Thursday, July 16, 2009

माणसांची सवय आणि सवयीची माणसं

हल्ली घरून काम करतेय. म्हणजे ऑफिसात अजिबात जायचंच नाही. अगदी अख्खा दिवस, अख्खा आठवडा घरून काम. पहिल्यानं वाटलं, मज्जाच मज्जा. घरी मी एकटीच त्यामुळे काहीही करा, वॉच ठेवायला बॉस नाही, कलिग्ज नाहीत, कुणीच नाही. मनाला वाटेल तेव्हा काम करायचं, नाही वाटणार तेव्हा सोडून द्यायचं. झोप काढावीशी वाटली, झोपायचं अगदी काही न करावंसं वाटलं तर तसं करायचं. पण ह्या सगळ्याच्या शेवटी काम तर वेळच्या वेळी झालंच पाहिजे ना.

आता एक आठवडा होत आला. आताशा कंटाळाच यायला लागलाय. म्हणजे, जिथे राहायचं तिथेच काम करायचं आणि काम संपल्यावर पुन्हा जिथे काम केलं तिथेच राहायचं. सकाळची ट्रेन गाठायची धावपळ नाही, की डबा भरायची दगदग नाही. नवरा आपला बिचारा त्याची वेळ झाली की उठतो, फ्रीजमध्ये काल भरून ठेवलेला डबा उचलतो आणि चालता होतो. तो गेलाय हे कळेपर्यंत तो बहुतेक ऑफिसात पोचलेला असतो. मग कंटाळत उठून कामाला सुरवात करायची. अगदीच एकटं एकटं वाटलं तर आरशात जाऊन बघायचं, नाहीतर काहीतरी काम काढून नवऱ्याला फोन करायचा किंवा जॉर्जीला करायचा किंवा आणखी कुणालातरी. कुणालातरी गूगलवर सतवायचं, असले उद्योग चालू असतात.

पण दुपार सरायला लागते, तसं मग कामाचं टेन्शन वाढतं, कारण अमुक एक काम आज संपवायचं असतं. तमुक एक प्रेसेंटेशन संपवायचं असतं कारण बॉसची मीटिंग असते. विकली मीटिंगमध्ये उगाचच उत्साहाने एखाद्या कलीगला मदत करायचं आता नकोसं वाटणार ओझं घेतलेलं असतं ते आठवायला लागतं. कल करेसो आज कर आज करेसो अब चं एकदम उलटं माझं चाललंय. अब करेसो आज कर, आज करेसो परसो.

आणि वर घुम्यासारखं घरात एकटं राहणं. तसं एकटं राहण्याच्या मला प्रॉब्लेम नाही. इन फॅक्ट, एकटं राहायला मला आवडतं कधीकधी. म्हणजे मी गमतीत म्हणायचे, की मी हरवून एखाद्या व्हर्जीन आयलंडवर वगैरे पोचले तर आरामात एकटी राहू शकीन (तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते). पण खूप कठीण आहे. जस्ट टू चेंज युअर एन्व्हायरमेंट, वन नीडस टू गो टू ऑफिस.

माणसं किती आवश्यक आहेत एकंदरीतच आयुष्यात. ऑफिसात इतकी माणसं असतात, त्यांच्याशी आपण बोलतो, नाही बोलतो, हसतो, कधी कधी नाही सुद्धा हसत, पण त्यांचं नुसतं असणं किती आनंददायक असू शकतं ते मला आता कळतंय. मग ह्यावर उतारा म्हणून भर दुपारी फिरायला (आणि मनात असेल तेव्हा पळायला) जायचं काढलंय. लंच टाइम वॉक. भर दुपारी व्यायाम हा प्रकार भारतात एकदम भारीच वाटेल. पण इथे सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची थंडी असते की मी बाहेर गेले तर माझा गोठून पुतळा होईल. एकदम हाउस ऑफ वॅक्स सारखा फक्त मेणाशिवाय बनवलेला.

हळू हळू शेजार पाजाराची माणसंही ओळखीची व्हायला लागलीत. आमचा हा गाव म्हणजे तसा म्हाताऱ्यांचाच गाव आहे. एका बाजूला एक म्हातारे आजोबा आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक म्हातारे आजी आजोबा आहेत. आजी आजोबांचं काहीनं काही चाललेलं असतं. अजून फारशी ओळख नाहीये. पुढे मागे वाढली की त्यांना चहाला बोलवायचा विचार आहे. एकटे आजोबा आहेत त्यांचं बहुतेक त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम आहे. घराच्या खिडकीतून त्यांचं अंगण दिसतं. सतत काही ना काही बागेत चाललेलं असतं. जाता येता कधी दिसले तर हात करतात आणि जोरात ओरडतात "गूड डे".

मी फिरायला जाते तेव्हा मला अजून एक आजी दिसतात. बरोबर त्याच वेळी त्या त्यांच्या कुत्र्याला घेऊन फिरायला बाहेर पडतात. नाक्यावरच्या प्लॉटवर घराचं काम चाललं आहे, तिथले ट्रेडस्मन दिसतात. बघून बघून हाय हॅलो सुरू झालं आहे. आमचं लॉन कापायला एक अजून एक आजोबा आहेत. ते बरीच घरं करतात आमच्या स्ट्रीटची, ते दिसतात. कधी घरी पैसे घ्यायला ते येतात. तेव्हा थोड्या गप्पा होतात.

आपल्याला माणसांची सवय होते आणि सवयची माणसं दिसली नाहीत की चुकल्यासारखं होतं. होतं काही दिवस पण मग नवी माणसं सवयीची व्हायला लागतात आणि मग ते चुकचुकणं कमी होतं. तसंच काहीसं माझं चाललंय.

एकटी एकटी म्हणून आता मीही माझा गोतावळा जमवायला सुरवात केलीच आहे की.

3 comments:

Deep said...

सॅम,

आणि मनात असेल तेव्हा पळायला जायचं>> हं हे एक चांगल केलस भागना सेहत के लिए बढिया होता है तंदुरूस्तीका राज इसीमें छुपा होता है

तिथे पाली आणि झुरळं नसतील तरच. मला त्यांची अनावर भीती वाटते>> हीहीही मी किळस हा शब्द वापरतो तो जरा बरा वाटतो. :)

ओळखी होताहेत हळूहळू हे चांगलच आहे. तुझ्या प्रत्येक पोस्ट मधल एक वाक्य हे 'कोट' असल्या सारखं मस्त असतं! आणि म्हणून मला तुझं हे लिखाण ज्याम भारी वाटतं गं अन् त्याच वेळी मनात क्षणभर का होईना वाटून गेलं की मला का नाही असं छान लिहिता येत? पण क्षणभरच कारण मला लगेच उमजलं! वाचायला मिळतय हे काय कमी आहे? ( आणि खर तर मुळात मी फार आळशी गं मे बी एक पोस्ट एडिटायची जुनी सवय जात नाही म्हणून ही असेल! असो स्वगत बास.)

आणि एक सुचवू का? म्हणजे बघ जमल तर गाच! रियाज कर!! :) (आणि आम्हालाही ऐकव ;) )

संवादिनी said...

@ दीपक - धन्यवाद :)

Gouri said...

saw your blog for the first time today. Don't know haow i had missed it till now. Sundar lihites tu. (tumhi?)
gele 2 athavade gharun kaam karate aahe. aaj ghari basane ashakya jhale, mhanun office la aale - ani aajach he post vaachale. i couldn't agree more :)