परवाच आजीकडे गेले होते. आजी म्हणजे माझी एकदम मैत्रीणच आहे. चक्क ऑफिसला दांडी मारली आणि तिकडे गेले. तसंही ऑफिसमध्ये काम कमी झालंय. रजा फुकट जायची ती घेऊन टाकली. खूप गप्पा मारल्या. ती म्हणाली दमतेस किती? सतत इकडे तिकडे धावत असतेस? म्हटलं आजी, त्यातच मजा असते. घरी बसून काय करायचं? नुसतं बसून वेळ फुकट जातो काहीतरी करत राहिलं की वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान मिळतं.
तशी ती मला तिच्या आईची गोष्ट सांगायला लागली. तिची आई म्हणजे माझी पणजी. मी तिला फार पाहिलं नाही, पण तिची मला भीतीच जास्त वाटली होती. कारण मी होते तीन-चार वर्षांची आणि ती नव्वदीतली. आलवण नेसायची ती. बहुतेक आलवणंच म्हणतात त्याला. म्हणजे कोंकणातल्या विधवा बायका पूर्वी घालायच्या ना, तो साडीचा प्रकार. डोकं सतत झाकलेलं. त्या साडीचा तो विचित्र रंग. ती आली की रडायलाच लागायचे मी. तिची गोष्ट.
अगदी शंभर वर्षाची झाली तरी एकटी राहायची कोंकणातल्या तिच्या घरात. एवढं मोठं ते घर. लाकडी होतं. माडीवर चालायला लागलं की करकर वाजायची ती लाकडं. घरासमोरच एक दोणी होती. दोणी म्हणजे एकदम छोटासा हौद. मी तीन-चार वर्षाची असतानापण पुरती बुडायचे नाही इतका छोटा. आणि त्या दोणीवर नेहमी एक भला थोरला बेडूक यायचा. त्याची मात्र भीती वाटायची नाही. बेडूक आला की मी तिकडे धावायची आणि आई मागेमागे. अर्थात मला त्या बेडकाबद्दल कितीही प्रेम असलं तरी मला बघून तो पळूनच जायचा.
घरामागेच एक टेकडी होती. मामा तिथे मला फिरायला घेऊन जायचा. माझा मामा एवढा उंच. त्याच्यापुढे तर मी एकदमच छोटी दिसायचे. लाल तपकिरी माती असावी बहुतेक तिथे. नीटसं आठवत नाही, पण खूप मस्त जागा होती ती. कधी बंदरावर घेऊन जायचा. तिथला मासळीचा वास बिलकुल आवडायचा नाही मला. किती छोट्या छोट्या गोष्टी आणि इतक्या वर्षांपूर्वीच्या कुठे रेकॉर्ड होऊन जातात डोक्यात कुणास ठाऊक? पणजी आजीची गोष्ट सांगता सांगता कुठे येऊन पोचले.?
तर अशी आमची ही पणजी आजी. तिला स्वस्थ बसवत नसे. सतत काहीनं काहीतरी करत राहायचं. विश्रांती माहीतच नाही. आणि पूर्वी कामंपण जास्त असतील, जात्यावर पीठ दळण्यापासून ते जमीन सारवणे, लिंपणे सगळं सगळं एकटीच करायची, अगदी शेवटपर्यंत. कुणी तिला सांगितलं की आजी थोडा आराम कर, तर ऐकायची नाही. शेवटी शेवटी तिला अल्झायमर झाला होता. जुनं आठवायचं, नवं आठवायचं नाही. आजीला पण ओळखायची नाही बऱ्याच वेळा. तेव्हा सतत म्हणत राहायची ती. जरा पाच मिनिटं आडवी होते. मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच गेलं तिचं. ते असं शेवटच्या दिवसात बाहेर आलं. म्हणायची मला कुणी पाच मिनिटं स्वस्थ बसू देत नाही.
मला एवढं वाईट वाटलं हे ऐकून. कधी कधी काही लोकं आपल्या दृष्टीने अस्तित्वातच नसतात. मला एकदम वॉटर पिक्चरमधली ती आजीबाई आठवून गेली. तिला लाडू खायचा असतो पण तिला शेवटपर्यंत तो मिळत नाही. त्यासाठीच ती जगत असते आणि लाडूचा एक घास गिळल्यावर सुखाने मरते. तसं काहीसं, खूप आत आत धक्का देणारं.
आजी म्हणाली, ऐक माझं. आता थोडे दिवस सगळं बंद कर, विश्रांती घे. शरीर दमतंच. आपण समजावत राहतो स्वतःला की मी दमत नाही. माझी शक्ती अफाट आहे म्हणून. ताबडवत राहतो आपल्याच शरीराला. तसं करू नकोस. म्हणाली एक अर्धविराम घे. मॅट्रिकसुद्धा न झालेली माझी आजी. कसे चपखल शब्द वापरते. अर्धविराम. कुणी शिकवलं असेल तिला?
म्हणूनच, सगळ्या आवांतर ऍक्टिव्हीटीज काही दिवस बंद करायचं ठरवलंय. ह्या महिन्याच्या नाटकात मी म्युसिक करणार होते. त्यांनाही नाही सांगून टाकल. हा ब्लॉगही अवांतरच नाही का? मग इथेही एक पॉज घ्यायचं ठरवलंय. किती शक्य होतं ते माहीत नाही. पण प्रयत्न करून बघेन. इथे लिहिण्याचं व्यसनच लागलंय मला. पण तरीही. त्यामुळे पुढची भेट कदाचित मी पुण्याला गेल्यावरच होईल. कदाचित नाहीही. कारण तिथे काँप्युटर नाहीच आहे. ऑफिसमध्ये आहे, पण तिथे मराठी लिहिता येईल असं नाही. नव्या ऑफिसमध्ये सुरवातीला का होईना काम करण्याचं सोंग घ्यावं लागेल. त्यामुळे तसंही जमेलसं वाटत नाही. त्यामुळे माझा हा अर्धविराम.
पुन्हा भेटूच;
कधीतरी.
20 comments:
Jarur bhetuya...
Kashitari.. :)
kadhitari lihayach hot..
hmm vishranti ghyayala havi manya...
pan blogs na lihina? he kay zala rao?
mala mullich mullich nahi awadala he Sam!
malapan nahi aawadal. lihin mhanaje dhawpal thodich? ulat wishranti... lihi g... plz.
चांगले ब्लाँग लिहिणार्यांचा विकार आहे का हा काही? ट्युलिपलाही मागे असं काहीतरी झालं होतं. पण आमचं नशीब थोर म्हणून लिहू लागली परत. तुझ्या बाबतीतही आमचं नशीब थोर असू देत एवढीच इच्छा. बाकी लिहिणं, न लिहिणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. तोवर फक्त तुला शुभेच्छा!
bheTooyaa lavakarach.
I am sure you will love Pune. ...It's been 10 years that I have been out of Pune and I miss it ...every single day !!!
You know, you are breaking so meany hearts with your decision?
हे फार क्रुर होतय..
Punaragamanay ch! Ardha-viraam enjoy karaNyasathi shubhechchha :)
aga...blog hihi vishrantich aahe sam... aso.. tujhi vaat baghu amhi... lavakar parat...
:((
...sneha(shodhvali)
तुझा अर्धविराम सुखप्रद होवो. तो संपला की ताजी तवानी होऊन ये परत भेटायला!! ए़कदा का पुण्यात पोचलीस की तुला अर्धविरामाची गरजच नाही वाटणार, इतकं मस्त आहे ग माझं शहर!!
enjoy your break. get rejuvenated. and do come back whenever you feel like writing & sharing it with us.
kay yar Sam.. miss karatye ga!
आहात कुठे ? मला तर वाटले आपण ऑलरेडी पुण्याला पोहचलात.
काय कधी मग पुण्याला स्थलांतर ?
आपले गाणे ऐकायचे राहुनच जाणार तर !
१ मे ला झेव्हीयस कॉलेज मधे मस्त गाणं ऐकले. उस्ताद मकबुल फिदा हुसेन खान यांचे
"आजी आणि अर्धविराम" आवडलं ... छान !
आता लिहा की पुढे
Pl break your silence. We all are missing you.
@ ऍनॉनिमस - नक्कीच भेटूया. म्हणजे भेटलोच.
@ जास्वंदी - स्वतः टाईम प्लीस घेतलेयस आणि मला काय सांगतेस? तरी बरं मी पटकन परत आलेय. आता तू पण ये.
@ मेघना - अगं नुसती विश्रांती असं नव्हतं. मी पुन्हा तेच तेच लिहितेय असंही वाटायला लागलं होतं. मग थांबवलं. म्हणजे माझ्या व्यक्तिगत गोष्टींनी मी सगळ्यांना किती बंबार्ड करायचं?
@ सेन - माझ्या ब्लॉगला चांगला म्हटल्याबद्दल थँक्स. आणि त्यानंतर ट्युलिपचं नाव लिहून मला तिच्यासारखाच विकार जडलाय हे वाचून मूठभर मासंच चढलं अंगावर. आता उद्या चालत येते ऑफिसला.
@ संदीप - अजूनपर्यंततरी मुंबई आमची लाडकी. पुढे बघुया काय होतं ते.
@ संवेद - हे काय? क्रूर वगैरे? मी फक्त टाईम प्लीस घेतली होती, येणार होतेच. आणि आता इथे दुसरा उद्योग काय आहे? मग लिहा. अगदी रोज लिहायचा विचार चालू होता. मग वाटलं अति होईल, म्हणून मग साप्ताहिकच.
@ नंदन - अरे एन्जॉय करण्याइतपत काही वेळ मिळालाच नाही. सगळी पलापल चाल्लेली.
@ स्नेहा - आपली कुणी वाट बघतं हेच अमेझिंग आहे. थँक्स.
@ यशोधरा - अजून तरी पुण्याची मज्जा अनुभवायला मिळाली नाही. अजून माझंच शहर छान होतं असं वाटतंय. आणि पुण्याला आल्यावर तर मुंबईचा अभिमान अजून जाज्वल्ल्य वगैरे झालाय.
@ केतन - जास्त वेळ ब्लॉग न लिहिणं कठीण आहे. आता करा सहन मला.
@ विष्णूसूत - धन्यवाद!
@ हरेकृष्णाजी - अहो सायलेन्स वगैरे काय? आलेच परत. आता झेला.
मौन राग संपला वाटतं.
उद्या व परवा चव्हाण सेंटरला मस्त युवा कलाकारांचा कार्यक्रम आहे. येणार आहात काय?
कल के कलाकार संमेलन ही उद्यापासुन सुरु होतेय.
मग काय विचार ?
मुलांचं करता करता, घरातल्यांचं करता करता, बाहेरच्यांचं सांभाळता सांभाळता, शांत बसायचं राहूनच >>> खरचं असच कायम घडत आलेल आहे! लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आर्थिक कुचंबणा, मानसिक अन् शारिरीक छळ, हेच काय ते कायम नशीबात आले आहे! अजुनही आपल्याला
३६% (३६% च????) आरक्षण मागावे लागतेय!!
Well I know this wasn't the subject of the post...
बाकी तु as usual छानच लिहीलयस! keep it up!!
hey pan sahi ahey!!
Post a Comment