Monday, July 6, 2009

होडी

बऱ्याच दिवसांनी आज निवांतपणा मिळाला. दिवसभराच्या लढाईत इतकं हरवून जायला होतं की आपला म्हणून काही वेळ असू शकतो हेही लक्षात राहत नाही. हल्ली हल्ली तर तो असावा अशी अपेक्षासुद्धा नाहीशी होत चालली आहे. पण आज तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी एकटीनंच घरी बसून आळोखे पिळोखे देत दिवस घालवायची संधी चालून आली. आणि दोन्ही हातांनी मी ती संधी आपलीशी केली.

सकाळी उशीरानेच उठले. उठल्यावर काहीच करायचं नसल्याने एकदम बावचळल्यासारखं झालं. मग चहा करायचं ठरवलं. फ्रीज उघडून बघते तर आतमध्ये दुधाच्या डब्या ठेवलेल्या. प्रत्येक डबीत फार फार तर तीन चमचे दूध. अशा फारा डब्या रिकाम्या करून चहाचा घाट घातला. कुठल्याश्या मंद इंग्लिश चहाच्या डिप डिप पिशव्या सापडल्या. त्या तशाच टाकाव्या का फोडून चहाची पावडर पातेल्यात टाकावी ह्याचा विचार करता करता आधण उकळलं सुद्धा. गाळणं मिळालं नाही, मग तशाच पिशव्या पातेल्यात टाकल्या. चहाची चव आणि चहाचा रंग हे दोन्ही चहा पिण्याच्या एक्स्पिरियन्सचा अविभाज्य भाग आहेत. आणि रंग चांगला आला नाही तर चव चांगली लागत नाही, असं हे जुळ्याचं दुखणं. अर्ध्या पातेल्याचा ढग झाला तरी हवा तो रंग येईना. मग जसा झाला, ज्या रंगाचा झाला तो चहा मगात घेऊन खिडकीपाशी आले.

पावसाची रिपरिप चालूच होती. खिडकीच्या काचेपाशी येऊन चहाचा एक घोट घेतला आणि एका उःश्वासासरशी मनातलं धुकं काचेवर दाटलं. मग उगाचच काचेवर धुक्याचं पेंटिंग करत राहिले बराच वेळ. काच भरली की मग बोटांच्या ब्रशनी त्याच्यावर नक्षी काढायचा खेळ. मग उगाचच थंड काचेला गाल चिकटवून खिडकीबाहेर बघत राहणं. वेळ कसा गेला कळलं नाही.

पावसाचा जोरही थोडा वाढला. खिडकी उघडली आणि थंड हवेचा झोतच अंगावर आला. देशातला पाऊस असा कधीच नव्हता. हा पाऊस दूर लोटणारा वाटला. देशातला पाऊस जवळ घेणारा. मनसोक्त भिजता येण्यासारखा. हा पाऊस गरम गरम चहाचा कप घेऊन हीटरच्या शेजारी खुर्ची टाकून स्वेटर बिटर घालून बंद काचेतून बघायचा पाऊस. एखाद्या रम्य चित्रासारखा, पण तरीही आपल्याला त्या चित्रात सामावून न घेणारा. एकलकोंडा.

हॉटेलच्या नावासकट ठेवलेलं एक नोटपॅड दिसलं. हॉटेलात नोटपॅड का ठेवत असावेत हे मला समजत नाही. कुणीही कधी त्यावर काही लिहिलेलं ऐकीवात नाही. लहान होते, आणि कधी अशा हॉटेलात राहायची वेळ आली तर मात्र न चुकता ती नोटपॅड्स उचलून घरी घेऊन यायचे मी. छान छान कागद त्यावर मस्तपैकी हॉटेलचं नाव छापलेलं. आणि त्याचा एक एक कागद आवाज न करता फाडता यायचा. मग त्याची बसची तिकिटं व्हायची. बसची का? विमानाची पण व्हायची. आमच्या विमानात पण कंडक्टर असायचा आणि तो सगळ्यांना विमानात चढल्यावर तिकिटं द्यायचा. मला कंडक्टर व्हायला खूप आवडायचं, अगदी ड्रायव्हरपेक्षाही.

मनात काय विचार आला कोण जाणे, म्हटलं कागदाची होडी करू. जरा आठवून आठवून बनवायला लागले. पण मला नुसती शिडाची होडी बनवता येईना. नांगरहोडी मात्र बरोबर जमत होती. कुणी होडी बनवायला शिकवली आठवत नाही. बहुतेक बाबानेच. पण साधी शिडाची होडी बनवणं सोपं असतं आणि नांगरहोडी बनवणं कठीण असतं एवढं आठवत होतं. पण तरीही साधी शिडाची होडी काही जमली नाही. कठीण आणखी कठीण आणखी आणखी कठीण अशा पायऱ्या चढत जाताना कुठेतरी आयुष्यातलं साधं सोपं कुठेतरी हरवून जातं ना? तशीच माझी साधी शिडाची होडीही हरवून गेली.

शेवटी नांगराच्या होडीचं नांगत कात्रीने कापून टाकलं आणि झाली तय्यार माझी साधी शिडाची होडी. मग हळूच दारासमोरच्या पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोचले आणि आजूबाजूचं कुणी मला बघत तर नाही ना असं बघून ती होडी सोडून दिली खालच्या पाण्यात. पाहत राहिले अगदी नजरेआड होईपर्यंत. जिथपर्यंत दिसली तिथपर्यंत दिसली, पुढे तिचं काय झालं? कशात जाऊन ती शेवटी बुडली असेल, किंवा किती लांब गेली असेल, किंवा एखाद्या लहान मुलाला ती दिसली असेल आणि त्याने ती उचलून घेतली असेल, की कुणाच्या पायाखाली येऊन ती मोडली असेल, ह्याचाच विचार बराच वेळ करत राहिले.

थंडी असह्य झाली तेव्हाच भानावर आले. शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.

पण त्या वाहून जाण्यातही एक मजा आहेच की?

11 comments:

Jaswandi said...

mastch lihilayas ga :)
khup chhan

Deep said...

Hmm as discussed with u hodee karaaycha infact naagar hodee karaycha hi prytn kela pan naahiCH jamlee mala! :( pa nte shirt aani pant jamle :D

aata >>शहर बदललं पण प्रवास थांबणार का? नाही. माझी नांगर कापून टाकलेली शिडाची होडी अशीच वाहवत जाणार, पाणी नेईल तिथे.<< boss fida aahe mi hya aaply lekhan sahileevar!! asch hot na hodeet baslo asto aapn aani mag vaaryaachya dishewar bhrktat jaato kadhe kadhee :) jaande what is imp is ki aapne bhot acchaa likhaa hai :)

Maithili said...

Maage mi lihilel na tech punha copy pest karatey.
khoop ssadhe sope pan tarihi khoop khol khoop gahire. Mhatale tar phakt sadhi HODI, aani mhatale tar thyahoon barech kaahi.
You are really a good writer.( Ha Ha! he mhanaje kajavyane divyala "tasa bara ujed aahe tuza" mhananyasarakhe aahe.)

Monsieur K said...

well written! :)

Samved said...

किंचित जुन्या संवादिनीची आठवण तरी आली वाचून!

फिरुनी येतील दिवस

संवादिनी said...

@ जास्वंदी, केतन - थँक्स. तुमची कमेंट वाचून छान वाटलं.

@ दीपक - अरे पुरे पुरे, किती कौतूक करशील? आवडलं ना वाचून, मग लिहिल्याचं सार्थक झालं की.

@ मैथिली - थँक्स. साधं सोप्पं. येस. गहिरं? ते थोडं वाचणार्‍यावर पण अवलंबून आहे. काढला तर अर्थ नाही काढला तर सगळंच निरर्थक. तसंच काहीसं. आणि काजवा आणि दिवा हे काय प्रकरण आहे. तुला माझं लिखाण आवडलं तर नक्की सांग आणि नाही आवडलं तरीही नक्की सांग, काजव्याचा वगैरे कसलाही विचार न करता :)

@ संवेद - नेमकं बोललास. मलाही थोडीशी आठवण झाली, माझीच. फिरुनी बहुतेक येतील दिवस. :)

Deep said...

हे बघ सॅम, ओघवती लेखन शैली नाही आहे माझी! म्हणून नेमक्या शब्दात कौतुक नाही करता येत जमेल तसं करतो. निदान त्याला तरी पुरे पुरे म्हणू नकोस! :)

Deep said...

kajavyane divyala>> mhnje tila may be kaajwyaane suryaalaa as mhnaych asel!! vaachly mi may be pula ni lihily gataneT :D :D

Tula surydeveechee upama dilee aahe :)

mugdha said...

खुप छान लिहितेस..
तुझ्या धुमसतं बर्फ़, सवयीची माणसं ह्या पण पोस्ट्स वाचल्या...
तुला ही जी काही एकटी क्षणं जगायला लागत आहेत ना? ती फ़ार कमी लोकांना मिळतात. तु खुप लकी आहेस...
आनंदी रहा..:)

mugdha said...

खुप छान लिहितेस..
तुझ्या धुमसतं बर्फ़, सवयीची माणसं ह्या पण पोस्ट्स वाचल्या...
तुला ही जी काही एकटी क्षणं जगायला लागत आहेत ना? ती फ़ार कमी लोकांना मिळतात. तु खुप लकी आहेस...
आनंदी रहा..:)

अनिकेत said...

मस्तच, जाम आवडले लेखन..