Thursday, May 24, 2012

दुसरी आई आणि पहिली आई

नवरा बारा गावं फिरत असतो, खाण्यापिण्याची आबाळ, प्रवासाचा त्रास आणि बारा गावची वेगवेगळी हवा. त्यात थंडी वाढायला लागलेली. परत आला तोच अंगात ताप घेऊन. बरं शनिवार रविवार झाल्यावर त्याला परत बाहेरगावी जायचं होतं. पण अंगावर दुखणं काढायची सवय आणि प्रचंड आवड त्याला आहे, त्यामुळे दोन दिवस शांतपणे बिछान्यात पडून आराम करायचा सोडून हा बागेत काम करीत बसला. सोमवार उजाडला तसा मी आणि माझी मुलगी झोपेतून उठायचा आत निघून सुद्धा गेला.


नेहमीप्रमाणे मी थोड्या वेळानं उठले. माझ्या छकूला तिच्या डे केअरमध्ये सोडून मला कामावर जायचं असतं, त्यामुळे सकाळची धावपळ फार असते. पण उठले तेच अंगात कणकण घेऊन. दुखण्याची चिंता करायला वेळ कुणाकडे होता? पटापट आवरून सईला तिच्या ठिकाणी सोडलं आणि मी कामावर पळाले.

दुपारपर्यंत सर्दीचा चांगलाच त्रास व्हायला लागला. नवऱ्याचा फोन येऊन गेला. त्याचीही तब्येतीची कुरकूरच होती. दुपारी एक महत्त्वाची मीटिंग होती, तोपर्यंत आपल्याला बरं नाहीये ह्याची जाणीव फारशी नव्हती, पण ती मीटिंग पार पडली आणि मी माझ्या डेस्कवर परत आले आणि मग लक्षात आलं की अंग चांगलंच फणफणलं होतं. घरी जाणं आवश्यकंच होतं. पण आता घरी गेले तर सईला आणायला परत बाहेर पडावं लागलंच असतं. बर नवऱ्याचा ताप मला आला, माझा तिला आला तर?

जुजबी औषध घेतलं आणि तशीच काम करीत राहिले. अर्ध्या तासातच सईच्या डे केअरमधून फोन आला. सईलाही ताप चढलाय आणि नेमकी मी तिच्या बॅगेत पॅनॅडॉल ठेवायची विसरले होते. इथले नियम असे की मुलगी तापाने फणफणली तरी चालेल पण डे केअरचे लोकं स्वतः औषध देत नाहीत. जर तिच्या पालकांनी औषध सोबत दिलं असेल तेच औषध ते देऊ शकतात. तसंही तिला ताप आहे म्हटल्यावर मला ताबडतोब जाणं भाग होतं.

ऑफिसात उद्या येत नाही म्हणून सांगून मी बाहेर पडले. सईला चांगलाच ताप भरलेला होता. पोरगी अगदी मलूल होऊन गेली होती. एरवी तिला आणायला गेलं की तिच्या बोबड्या भाषेत आज काय काय केलं हे सांगायचा तिला कोण उत्साह. पण आज मात्र बिचारी खांद्यावर डोकं टाकून पडून राहिली. डे केअरमध्ये त्यांनी शेवटचा ताप बघितला तेव्हा चाळीस होता. त्यामुळे पहिलं तिला घरी जाऊन पॅनॅडॉल (म्हणजे भारतातलं मेटॅसीन वगैरे) द्यायलाच हवं होतं.

घरी जाऊन तिला औषध दिलं. मीही घेतलं. साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी तिचा ताप थोडा उतरायला हवा होता. तो उतरायच्या ऐवजी आणखीनंच चढला. संध्याकाळ झालेली होती आमचे डॉक्टर बंद. नवऱ्याला फोन केला. त्याने इंटरनेटवरून एका मेडिकल सेंटरचा पत्ता काढला. धावत धावत तिथे गेले तर तिथल्या डॉक्टरीण बाईंनी ताप जास्त असला तरी काळजी करण्याचं काही कारण नाही असं सांगून बोळवण केली. घरी येऊन पुन्हा ताप पाहिला तर बेचाळीस डिग्रीज होता.

आता मात्र माझा धीर सुटायला लागला. मी नवऱ्याला पुन्हा फोन केला. त्यालाही टेन्शन आलं. तो म्हणाला ताबडतोब गाडीत घाल आणि हॉस्पिटलला ने म्हणून. मलाही पटलं. हॉस्पिटलला गेले. तिथे सगळ्या टेस्ट झाल्या, एक्सरे काढला आणि पुन्हा काहीच झालं नाही असं डॉक्टरनं सांगितलं. पण दरम्यानच्या काळात त्यांनी दिलेल्या औषधाने सईचा ताप कमी झाला. पूर्ण उतरला नसला तरी कमी झाला ह्यातच मला बरं वाटलं.


मध्यरात्रीनंतर मी घरी परतले. सईला दूध पाजून झोपवलं आणि मी सोफ्यावर अंग टाकलं तेव्हा लक्षात आलं की माझं अंग प्रचंड दुखतंय, तापही चढलेला होता. मी माझं औषध घेतलं बराच वेळ एकटीच बसून राहिले. मनात नको नको ते विचार येत राहिले. का आपण आपला स्वतःचा आणि आपल्या मुलांचा असा छळ करतो. आपला देश, आपली माणसं सोडून असं भरकटलेलं आयुष्य जगतो उपटसुंभासारखे? मनातल्या मनात नवऱ्यालाही लाखोली वाहिली. तेवढ्यात मोबाईल वाजला.


आवाजाने सई उठणार म्हणून कपाळावर आठ्याच उमटल्या. नशिबाने ती उठली नाही. आईचा फोन होता. नवऱ्याने घरी फोन करून सगळं सांगितलं होतं. पहिलं वाक्य आई काय म्हणाली असेल तर बाळा कशी आहेस? ते ऐकलं आणि मला हमसाहमशी रडायलाच आलं. एकदम माझं लहानपण आठवलं, माझी आजारपणं आठवली. तेव्हा कदाचित माझ्याही आईला बरं वाटत नसेल पण तिनं तिचं दुखणं विसरून माझी सेवा केली असेल. आजही तिला माझीच काळजी लागलेली.

तिचं आईपण समजण्यासाठी मला स्वतःला आई व्हायला लागलं, तोपर्यंत मला समजलंच नव्हतं आई काय चीज असते ते,

- संवादिनी

8 comments:

Yogini said...

1 no..
tachkan pani ala dolyat..

अनिकेत वैद्य said...

Get well soon.
Take care

Bhagyashree said...

agadi same paristhititun mi gele 2 mahinyapurvi.. vait halat. kharach aaipaN teva kalale. ani mazya aaine kadhich kasa ajarpan janvu dile nahi yache ashcharya! avghad asta motherhood! :|

baki, parat lihiti zalis, mast vatla!

श्रद्धा said...

Get well soon.
Aai asatech ga kuthehi asalo tari, pratyakshya va apratyaksya.

Jap swatahla aani Sai la hi.

aativas said...

तिघेही लवकर बरे व्हा.

Anonymous said...

mazya manatla lihila.....
kitti sundar oghavata lihites g tu...
Lihit raha

arti said...

lovely....mazyahi dolyat pani aale ekdum....day care madhye thevlelya lekichi aathvan yeun

संवादिनी said...

@ योगिनी - थँक यू. खरं सांगायचं तर असे प्रसंग वरचेवरंच आपल्या अयुष्यात घडत असतात. नात्यांना कधी कधी आपण द्यावी तितकी किंमत देत नाही असं वाटतं.

@ अनिकेत. श्रद्धा, आतिवास - ही तशी जुनी गोष्ट आहे. आता आम्ही बरे आहोत.

@ भाग्यश्री - हो ना. तरी बरं आपल्याला आता बऱ्याच सोयी उपलब्ध आहेत. त्यांनी हे सगळं अपुऱ्या सोयी सुविधा असताना कसं काय मॅनेज केलं असेल ह्याचंच आश्चर्य वाटतं.

@ ऍनॉनिमस - धन्यवाद.

@ आरती - अगदी हे तर रोजचंच आहे. मध्येच दिवसभरात कधीतरी आठवण येते आणि मग उगाचच गिल्टी वाटत राहतं.