Thursday, July 10, 2008

पडदे, पुस्तकं आणि चुकलेला अंदाज

दिल्लीत मनाजोगतं फिरणं ह्या विकेंडला झालं. आमच्या बॉसने कंपल्सरी शनिवारी ऑफिसला न जाण्याचा हुकूम दिला. भाग्य लागतं की नाही असा बॉस मिळायला? म्हणाला तुम्ही करताय ते खूप आहे. पण चांगलं काम करायला, मनही फ्रेश हवं. जर तुम्ही कंटाळून गेला असाल तर दहा मिनिटांचं काम करायला तासभर लावाल. आम्हाला काय? पडत्या फळाची आज्ञा.

खूप शॉपिंग केलं, खूप खाल्लं आणि खूप भटकलो. चांदनी चौक, लाजपतराय मार्केट धुंडाळून काढलं. खूप खरेदी केली. माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. बाबासाठी एक खास झब्बा घेतला. त्याला ग्लॉसी काही आवडत नाही. मग खादीचाच पण जरा उच्चीचा वाटावा असा झब्बा. मुंबईला खादी ग्रामोद्योगमध्ये वगैरे मिळतात तसे. स्वस्त मिळाला असं वाटलं. अर्थात, हे मी आईला सांगितलं की ती म्हणणारच की जास्त दिले म्हणून. मला ना कधी कधी तिच्याबरोबर शॉपिंगला जायची लाज वाटते. दुकानदार पाचशे म्हणाला की ही शंभर पासून सुरू करते. पण खरं सांगायचं तर तिला ती नॅक आहे. मला पाचशेचे तीनशे करतानापण धाकधूक वाटते.

तर बाबासाठी झब्बा, विन्यासाठी त्याने खास पत्ता दिलेल्या दुकानातून आणि मुंबईहून फोन करून ऑर्डर करून घेतलेली इंग्लिश विलो बॅट, आईसाठी साडी आणि उरलेली सगळी खरेदी माझ्यासाठी. उन्हाळ्याचा मुहूर्त साधून बरेच स्वेटर्स घेतले. स्वस्तात मिळाले. चुडीदार, कुर्तीज मस्त मिळाल्या. मी काही स्वस्तातलं आणलं की बाबा म्हणतो की आधी कापड धू आणि मग तुला झालंच तर चांगलं मिळालंय म्हण.

दिल्ली हाटला तर मी अक्षरशः वेडावून गेले. रंगाची तर नुसती उधळण. राजस्थानी रंग, गुजराती रंग, काश्मिरी रंग, मराठी रंग. सगळं थोडं महाग वाटलं, पण अशा सगळ्या वस्तू एका ठिकाणी मिळणं कठीण आहे, आणि बघून शेवटी घ्याव्याश्या वाटतातच. त्यामुळे बऱ्याचशा नको असलेल्या आणि काही हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या. त्यातले राजस्थानी पडदे तर खासंच आहेत. ते लावायला खिडक्याच नाहीयेत अजून, पण तरीही घेतले. गिरगावात तर काही लावता येणार नाहीत. पुढे झालंच स्वतःचं घर तर वापरता येतील. नाहीतर कुणाला गिफ्ट म्हणून देता येतील.

तिथले फूड स्टॉल्स तर भन्नाट आहेत. म्हणजे चव ठीक ठाक. पण व्हरायटी काय आहे? मी चक्क बिहारी कचोऱ्या वगैरे खाल्ल्या. बाकी चरणं सुरूच होतं. चाट, गोल गप्पे, समोसे. सगळं झकास.

एका मस्त वेगळ्या ठिकाणी पण गेले. आमच्या टीम मधल्या क्लायंट साइडच्या एकाच्या वडिलांचं जुन्या अँटिक पुस्तकांचं दुकान आहे. बाकी कुणाला पुस्तकांत वगैरे रस नव्हता. मग मीच त्याला म्हटलं की मला घेऊन चल. साहेबांची फटफटी आहे. मग हेल्मेट घालून मी त्याच्या मागे (केस\चेहरा जाम खराब होतात हेल्मेट घातलं नाही तर. घातलं तर घामाने होतात, पण चालतं). कसलं दुकान होतं ते. कसले जुने जुने ग्रंथ. सगळ्या भाषांतले. मराठीही होते. काही जुनी हस्तलिखितं होती. प्रिंटींग होत नसे तेव्हाची. मोडी भाषेतली होती. काहीही कळलं नाही.

पण चटकन मनात आलं, कुणी कोणे एके काळी लिहिलेली ती पत्र, त्यानंतरची कित्येक वर्ष, निसर्गाला तोंड देत टिकून राहतात काय आणि आजच्या जेट युगातली मी, ती बघते काय? ह्यालाच विधीलिखित म्हणत असावेत. किती पावसाळे पाहिले असतील त्या पत्रांनी? माझ्या आजोबांचे आजोबासुद्धा जन्माला आले नसतील तेव्हा.

इतरही अनेक पुस्तकं होती तिथे. वेगळंच विश्व वाटलं ते. वर्तमानातून एकदम भूतकाळात जाऊन येता येईल असं टाइम मशीन. मग तो कलीग त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचं बनिया कुटुंब. वडिलांची जरब, भिजल्या मांजरासारखी दिसणारी आई, त्याची लग्नाच्या पहिल्या काही महिन्यातंच प्रेग्नंट झालेली बायको. डोक्यावर पदर. माझ्यापेक्षा लहान असेल ही, पण तिचं विश्व किती वेगळं? पोटातलं मूल, मुलाचा बाप, ह्यांच्या पलीकडे ती विचार करत असेल का? असेलही करत तरी ते व्यक्त करायची तिला परवानगी असेल का? ऑफिसमध्ये एकदम नॉर्मल वाटणारा तो कलीग, घरात एकदम वेगळाच वाटला. कसलातरी मुखवटा घातलेला किंवा काढलेला. नक्की कळलं नाही.

ह्यालाच लग्न म्हणायचं का? सहजीवन म्हणायचं का? कुणाच्यातरी दावणीला स्वतःला बांधून घ्यायचं का? एक ना अनेक, कित्येक प्रश्न मनात येत गेले. त्याच्याकडून बाहेर पडले, त्याने पुन्हा आमच्या अपार्टमेंट पर्यंत सोडलं. त्याला मी विचारलं बायको काय करते? तर म्हणाला अजून शिकतेय. म्हटलं काय? तर म्हणाला यूपीएससी देतेय ती.

घरात पदर डोक्यावर घेऊन राहत असली तरी तिचं विश्व त्या पदराएवढं मर्यादित नाही. मलाच माझं हसू आलं, आपण किती पटकन मतं बनवतो, काही माहिती नसतानाही. पण बरं वाटलं. दिल्ली हाटातल्या राजस्थानी पडद्यांवरचे रंग एकदम उजळून निघाले असं वाटलं. कधी कधी आपले अंदाज चुकतात. पण अंदाज चुकल्याचा खूप आनंद झाला.

- संवादिनी

8 comments:

Dk said...

भाग्य लागतं की नाही असा बॉस मिळायला>> हे मात्र अगदी खराय! माझ्या भाग्यात असा/अशी बॉस कधीच नव्हते/ती :( वर आम्ही शनिवार आणी रविवारी पण केली हमाली :( पैसे(च) मिळाले भरपूर पण कामाच समाधान नाही!

ती नॅक नाही?? आश्चर्यम्! को. ब्रां. कडे असतेच ती :) (दिवे घे ग... मागल्या वेळी orkut वर पाहायच बोललो तर केवढा गैरसमज झाला होता so I thought lets sort it out..)

उन्हाळ्याचा मुहूर्त साधून बरेच स्वेटर्स>>> भारतात अशी थंडी कितीशी पडते??

ता. क.
{आज सकाळ पासून कुणी भेटल नाही म्हणून खेचतोय! :) तरी दिवे घ्यावेत!!}

Jaswandi said...

संवादिनी,
खुप छान लिहिलं आहेस (as usual)
पण हे राजस्थानी पडदे कसे असतात? गेल्यावेळी टयुलिपच्या ब्लॉगवर पण वाचलं होतं.. मी कधीच ऐकलं नव्हतं!
शेवटी अंदाज त्या बायकॊबद्दलचा अंदाज चुकलेला असणार हे ते वाचतानाच लक्षात आलं होतं (पोस्ट्च्या नावावरुन) पण UPSC देत्ये म्हणजे gr8च आहे!
सहीच!

sayonara said...

halli hallich tujha blog vachayla lagley. ani khup avadtoy.masta lihite ahes. keep it up.

a Sane man said...

"दिल्ली हाटातल्या राजस्थानी पडद्यांवरचे रंग एकदम उजळून निघाले असं वाटलं." nice!!!

kadhi kadhi ase andaz chukale ki kay zaak vaTTa na...?

साधक said...

Bayka padade ni sadya ya palikade kahi pahtat ka?

Sneha said...

:)....
ase andach chukalelech bare nahi kaa?

Monsieur K said...

woww, u r getting to see so many places in delhi... aani ho, baryaac veLaa, andaaz mast chuktaat :)
continue to have fun in delhi..

संवादिनी said...

@ दीप - अरे मी कधीच काही सिरियसली घेतलं नव्हतं. तुझा उगाचंच गैरसमज झालाय. सगळ्याच कोब्रांकडे ही नॅक नसते बरं का? माझ्याकडे तर नक्कीच नाही. पण इतर नॅका आहेत. म्हणजे नको तिथे पैसे न खर्च करणे फलाणा ढिकाणा. मुंबईच्या लोकांना स्वेटर्सचं कौतूक नाही हेच खरं, पण हिल स्टेशनच्य ट्रीपा, पुणे, इतर कुठे गेले तर लागतातच की नाही. आणि मुंबईत जरा थंडी पडली की मी लगेच स्वेटर्स वापरते, इटस अ फॅशन स्टेटमेंट इन मुंबई.

@ जास्वंदी - ऍक्चुअली, ती पडद्याची कापडं आहेत. खिडक्यांची साईझ माहीत नाही तर पडदे कसे घेणार. बरंच काम केलंय त्याच्यावर. बहुतेक हाताने केलं असावं. रंगांची ऊधळण आहे नुसती. थंडीत उबदार फील देणारे आहेत. उन्हाळ्यात नाही वापरता येणार. विचित्र वाटतील.

@ सायोनारा - थँक्स.

@ निमिष - खरंच. एकदम मस्त वाटलं. खरंतर आश्चर्यचकित चाले मी.

@ अभिजित - पडदे आणि साड्या (पक्षी कपडे ह्या सदरात मोडणारी कोणतीही गोष्ट) ह्यापलिकडे बघण्यासारखं आहे तरी काय?

@ स्नेहा - खरंच

@ केतन - सध्या फन भयंकर वाढलाय ऑफिसात. दी डे जवळ येतोय, कामं अडल्येत. मुंबईला जायचं पण कॅन्सल करावं लागलं.