालामिला पोचले आणि बघते तर काय, जिने पाच दिवस आधी नाटकातून अंग काढून घेतलेलं होतं ती बया हजर. मला पाहताच सिनेमावाले काका पुढे आले. मला आत मेकप रुममध्ये घेऊन गेले. चांगल्या शब्दात त्यांनी मला सांगितलं कि ती मुलगी परत आलेली आहे. तिनं महिनाभर तालमी केलेल्या आहेत. तू नवखी आहेस. तू अभिनय शिकलेली नाहीस. नाटकाच्या यशाच्या दृष्टीने तिनंच काम केलं तर जास्त बरं होईल. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. गेले पाच दिवस मी ह्या नाटकासाठी मर मर कष्ट केले आणि आज ह्यांनी मला खड्यासारखं बाजूला काढून टाकलं? मी फक्त हो म्हणाले. पुढच्या नाटकात मात्र ते मलाच घेणार असंहि म्हणाले. मी मान हलवली आणि बाहेर आले. काल माझ्यासोबर काम करणारे सगळे आज तिच्याबरोबर होते. त्यांच्यासाठी जणू माझं अस्तित्वच नव्हतं.

मी घरी आले. घरी कुणीच नव्हतं. हताश मनाने मी तशीच वेड्यासारखी बसून राहिले. बऱ्याच वेळानं बाबा आला. त्याला सगळं सांगितलं आणि मात्र अनावर झालं आणि रडू कोसळलं. त्यानं मला रडू दिलं. पहिला भार ओसरला तसा तो उठला. आतमध्ये गेला आणि काहीतरी घेऊन आला. ती एक कॅसेट होती. बीटल्सची होती, त्यावर जॉन लेननचा फोटो होता आणि खाली त्याचं वाक्य होतं.

Life is something that happens while you are busy making other plans.

त्यानं माझ्या हारातली कॅसेट घेतली आणि स्टीरीओवर लावली देखील. ह्याउप्पर त्याने मला काही समजावलं नाही. पण एकही वाक्य न बोलता खूप काही समजावलं.

अर्थात म्हणून मी स्वप्न बघणं सोडलं नाही. आणि मी कधीही न बघितलेली स्वप्न सत्यात उतरवायचं आयुष्यानं थांबवलं नाही.
 
 
 - संवादिनी


8 comments:

aativas said...

एक स्वप्नं पूर्ण नाही झालं तर त्याची जागा दुसरं स्वप्नं घेत .. असाच अनुभव!!

Maithili said...

कोणीतरी मला आत्ता हे सांगायची खूप गरज होती. Thanks... बर वाटले हि पोस्ट वाचून... कोणीतरी छान समजूत काढल्या सारखे वाटले. :-)

हेरंब said...

>> Life is something that happens while you are busy making other plans.

अतिशय सुंदर वाक्य.. खरंय !! चलते जाना है !

yogesh joshi said...

truly touched...

संवादिनी said...

आतिवास - नक्कीच. एक स्वप्न सत्यात नाही उतरलं तर त्याची जागा दुसरं स्वप्न घेतं. पण माझ्या बाबतीत मी जे काही ठरवते किंवा करू पाहते ते कधीच होत नाही. उलटं मी कधीही ज्याची कल्पनाही केली नव्हती असं काहीतरी घडून जातं. जे घडतं ते वाईट नसतं, चांगलंच असतं, पण फक्त माझ्या योजनेप्रमाणे नसतं.

मैथिली - मी पण माझी समजूतच काढीत होते लिहिताना.

हेरंब - नक्कीच. अतिशय सुंदर वाक्य आहे. इन फॅक्ट माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये.

योगेश - thanks :)

मोहना said...

तुमचं ब्रीदवाक्य आवडलं. असे अनुभव येतच असतात आणि जे पाहिजे ते न मिळता अनपेक्षितपणे जे मिळतं त्याचीही मजा न्यारीच नाही का? स्वानुभवाचे बोल आहेत :-).

मोहना said...

तुमचं ब्रीदवाक्य आवडलं. असे अनुभव येतच असतात आणि जे पाहिजे ते न मिळता अनपेक्षितपणे जे मिळतं त्याचीही मजा न्यारीच नाही का? स्वानुभवाचे बोल आहेत :-).

Bhagyashree said...

he vachayache rahile hote! khup mast lihlays!! :)