Thursday, October 8, 2009

अपूर्ण

सध्या इथे छान हवा आहे. ना धड उन्हाळा, ना धड थंडी. मध्ये मध्ये पावसाचा शिडकावा. पानगळ होऊन फांद्यांचे सांगाडे उरलेल्या झाडांना पुन्हा नवी पालवी फुटायला लागली आहे. पुन्हा एक नवा उभार, पुन्हा एक नवा उत्साह आणि मग पुन्हा एक पानगळ. निसर्गाचं चक्र पूर्ण फिरलेलं इथे पहिल्यानेच पाहतेय. उन्हाला अजून नकोसा उष्मा चिकटला नाहीये आणि वाऱ्याला आलेली बोचरी धार बोथट होत चालली आहे. कधी मध्येच सदासर्वदा अंगात अडकवलेला स्वेटर बाजूला फेकून जरा मोकळ्या ढाकळ्या कपड्यात बाहेर जायचा उत्साह वाटायला लागलाय.

झापड लावून कॅलेंडरवरचे दिवस ढकलणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीलाही निसर्गातला हा बदल इतका जाणवावा तर पशू पक्ष्यांची काय कथा? हल्ली सकाळी उठले की खिडकीबाहेर ऊन खात पडलेल्या बागेचं दर्शन होतं. आमच्या घराच्या बाहेरच रस्त्यावर एक मोठं झाड आहे. आणि झाडावर ह्या ना त्या पक्ष्यांचा अड्डा नेहमीच बसलेला.

इथले कावळ्यासारखे दिसणारे पण काळे पांढरे मॅग्पाय पक्षी फार. कधी पोपटासारखे रंगीबेरंगी पक्षी. कधी गवतातले किडे खात लॉनवर इथून तिथे फिरणाऱ्या टिटव्या, तर कधी कबुतराच्या कुळातले वाटणारे काही पक्षी झाडावर हमखास ठेवलेले. बऱ्याच दिवसांनी सगळी नातवंड एकत्र घरी आली की आमचे आजो (म्हणजे आजोबा) व्हायचे तसं वाटतं ह्या झाडाकडे बघून. अगदी अंजारून गोंजारून सगळ्यांना आपल्या फांद्यांवर खेळवतं ते झाड. बाहेर जाताना किंवा बाहेरून येताना उगाचच हात त्या झाडाला लागतात. आपलं काही मिळाल्याचा आनंद होतो.

तर हल्ली सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग येते. मग दात घासायच्याही आधी आमच्या ह्या अजोबाचं दर्शन घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही. आज कोण कोण आलंय ते पाहिलं की मग दिवसाची सुरुवात काय मस्त होते. गेले काही दिवस मात्र पक्ष्यांच्या किलबिलाटातलं संगीत कुठे तरी हरवून गेल्यासारखं वाटलं. म्हणजे कधी कधी गाणं चालू असताना तबला उतरल्यावर कसा बेसुरा वाटतो, तसंच.

घरून काम करण्याचा एक फायदा म्हणजे हवं तिथे बसून काम करता येतं. मी हल्ली मुद्दामच झाडाच्या समोरच्या खिडकीत जाऊन बसते. दुनयाभरच्या आकडेमोडीने आणि मेलामेलीने डोकं विटलं की पटकन समोर आजोबा नातवंडांचा निर्व्याज खेळ पाहता येतो. परवा अशीच बसले होते तर एक गोष्ट लक्षात आली. झाडावर फक्त मॅग्पाइज होते. बाकी सगळे पक्षी एकतर लॉनवर नाहीतर शेजारच्या झाडावर होते. पहिल्याने वाटलं हवाबदलासाठी दुसरीकडे बसले असतील. मग लक्षात आलं मामला थोडा गंभीर होता.

झाडाच्या बेचक्यांत घरट्यासारखं काही दिसलं. दुर्बीण काढून बघितलं तर होयकी, मॅग्पाइजनी चक्क घरटं बांधलं होतं. इतर सर्व पक्ष्यांना आजोबांवरून त्यांनीच उडवलं होतं. त्यांच्याच दादागिरीमुळे किलबिलाटातलं संगीत वगैरे हरवून बसलं होतं. आता काय नवीनच चाळा लागला. घरटं बघत राहणं आणि काही विशेष घडतंय का ते पाहणं.

एक दोन दिवस असेच गेले. मी बाहेरून घरी येत होते आणि नेहमीसारखा माझा हात झाडाकडे वळला अन काय झालं काही कळलं नाही एकदम कावळ्यासारखा रागीट ओरडण्याचा आवाज आला आणि एक मॅग्पाय चक्क वरून माझ्याकडे येत असलेला पाहिला. मला वाटलं हा माझ्या डोक्यावर आपटणार, पण तेवढं न करता फक्त डोक्याला वारा घालून तो निघून गेला. त्याचा तो अवतार बघून मी प्रचंड घाबरले आणि अंगणात पळाले. डेव्ह आजोबांनी माझी ही गंमत पाहिली. ते म्हणाले की पक्ष्यांनी घरटं बांधलंय आता ते ओव्हरप्रोटेक्टिव्ह होतात, माणसांसारखेच.

झालं, तेव्हापासून जरा लांबूनच. मॅग्पायभाऊ आणि मॅग्पायीण्वहिनींना धोकादायक वाटणार नाही अशा अंतरावरून येणं जाणं आणि दुर्बिणीतून घरटं बघणं चालू होतं. साधारण आठवडा झाला असेल. थोड्याच दिवसात बाळ मॅग्पाय जन्माला येणार होतं. माझ्या नवऱ्याला ह्यात भारी उत्साह. तो अगदी रोज न चुकता मला अपडेट विचारायचा.

शनिवार सकाळ झाली तीच मुळी पावसाच्या आवाजाने. जन्मात पहिल्यानेच पडायला मिळतंय असा तो पंधरा मिनिटं पडला. हंतरुणात पडल्या पडल्या पावसाचा आवाज छान वाटत होता. थोड्या वेळाने पाऊस सरला आणि लख्ख ऊन पडलं. मी उठले आणि नेहमीसारखं खिडकीतून घरटं पाहिलं. घरटं तसंच होतं पण मॅग्पायभाऊ आणि वहिनी बहुतेक विकली शॉपिंग करायला गेले होते. दुपारी परत पाहिलं तर चक्क झाडावर इतर नेहमीचे पक्षी बसलेले. काय झालं कळेना. संध्याकाळी बाहेर पडलो तर झाडाखाली अंड्याची टरफलं दिसली. नुसती टरफलं.

मी म्हटलं झाडावरून पडली अंडी. पिलं व्हायच्याआधीच गेली. नवरा म्हणाला नाही पिलं झाली असतील नाहीतर नुसती टरफलं नसती पडली. विचारणार कुणाला? झाडाला विचारलं असतं त्याला उत्तर देणं शक्य असतं तर.

हल्ली सकाळ किलबिलाटानंच होते. मीही खिडकी उघडून बघते छान ऊन पडलेलं असतं. निरनिराळे पक्षी बागडत असतात. त्यात एखादा मॅग्पाय बघितला की उगाचच ती टरफलं आठवतात.

ना नात्याची ना गोत्याची, पण ही अपूर्ण गोष्ट मात्र कधीच पूर्ण होणार नाही.

12 comments:

Mugdha said...

sakali sakali tujhya lekhachi mejvani..
divas tar chhan suru jhalay..
Chhan lihilaas lekh!!!

Anonymous said...

भाग्यवान आहात. आम्हाला ईथे घरट काय पन साधी चीमणी पण दिसत नाही.

भानस said...

किती जीव गुंततो नाही आपला. मला आवडत असं गुंतायला नाहीतर कोंडल्यासारखं वाटत राहतं. अग नक्की पिल्ल झाली असतील.:)
आवडली ग पोस्ट.

Salil Chaudhary said...

I want to contact you. Can you pls drop ur email id here.

Salil

Abhi said...

Mast jamalay lekh.

-abhi

Anonymous said...

८ ऑक्टोबर नंतर काहीच नाही? पूर्वी लहानपणी मुंबईत दिवाळी कशी साजरी व्हायची ह्याच्या आठवणी आणि त्या आठवून तू कशी व्याकूळ झालीस ते नाही लिहीलंस? की झालंय ते मागच्या दिवाळीला लिहून? पण म्हणून काय झालं? पुन्हा लिहायचं त्याबद्दलच. आठवण तर येतेच ना दर दिवाळीला. ह्यावेळेस वेगळ्या शब्दांत मांडलं असतंस तू तेच.

ढंप्या said...

मला तरी आवडल हे पोस्ट तुझ. पुढच्या प्रत्येक पोस्टला एक हक्काचा वाचक म्हणून मला मोज इथून पुढे.

Sneha said...

aga kuthe aahes? visaralis ki kay? mail tari kar..

Dk said...

liha ki aata baaisaheb :)

Dk said...

sam apurna gosht lihilis ok theeke aata kadhi lihinaar aapn? tu nahi gaytri nahi tejaswini nahi yogesh nahi ann ase barech lok lihit nahiyet sadhya... kaay vaachaaych mag aamhee? ;)

Dk said...

Sam missing your blog a lot! :(

Bhagyashree said...

lihi na ata !! :(