Thursday, July 23, 2009

धुमसतं बर्फ

उद्या बर्फात जायचं. शुक्रवारी ओरडतंच नवरा घरात शिरला.
त्याच्या एका कलीगबरोबर त्याने प्रोग्रॅम ठरवून पण टाकलेला. त्याच्यापेक्षा खरंतर मलाच ह्या सर्व गोष्टींचा उत्साह जास्त आहे. प्रचंड उत्साहात करण्याची एकंच गोष्ट त्याला माहीत आहे. ती म्हणजे झोपणे. शनिवारी-रविवारी चांगलं बारा वाजेपर्यंत ताणून देऊन अर्धा विकेंड लक्षात न राहिलेली स्वप्न बघण्यात घालवायचा हा त्याचा शिरस्ता. तर विकेंडला लवकर उठून पूर्ण दिवस सत्कारणी लावायचा हा माझा. त्यामुळे आम्ही एकत्र फिरायला वगैरे जाण्याचा योग मणिकांचन किंवा दुग्धशर्करा वगैरे जे प्रकरण आहे त्यात मोडणाराच. त्यामुळे अजून बरं वाटलं.

ठिकाण तर ठरलेलं होतं. त्यापुढे माझा आणि त्याचा अजून एक वादाचा विषय. त्याला पोचायची घाई फार. मला अजिबात नाही. किती वेळात पोचलात ह्यापेक्षा कसे पोचलात. प्रवासात मजा केली का? किती ठिकाणी उतरलात? कोणत्या नव्या जागा पाहिल्यात? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची मजा मला खूप वाटते. म्हणजे ते रक्तातच आहे. गोव्याला जाताना आम्ही तीन तीन दिवस लावलेत मुंबईहून. बाबाचं म्हणणं, रोज एक वेगळी पिकनिक करायची. वाटेल तिथे थांबावं. हवा तितका वेळ मज्जा करावी आणि वाटेल तेव्हा पुढे जावं. त्यामुळे मला अगदी सगळीकडे उतरून वेळ घालवावासा वाटतो. अरे थांब ना जरा म्हटलं, की म्हणणार. बर्फात चाललोय ना? मग हे झरे नि झाडं नि पक्षी काय बघत बसतेस. हा. काय करा? जोरजोरात पळत सुटा, गाडी दोन आकडे वरच चालवा स्पीड लिमिटच्या. करत करत शेवटी पोचलो.

पुढे एका ठिकाणी गाडी थांबवून गाडीच्या चाकांना चेन लावावी लागली म्हणजे गाडी बर्फावर घसरत नाही. ती लावायला म्हणून नवरा बाहेर उतरला. मला पण उतरायची हुक्की आली. उतरले पण बाहेर मरणाची थंडी होती. त्यामुळे लगेच आत येऊन बसले. लगेच नवरा म्हणाला, आता जिथे जिथे थांबायचं असेल तिथे सांग नक्की थांबवणार. फक्त उतरायचं आणि बाहेर जाऊन यायचं. झालं आता सगळा वेळ त्याला हे पुरणार होतं.

वर पोचलो. स्कीइंग करायचंच होतं. मग त्याचे कपडे आणि स्कीज घेतले होतेच. पण ते स्कीज पायावर चढवायची वेळ आली तेव्हा खरा प्रॉब्लेम झाला. स्कीज लावले की उभंच राहावं लागतं. पडलात तर स्कीज सोडवून उभं राहून परत घालावे लागतात. असं करता करताच बराच वेळ गेला. त्याच्या मित्रानं आम्हाला शिकवलं. पण माझी प्रगती न पडता एका ठिकाणी उभं राहण्याइतपतच झाली. नवऱ्याला बाकी जमलं. त्याने आधीही केलेलं होतं. थोड्या वेळाने मी स्कीज उतरवले आणि सरळ खांद्यावर घेऊन फिरायला लागले. दुसऱ्या दिवशी खांदा खूप दुखत होता.

नवरा आणि त्याच्या मित्राचं स्कीइंग जोरात चालू असल्याने मी एकटीच राहिले.

मग कॉफीचा एक कार्डबोर्ड कप घेऊन निवांत एका ठिकाणी बसले. समोर सगळं पांढरं जग होतं. माझ्या समोरूनच एक छोटी मस्तपैकी स्कीइंग करत गेली. माझ्या कंबरेपर्यंतपण नसेल तिची उंची. रंगीबेरंगी कपड्यातली माणसं, सगळ्यांच्या गोंड्याच्या कानटोप्या. कुठेच नजरेत भरणारी एखाद्या देशी माणसाने किंवा बाईने घातलेली मंकी कॅप. बर्फावरून मस्त घसरणारी, एकमेकांवर बर्फ फेकणारी मुलं. त्यांना ओरडणाऱ्या आया, आणि मुलांना सामील होऊन ओरडणाऱ्या आयांचा अंगावर बर्फ उडवणारे बाबा. कुठे बर्फावर घसरत आइसक्रीम खाणारी जोडपी.

काही कारण नसताना उगाचच मला भरून आलं. कशामुळे? खूप विचार केला पण तरीही समजलं नाही. कदाचित अशा एखाद्या गर्दीने भरलेल्या क्षणी खूप एकटं वाटून जातं, एकटं नसतानाही. तसंच झालं असावं माझं. पुन्हा फिरून आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं? बर्फाने भरलेले डोंगर स्कीज लाऊन धडाधड उतरावं, तसं माझं मन ओळखीचीच वळणं घेत घेत तळाला कधी जाऊन पोचलं कळलंच नाही. तळाला पोचल्यावर, पुन्हा कधीतरी घसरत खाली येण्यासाठी, मोठ्ठा डोंगर चढावा लागणार ह्याची जाणीवही झाली.

तेवढ्यात नवरा आणि त्याचा मित्र दमून भागून आले. त्याला लहान मुलासारखं लांबून हात हलवत माझं लक्ष वेधून घेताना पाहिलं आणि खुदकन हसायलाच आलं. खांद्यावर स्कीज टाकून पुन्हा एकदा मी निघाले. डोंगर चढायला.

बर्फावरची भुरभूर सुरू झाली. धुमसत्या बर्फावर आकाशातून पडणाऱ्या बर्फाने चादर घातली. धुमसतं बर्फ क्षणभर हसलं. पुन्हा आतल्या आत धुमसण्यासाठी.

6 comments:

Anonymous said...

तुझं असं मधेच खूप डिप्रेस होऊन जाणं, आणि नवऱ्याचं मात्र अतिउत्साही असणं हे डोळ्यासमोर येऊन का कोण जाणे पण ’कभी अलविदा ना कहना’ मधल्या अभिषेक राणी चं रिलेशन आठवलं.

Deep said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

एनॉनिमसशी सहमत. संवादिनीचं असं सर्वकाही ठीक असूनही अचानक मन भरून येणं कभी अलविदा च्या राणी च्या कॅरेक्टरशी साम्य दर्शवितं......

माझी एक चुलत आजी असं करण्याला "सुखासुखी गळे काढणं" म्हणायची. :o) ....... गंमत केली गं, दिवे घे!! .......

संवादिनी said...

@ ऍनॉनिमस १ - असा चित्रपट आहे हे मला तुझी कमेंट वाचल्यावरंच कळलं. मुद्दम विकीवर जाऊन काय स्टोरी आहे ती वाचली. मला एकंदरित कल्पना आली होती. पण कंफर्म केलं. पुन्हा एकदा माझाच पोस्ट वाचल्यावर मला असं लक्षात आलं की माझ्या लिखाणातंच ती चूक होती, जेणेकरून वाचकांचा असा समज होईल. मी जे लिहिते ते मी वाचून काही चुकीचा अर्थ तर त्यातून प्रकट होत नाही ना हे पाहणं आवश्यक आहे. पण आळस हा माणसाचा वैरी आहे असं कुणीतरी म्हटलं आहेच. तोच मल नडतो बाकी काही नाही.

बाकी डिप्रेशनचं म्हणशील, तर लग्न झालेल्या बाईला डिप्रेशन आलं तर नवरा हेच त्याचं एकमेवाद्वितीय कारण असायलाच पाहिजे असं नाही. कदाचित पूर्वीच्या काळी असेलंही. पण आज आम्हालाही लग्नबाहेरची, कामाची म्हणा, करियरची म्हणा किंवा आण्खी कशाची म्हणा, टेन्शन्स असू शकतात. बऱ्याच वेळा असंही होतं की मी अतिउत्साही असते आणि नवऱ्याचा मूड डाऊन असतो. ये टाइम टाइम की बात है. पण माझ्या लिहिण्याचा क्रम थोडा दिशाभूल करणारा होता हे मात्र मान्य आहे. ते सुधारायचा प्रयत्न करीन.

अवांतर - तुझी आणि ऍनॉनिमस दोन दोघांचीही कमेंट नवऱ्याला वाचून दाखवली. त्याला म्हटलं लवकर ऍक्शन घे काहीतरी नाहीतर बायको चालली बघ तुझी दुसऱ्याचा हात धरून :)

@ दीपक - सॉरी अगेन

@ ऍनॉनिमस २ - सुखासुखी गळे काढणे. एकदम मान्य. मध्ये एका मैत्रिणीशी बोलताना तिला म्हणाले होते तेच इथे सांगते. आय हॅव्ह अंकॅनी नॅक ऑफ बिंग अनहॅपी इन हॅपिएस्ट ऑफ टाइम्स. पण हे थोडंसं माणसाच्या स्वभावावर पण आहेच. परत ब्लॉगवर लिहिताना गेले काही महिने, उगाचच नेगेटीव्ह गोष्टी उतरतात. ह्याचा अर्थ असा नाही की आनंद नाहीच आहे. एखादी खुपलेली गोष्टच समहाऊ लिहिले जाते, आणि मग त्याचे चुकीचे अर्थ निघतात. मी लाइटलीच घेतलेय कमेंट, सो नो वरीज.

ता. क. - मित्रांनो, आपापल्या नावाने लिहा रे कमेंटस मला काही वाईट वगैरे वाटत नाही. पण लिखाणावर कमेंट करा, माझ्या आयुष्यावर नको. एवढीच नम्र विनंती :)

Deep said...

Sam why u r sayin sorry? actually there is no need of u sayin sorry! u said what u wanted to say in ur post it was clearly my mistake! So I'm sorry once again. Plz remove/ edit your post of sayin sorry to me.

***
hya dhumste barphaanantr chee tuzee aajchee post ashee yenaar aahe he mala maahiti navht g :P great going baakich aata tithech lihito. Bgh jamle tar boluya savistar kadheetaree.. kaay?

दिप्ती जोशी said...

Chhan lihita tumhi khup aavadle tumeche likhan