Friday, January 11, 2008

मी, जग्गू आणि हॅट्स...

ह्या आठवड्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फिरण्याचा संकल्प अजूनही चालू आहे. तशी मला व्यायामाची वगैरे आवड नाहीच आहे. पण काय आहे, माणसांचं व्यसन मला आहे. जिथे जिथे चांगली माणसं भेटतात, तिथे तिथे मी कष्ट झाले तरी जाते. मग ते, सकाळी सकाळी छान झोपायच्या वेळी उठून, चालून चालून, पायांना दिलेले का असेना.


सकाळचा आमचा ग्रूप एवढा छान जमलाय की एक दिवस सुद्धा चुकवत नाही. कधी कधी तर गप्पांच्या भरात ऑफिसला जायला उशीरही होतो. पण ऑफिसची वेळ ही वेळेवर जाण्याकरता नसतेच. उद्या एक तास उशीराने सुरू झालं ऑफिस तरी मला लेट होणारच.


तर मी ह्या माझ्या नव्या मित्रांबद्धल लिहिणार होते आज. सगळे सत्तरीच्या वरचे आहेत. पण आनंदी. आपल्या व्यथा वेदना बाजूला ठेवतात आणि मगच फिरायला येतात. आणि त्या सगळ्या ग्रूप ची मी नात आहे. मी सगळ्यांना आज्जी आणि आजोबाच म्हणते. पण एक सोडून. म्हणजे आमच्या गिरगावातले एक आजोबा आहेत तिथे. त्यांना नाही आजोबा म्हणत. म्हणजे त्यांनीच मला सांगितलंय, त्यांना नावाने हाक मारायची. "जगजीवन". मी त्यांना म्हटलं तुमचं नाव फर मोठं आहे. "आजोबा" छोटं आणि सुटसुटीत आहे. मग म्हणाले की "जग्गू" म्हण. आता एवढ्या मोठ्या माणसाला जग्गू कसं म्हणणार? बाकी सगळे त्यांना जग्गू म्हणतात. ते ठीक आहे. एक दिवस ते आपल्या नातीला घेऊन आले. लहान आहे. तीही त्यांना जग्गूच म्हणते. मग मी पण सुरू केलं.


खरंतर एखाद्याला त्याच्या नावानं हाक मारण्यात काहीच वाईट नाही. नाही का? पण आपलं कंडिशनिंगच असं झालंय की अहो जाहो येतंच तोंडात हटकून. आपल्याला जे लहानपणापासून शिकवलंय योग्य म्हणून त्याच्या व्यतिरिक्त काही योग्य असू शकतं, ही शक्यताच आपण ध्यानात घेत नाही. किमान मी तरी घेत नाही. पण घ्यायला हवी. चौकटीबाहेर जाऊन वस्तूनिष्ठपणे (कसला शब्द आठवलाय, सही!!) प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. मला कधी जमेल देवालाच माहीत.


तर जग्गूही गिरगावातच राहत असल्याने आम्ही दोघं हल्ली एकत्रच परत येतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती आहे. वल्ली आहे. म्हणजे बघा, ते तबला वाजवतात, मिलिट्रीतून रिटायर झालेले आहेत (काय म्हणून विचारलं की हवालदार म्हणतात, पण हुद्दा सांगत नाहीत). हॉटेल चालवून झालं, क्रिकेट कोच म्हणून काम करून झालं. मोटरमनच्या नोकरीसाठी त्यांना अर्ज करायचा होता पण वय आड आलं. असं केलं तर माझ्यासारख्या मुलीचं, एक ना धड भाराभार चिंध्या असं व्हायचं, जग्गूचं नाही. सगळीकडे यशस्वी. यश मिळालं की ज्याच्यात यश मिळालं ते काम सोडायचं आणि पुढचं वेगळं काहीतरी धरायचं.


परवाच मी त्यांना विचारलं की, त्यांना अस्थिरता इतकी का आवडते? एवढा नव्याचा हव्यास कशासाठी? जग्गूनी मला विचारलं, तुझा पुनर्जन्मावार विश्वास आहे? मी म्हटलं, अजून विचार केलेला नाही. मग म्हणाले, त्यांचा नाही. आणि जगात एवढ्या चांगल्या चांगल्या अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत, की खूप प्रयत्न केले तरी पाच सहा गोष्टीच नीट मनसोक्त करता येतात. सतत नवनवे अनुभव घेत राहयचं. आयुष्याचा दुसरा उद्देश काय आहे? फक्त आपला जोडीदार सोडून सगळं बदलून पाहायचं आणि जोरजोरात हसले आगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत.


मग मी न विचारताच त्यांच्या नातीबद्दल, मुलीबद्दल बोलत राहिले. म्हणाले तुला पाहिलं की मला माझी मुलगी आठवते लग्नाआधीची. म्हणून तुला जग्गू म्हणायला सांगितलं.


मला कौतूक वाटलं त्याचं, आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पत्नीचं, की इतकं मनसोक्त आयुष्य जगणाऱ्या माणसाचा संसार सांभाळणारी बाई किती खमकी असेल? पण आपल्याला आवडून गेले ते. एकच आयुष्य, वेळ कमी, मग जास्तीत जास्त गोष्टी करायच्या, बदलून पाहायच्या, पण जोडीदार सोडून.


त्यांना मी विचारलं त्यांच्या जोडीदाराबद्दल. चर्नीरोडच्या ब्रीज वर चढलो की आम्ही वेगेवेगळ्या दिशेला वळतो. तिथेच विचारलं. काहीच बोलले नाहीत. हसले आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी मी लवकरंच पॉइंटाला पोहोचले आणि इतर आजोबांना विचारलं ह्याबद्दल. ते म्हणाले की जग्गूची बायको लग्नानंतर दोन वर्षातच गेली.


मला प्रचंड धक्का बसला. मी जवळ जवळ रडलेच तिथे. प्रेम असावं तर कसं? असं. ते आता सत्तरीच्या वर आहेत म्हणजे किमान चाळीस वर्षांपूर्वी त्यांची बायको गेली आणि नाविन्याचा ध्यास घेतलेल्या ह्या माणसाला एकदाही वाटू नये की आपण दुसरं लग्न कराव? कदाचित वाटलंही असेल, पण त्यांनी केलं नाही हे नक्की.


आता लिहिताना पण मी सुन्न झालेय. रडतेय.


हॅटस ऑफ जग्गू. हॅटस ऑफ!!

8 comments:

सर्किट said...

sahee.. vapu kalenchi katha vachavi tasa vaTala he post.. kharach ashi maNasa asatat.

mhanaje satat kahitari badalun navinyacha dhyas ghetaleli. aani 2 varshachya sansarachya athavaninvar sattariparyant ayushy ekaTyane jagaNari.

very good post, must say!

Abhijit Bathe said...

सर्किट म्हणतोय खरा कि व.पु. वाचल्यासारखं वाटलं, पण मला पोस्टच्या मध्यंतरापर्यंत येईपर्यन्त ’चीनी कम’ आठवायला लागला होता. म्हणजे अगदी चित्रश: नाही, पण चिकित्सक तब्बुशी ही पोरगी समानार्थी वाटली. लेखाचा शेवट वाचक म्हणुन धक्कादायक नाही वाटला, पण शेवटी हा लेखही तु लेखक म्हणुन लिहिलायस असं वाटत नाही. अनुभवात तुला धक्का बसणं साहजिक आहे.

माझ्या मित्राने एकदा माझी एका जोशी आजोबांशी ओळख करुन दिली. मित्र तेव्हा ग्रामविकसनाचं काम करायचा. मी एन. डि. ए. चा विचार करत होतो. काका जवळच क्लासला यायचे. म्हणजे शिकवायला नाही - शिकायला! वय वर्ष ६५-७०.
थोडं अल्याड पल्याड.
त्यांनी संगीत विषारद व्हायचा ध्यास घेतला होता.
बोलता बोलता विचारलं - तुम्ही काय करायचात? तर म्हणे - आर्मीत होतो.
काय म्हणुन तर म्हणे - लेफ्टनंट जनरल!
माझे फंडे असले भोवरा गोल झाले कि विचारता सोय नाही.:))

एनीवे - वाचता वाचता प्रश्न पडला कि चिंता वगैरे बाजुला ठेऊन काही काळ एकत्र येणं हे जनरली म्हातारपणीच का सुचतं? कि जे.पी. म्हणतात तसं ते ही प्राक्तन? तुला हा प्रश्न पडलाय का? समस्त आजोबा आज्जींना?

Tulip said...

अरे वा.. मस्त आहे हा ब्लॊग. छानच लिहिल्येत पोस्ट्स अगदी सहज आणि मनमोकळी.
इतक्या उशिरा कशीकाय पहातेय काय माहीत ही पोस्ट्स. सर्किट इतके दिवस वाचतोयस तर कधीतरी सांगीतल असतंस वाच इथे येवून तर काय बिघडल असतं का:)))

Abhijit Bathe said...

ट्युलिप - हा ब्लॉग बरेच दिवस चालु आहे आणि ते सगळे दिवस कन्सिस्टंटली इंटरेस्ट टिकवुन आहे.
तु हा ब्लॉग वाचत नाहिएस तर नक्की वाचतेयस तरी काय?

Abhijit Bathe said...

हा हा - आणखी एक:
संवादिनी - या ब्लॉगच्या प्रत्येक पोस्ट मध्ये ’आणि’ हे कंपल्सरी आहे कि काय? :))

संवादिनी said...

सर्किट - अरे वपू कुठे मी कुठे? तुला त्यांचा थोडा भाससुद्धा झाला ना माझ्या पोपटपंचीत तरी मला मोठा ऍवॉर्ड आहे.

अभिजीत - तुझं म्हणणं चुकीचं नाहीये. चिनी कम आहेच, पण तितकीही कम नाहीये. म्हणजे अशा व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणं स्वाभाविक आहे. पण एक वडिल माणूस म्हणूनंच.

मी लिहिलेलं लेख म्हणून लिहिलेलं वाटंत नाही, हे वाचून मनापासून आनंद झाला. कला बिला माझ्या लिखाणातून डोकावण्याची शक्यता कमीच, पण अजूनही मला माझ्याच बद्धल लिहावंसं वाटतंय हेच great आहे. माझे संकल्प फार काळ टिकत नाहीत.

ट्युलिपकडे माझं कौतूक केल्यबद्दल थॅंक्स.

Somehow "आणि" हा प्रत्येक शीर्षकात आहेच, माझी लिहिण्याची वगैरे पद्धत नाहीये, टायटलची तरी असूदे.

चिंता बाजूला ठेवून एकत्र येणं म्हातारपणीच का सुचतं? मला वाटतं म्हातारपणी दुसरा पर्यायच नसतो. तरुणपणी कदाचित चिंतेची कारणं आपल्या हातून दूर होतील अशी आशा असेल, म्हणून चिंता मनात ठेवणं परवडत असेल. म्हातारपणी गात्र थकलेली, मुदत संपत आलेली. हातातली वाळू निसटून चाललेली, अशाच वेळी कदाचित शहाणपण सुचत असेल.

ट्युलिप - तुझी कमेंट वाचली, मग तुझा ब्लॉग पाहिला. मी जर आजपर्यंत तुझा ब्लॉग वाचत नव्हते तर मी काय वाचत होते? असा प्रश्न मलाच पडला. मस्त एकदम.मी तुझा ब्लॉग नुसता रेग्युलर वाचला तर माझं लिखाण सुधारेल. तुझ्या कमेंटबद्दल थँक्स.

a Sane man said...

chhanach zalay he post! "second innings" group mast distoy :)

Feelings.... said...

tumchya Jaggun vishayi vachun mann khup galbalale ! Kharach great Manus!