Thursday, July 17, 2008

गारठलेल्या सकाळी आणि धमाल

सकाळी सहाचा गजर वाजतो. मी तो ऐकते आणि तसाच बंद करून टाकते. शेवटची फिरायला कधी गेले होते ह्याची मनाशी नोंद होते. परवाच गेले होते, मग आज नको, झोपूया, असं म्हणून पांघरूण डोक्यावर घेते. रात्रभर घुरघुरणाऱ्या एसीने रूमचा डीप फ्रीजर करून टाकलेला असतो, पण तरीही मला उठून तो एसी बंद करावासा वाटत नाही. स्नूझ झालेला गजर पुन्हा एकदा वाजतो, सव्वा सहा. काल किती वाजता घरी आले मी? रात्री बारा. मग आज थोडं उशिरा पोचलं तरी चालेल. पुन्हा थंडी, पुन्हा पांघरूण, पुन्हा गजर, पुन्हा स्नूझ आणि पुन्हा थंडी. माझ्या सगळ्या सकाळी सध्या अशा गारठून गेलेल्या आहेत.

डोक्यावरचं काम प्रचंड वाढतंय. दिवस सुरू झाला की कधी मावळतो आणि संध्याकाळी त्याच्या घरी पळालेला सूर्य, विश्रांती घेऊन पुन्हा कधी उगवतो, हेच कळत नाही. सकाळचा ब्रेकफास्ट करायला मिळाला तर ठीक, नाहीतर ऑफिसमध्ये पोचायचं, पहिला चहा होतो न होतो, मेल चेक केले न केले, इतक्यात कुणीतरी येऊन टपकतो.

काल तू असं सोल्युशन दिलं होतंस, तसं प्रोग्रॅम करणं अशक्य आहे. दुसरं डिझाइन दे. अरे, शक्य नव्हतं तर काल का तसं नाही सांगितलं? इतकं डोकं आपटून मी ती स्पेक बनवली ती आता कचऱ्याच्या टोपलीत? हा विचार मनातल्या मनात करून, अगदी हसऱ्या चेहऱ्याने, असं का? बरं. बघूया काय जमतंय असं म्हणून मी त्याला वाटेला लावते.

त्याची पाठ दिसते न दिसते तर दुसरं कुणी येतं. म्हणे मॅडमनी बोलावलाय. मॅडम म्हणजे आमच्या टीमची लीड. अडलंय माझं खेटर? मॅडमला हवं असेल तर येईल झक मारत, असं मनातल्या मनात म्हणते आणि निरोप्याला, आलेच असा उलट निरोप पाठवते. शेवटी झक मारत मीच जाते मॅडमना भेटायला. तिच्या आज्ञेचं पालन मला करायला लागलं ह्याचा आसुरी आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसतो. तो आनंद, तिला मला पाहून झाला आहे, असं स्वतःला खोटंच समजावत मीही खोटं हसते.

बहुदा मॅडमचं घोडं (की गाढव? ) कुठल्यातरी खड्ड्यात पडून अडकलेलं असतं. मग मॅडम अडकलेलं घोडं खड्ड्याबाहेर काढायच्या कामाला मला जुंपून, अजून एखादा घोडा कसा खड्ड्यात टाकता येईल ह्याचा विचार करायला निघून जातात. आम्ही इमानदारीत एकदा घोड्याची शेपूट पकड तर एकदा लगाम, असं करत यथाशक्ती यथामती त्याला बाहेर काढायचं काम करू लागतो.

ते आवरेपर्यंत जेवणाची वेळ होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. मग दुपारच्या जेवणाचा घाट. जेवणात पनीर नसेल तर ह्या लोकांना अपचन होतं की काय कोण जाणे? प्रत्येक गोष्टीत पनीर. सगळ्यात घाणेरडं मी खाल्लेलं इथलं पनीरचं काँबिनेशन म्हणजे पनीर बैंगन. पण अन्न हे पूर्णब्रह्म असल्याने, वदनी कवळ घेता, जी काही चव लागेल ती गोड मानून, समोर असेल ते गिळते आणि अन्नदाता सुखी भव म्हणत पुन्हा घाण्याला जुंपून घेते.

दुपारची मज्जा तर काय वर्णावी? रात्रीची कमी झालेली झोप डोळ्यात उतरायला लागते आणि वाचतेय काय, टंकतेय काय आणि बोलतेय काय? ह्याचा काही ताळमेळच राहत नाही. डुलक्यांचे हल्ले परतवून डोळे उघडे ठेवण्यात यश मिळालं तरी बरं वाटतं. असा सरता न सरणारी दुपारची वेळ जाऊन चहाची वेळ होते आणि मनाला पुन्हा एक उभारी मिळते.

चहा आणि ग्लूकोजची बिस्किटं. अहाहा. वाफाळलेल्या चहाच्या घोटांनी आणि माझ्या लाडक्या ग्लूकोजच्या बिस्किटांनी विस्कटलेल्या दुपारची घडी इस्त्री केल्यासारखी बसते आणि संध्याकाळची चाहूल लागायला लागताच, डोक्यावर साचलेल्या कामाच्या डोंगराची आठवण होऊन मी पुन्हा माझ्या वर्क स्टेशनकडे वळते.

सह्याद्रीच्या डोंगररांगाच्या अंगाखांद्यावर खेळलेली मी, ह्या कामाच्या डोंगराला मात्र नाकं मुरडते. पण तरीही कामाला लागते. आज करायचं म्हणून ठरवलेल्या कामाला हात लावायला सकाळपासून वेळच झालेला नसतो. त्यात लीडरबाईंचं घोडं आणि पुन्हा करायची स्पेक ह्याचं टेन्शन डोक्यावर असतंच. केसांचा गुंता सोडवायचं काम, रोजच्या रोज केस आणि हेअरकलर मात्र बदलत जातात. एक गुंता सुटतोय तर दुसरा दत्त म्हणून हजर.

संध्याकाळ होते. लोकं घरी परतायला लागतात. ऑफिस उदासवाणं वाटायला लागतं. बाहेर पडायला लागलेला अंधार, सगळी संध्याकाळ काळ्या रंगात रंगवून काढायला लागतो. आता चहाची सोबतही नसते. ग्लूकोजची बिस्किटं तेवढी माझ्या पर्स मध्ये गुपचूप पडलेली असतात. शेवटी आज सकाळी सुरुवात करायच्या कामाला हात लावायला वेळ मिळतो. डोकं चालेल की नाही ह्याची खात्री नसल्याने मी घुलाम अली कानाला लावते.

दिनभर तो मै दुनियाके धंदोमें खोया रहा,
जब दीवारोसे धूप ढली, तुम याद आये, तुम याद आये.

खुर्चीत मी मागे जराशी रेलते, समोरचा स्क्रीन धूसर होतो. उगाचच आईची आठवण येते. संध्याकाळच्या वेळी, घरी गेल्यावरचा चहा, बाबाच्या गमती जमती, एकेकांना टपल्या मारणं. विन्या असेल तर त्याच्याशी मुद्दाम उकरून काढलेलं भांडण, सगळं सगळं डोळ्यासमोर येत जातं. टीम मेंबर्सच्या गराड्यात एकदम एकटं वाटायला लागतं. पुण्याची आठवणही येतेच, आनंद आठवतो, आनंदी आठवते, कुठे अडकून पडलो असं होतं.

तितक्यात मागून कुणीतरी येऊन खांद्यावर चापटी मारतं. मॅडम सो गयी क्या? हमारी डिजाईन तो आपने बनायीही नही? एक दीर्घ श्वास घेऊन मी पुन्हा कामाला लागते. घुलाम आली आपल्याच तंद्रीत गात असतो, त्याचा आवाज फक्त एक आभास बनून कानात घुमत राहतो.

पुन्हा एकदा जेवणाची वेळ होते. बाहेरून आणलेलं काही बाही आम्ही सगळेच बकाबका खातो. कामाला लागतो, घरी जाण्याआधी मला निदान ते डिझाइन पूर्ण करायचं असतं. मध्यरात्रीपर्यंत ते काम संपतं. ईमेल टाकून मी ऑफिसमधून निघते. बाहेर ड्रायव्हर पेंगत बसलेला असतो. त्याला जागं करून घरच्या रस्त्याला लागते. मोजून तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. मी तशीच माझ्या रूममध्ये जाते, कपडे बदलते आणि बिछान्यावर पडते.

आजचं न झालेलं काम, अजूनही खड्ड्यात अडकून बसलेलं घोडं, ऑफिसमधलं राजकारण, सगळं माझ्या मनात घर करून राहतं. डोळ्यावर झापड तर येत असते, पण झोप काही येत नाही. घुलाम अलीसुद्धा काही करू शकत नाही. मग मी खिडकी उघडते आणि बाहेर बघत बसते. कधीमधी दिसणारा चंद्र हिरव्या पानांवर सांडलेला काय झकास दिसतो. जवळ जवळ रात्रीचा एक वाजत आलेला असतो, तरीही मी फोन घेते आणि बाबाला फोन लावते.

तो झोपला असणार मला माहीत असतं, पण तरीही, तो फोन उचलतो, मी बराच वेळ त्याच्याशी बोलत राहते. आज ऑफिसमध्ये काय काय झालं, ते सगळं सगळं सांगते, तोही बिचारा ऐकून घेतो. मग तो घरी काय काय झालं ते सांगतो. शेवटी तो विचारतो कशी आहेस? मला माहीत असतं त्याला काय उत्तर हवंय. मी सांगते मजेत आहे.

कोणत्याही कठीण क्षणाचीही एक मजा असते. ती मजा अनुभवायला शीक, म्हणजे आपले सगळे दिवस मजेत जातात. कधीतरी, कुठेतरी त्याला मी विचारलेलं असतं, की तुला कधीही कसा आहेस विचारलं की तू मजेत असं कसं सांगतोस? तेव्हा त्याने सांगितलेलं कारण आठवतं.

मी फोन ठेवते, पण सगळा शीण कुठच्या कुठे पळालेला असतो. पुन्हा बिछान्यावर पडते. स्वतःलाच विचारते. हाऊ वॉज युअर डे? आतून उत्तर येतं "धमाल". त्या विचारातच कधी झोप लागते समजतंच नाही.

आणि पुन्हा एक गारठलेली सकाळ उजाडते.


- संवादिनी

10 comments:

Sneha said...

... :)

Anonymous said...

सगळ्या मुलींचं आणि बाबांच असच स्पेशल नातं असतं का ग? असतं बहुतेक..... :) अनुभव...
माझ्या मदतीला अशावेळी gallery धावून येते. मी आणि ती मग बघत राहतो तासन तास रस्त्याकडे.
खूप छान वाटलं....... actually, खूप उदास वाटलं :(
हम्म..

Sameer said...

SM : interesting thoughts...the ups and downs...loved the article...simple yet tugging thoughts...

You led me down memory lanes to the island state of Singapore ages back...there i was working on an exactly similar pressure situation transaction.....day starts at 8 am, ends at 3 am...and no end in sight !!

have fun...one day all these ups and downs will weave themselves in a tapestry of wonderful memories...

In umr se lambi saadakon ko, rukhte hue humne dekha nahi...

till then - have dhamaal!!

अनिकेत भानु said...

तुमचा सूर काहीसा निराशात्मक वाटला. जगात बहुतेक सगळ्यांचीच गत अशीच आहे.... तुम्हाला तापदायक वाटणार्‍या टेक टीम ची सुद्धा...

बाकी दिल्लीत प्रत्येक पदार्थात पनीर असले तरी कुठल्याही रस्त्यावरच्या ढाब्यावर गेलात तरी जबरदस्त दाल मखनी किंवा कढाई पनीर मिळेल. आलू पराठे, छोले भटुरे पण मस्तच. मी एकदा अमृतसरच्या येष्टी श्टँडावर छोले भटुरे खाल्ले होते... जबरदस्त... तेल, तिखट, बटरचा मुळीच तुटवडा नाही उत्तरेस. आमच्या केरळातल्या खोबरेल तेलापे़क्षा बरे.

तुमचे दिल्लीतले वास्तव्य आनंददायी होवो, आणि तुमच्या "कष्टांच्या डोंगरां" ची चढाई ट्रेकिंगसारखा सुखद अनुभव होवो ही सदिच्छा.

-अनिकेत

Dk said...

मुंबईच्या लोकांना स्वेटर्सचं कौतूक नाही हेच खरं>> बर बाई तु म्हणतेस ते खराय!!इतर कुठे गेले तर लागतातच की नाही>> इटस अ फॅशन स्टेटमेंट इन मुंबई>>?? well I don't know abt dat! coz fashion cha aanee maazaaa duranwaye hee sambandh naaheeye ( aanee tsehee muleech jaast fashion passionate astaat! :( )

थोडसा सरकाऑस्टीक वाटतोय हा सुर!
पण असो कामाचे डोंगरच उपसत्येस तू आणी त्यातही लंचला पनीर बैंगन एकंदरच कठीण आहे :(
Take a break U need it most!

Keep smiling! :)
Deep

"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons"

a Sane man said...

दिल में एक लहर सी उठी है अभी
कोई ताज़ा हवा चली है अभी

जियो!

Vidya Bhutkar said...

It opened so many gates of memories. Same emotions, same ups n downs and similar days. Only difference is I was in Mumbai. :-) I couldnt help being nostalgic. :-( Great post. I wouldnt say that let the days be over soon cos later u r going to miss these days. :-)
Enjoy while it lasts and take care.
-Vidya.

Anonymous said...

You are lucky to have such a relationship with your father! Not all girls are that lucky!

Bhagyashree said...

hey mast post ! :)

संवादिनी said...

@ स्नेहा, निमिष, भाग्यश्री - थँक्स

@ केदार - हं. असेलही. प्रत्येक नातं वेगळं. स्वतःचा एक वेगळा पदर असलेलं. मी आईबद्दल फर लिहित नाही कारण बऱ्याच गोष्टी आमच्यात न सांगता सांगितल्या जातात. बाबाबरोबर मी जास्त व्होकल असते. आईबरोबर टेलेपथी चालते.

@ समीर - तुम्हीच एसेम आहात का? हं. सडके तो कभी रुकती नही. हम जरूर रुक सकते है. आय विल बट नॉट सो सून.

@ अनिकेत - अहो जाहो नको प्लीज. आपण एकाच एज ग्रूप चे आहोत. नकारात्मक वाटला म्हणजे सूर नकारात्मक होताच. परिस्थितीच काहीशी तशी होती. आणि अप्स आणि डाउन्स हे असणारंच. फक्त दोन्ही ठिकाणी असताना ही फेज कधीतरी संपणार आहे ह्याचं भान ठेवलं की झालं.

@ दीप - टेक अ ब्रेक? नो. अभी तो शुरुवात है. दोन महिन्यात ब्रेक घ्यायला लागले तर कसं होईल माझं पुढे?

@ विद्या - दिवस संपायला फार दिवस नाही आहेत. आणि दो इट वॉज अ मिक्स्ड बॅग. आय विल अल्वेज से आय एंजॉइड इट लाइक नथिंग एल्स.

@ ऍनॉनिमस - हं. मला माहितेय मी लकी आहे. पण हे चालायच्म्च. कुठेतरी पॉसिटीव्ह कुठेतरी नेगेटिव्ह.