Thursday, February 12, 2009

नो प्रॉब्लेम

नवऱ्याचं ऑफिस पुन्हा सुरू झालं. मला अजून पंधरा दिवस सुट्टी आहे. पण सुट्टीची अशी मजा येत नाहीये. उगाचच आपण सुट्टी घेऊन घरी बसलो असं फिलिंग येतंय. पण सुट्टी नाही तर मी मुंबईत राहू शकणार नाही. म्हणजे थोडा वेळ का होईना जो नवऱ्याबरोबर घालवता येतोय तेही जमणार नाही. सासरेही ऑफिसला जायला लागले. त्यांचं खरंतर सतत काम चालूच होतं घरूनही पण आता ऑफिसला जायला लागलेत. सासूबाई घरीच असतात आणि सूनबाईही.

खूप छान आहेत त्या म्हणजे सासू ह्या संस्थेच्या पारंपरिक इमेजला पूर्ण विरुद्ध आहेत. मला स्वैपाकात गती नाही हे त्यांना माहिती आहे. पण मला जास्त सला वगैरे देत नाहीत. त्या करतानाच मला एकेक सांगत जातात की असं केलं तर असं होतं तसं केलं तर तसं होतं. तुझं चूक माझं बरोबर असा ऍटिट्युड नाहीये. बऱ्याच गोष्टी आमच्यापेक्षा जरा वेगळ्या करतात त्या. पण मी त्यांना तसं भासवून देत नाही.

एकदा
पिक्चरला पण घेऊन गेल्या, त्यांच्या मैत्रिणींबरोबर. मला एवढं ऑकवर्ड झालं होतं. पण काय सांगा? कधी कधी असं वाटतं सुट्टी वाया चाललेय. आई बाबांची भेट होत नाही आणि नको त्या (सासूबाई नव्हे, त्यांच्या मैत्रिणी) लोकांबरोबर वेळ घालवावा लागतोय.

अर्थात आठवड्यात दोन वेळा घरी जाऊन आलेच. माहेरी जाण्याची मजा काय आहे ते आता कळतंय. सासरी भिजल्या मांजरीसारखी असणारी मी घरी पोचले की मस्त अघळ पघळ पसरते. दुपारी गेले तर आई नसतेच, पण बाबा असतो. मग काय? आपल्या राजकन्येसाठी राजा चहाही बनवायचे कष्ट घेतो. अगं हे घे, ते घे, कचोरी आणलेय मुद्दाम तुला आवडते म्हणून, गायवाडीतली नानकटाई आणलेय, आयडिअलचे वेफर्स आणलेत आणि काय नि काय. पोहे बनवू का? नाहीतर शिरा बनवतो, की परशुराम वाडीचा वडापाव आणू? असे असंख्य प्रश्न. मी त्याला म्हणते अरे जाऊदे रे, माझ्याशी गप्पा मार. मीच चहा बनवते आणि आपण मस्त ग्लूकोज ची बिस्किटं खाऊ.

लग्नाआधी आभाळ खाली आलं तरी चालेल किचन मध्ये जाणार नाही म्हणणारा बाबा चक्क मला चहा बनवू का म्हणून विचारतो ना, तेव्हा कसंसंच होतं. एकदम बिचारा वाटतो तो मला. आणि डोळ्यात पाणी येतं. मग एकमेकांपासून डोळे लपवायचा खेळ खेळायचा. तोपर्यंत आई येते. मग पुन्हा हे करू की ते करू सुरू होतं तिचं.

लग्नाआधी काढलेला आमच्या चौघांचा एक मस्त फोटो त्याने फ्रेम करून आणलाय. तो एक बदल झालाय. बाकी घर तसंच आहे. शेजारी पाजारीही तसेच आहेत. रहाटगाडगं चालतं आहे. गाडग्यातलं एक भांडं पडलं म्हणून इतरांचं काम थांबत नाही. त्रास फक्त त्या भांड्याला होतो आपण त्या चक्रात नाही म्हणून.

एकदा मी आणि आई होतो तेव्हा आई सांगत होती, बाबाला बिलकूल करमत नाही. मग जुनं कुठलंतरी रेकॉर्डिंग काढून बसेल, नाहीतर फोटो बघत बसेल. खरंतर तिलाही करमत नसणार, पण ती कबूल करणार नाही.

संध्याकाळी दोघंच एकटे घरी असताना काय वाटत असेल त्यांना? मुलगा इथे आहे पण तोही बाहेर जायचं म्हणतोय, मुलीचं लग्न झालेलं, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं. तानपुरा नसलेला माझा कोपरा, रिकामं झालेलं माझं कपाट, आईने हौसेने माझ्यासाठी आणलेल्या काही बाही वस्तू. सगळं सगळं आठवतं आणि खूप खूप रडायला येतं. पण आदर्श सूनबाईच्या कर्तव्यात सतत हसतमुख राहणे हेही येतंच. मग कढ आवरायला लागतात, आवंढे गिळायला लागतात.

मग
तो बांध कधीतरी बाथरुमच्या भिंतीआड फुटतो किंवा रात्रीच्या अंधारात नवऱ्याच्या शर्टाची बाही भिजवून जातो. त्याला वाटतं काही प्रॉब्लेम आहे का?

पण त्याला कसं समजावणार की काहीही प्रॉब्लेम नसूनही प्रॉब्लेम्स असतातच..

- संवादिनी

15 comments:

Dk said...

:-( hmm don't be sad! Enjoy each moment as it is :)

Vidya Bhutkar said...

मला वाटतं, सासर आणि माहेर एकाच गावात असेल तर बाईची अजूनच ओढाताण होते. आणि त्यात तू जास्त दिवस घर सोडून रोहिलीही नाहियेस ना. माझ्यासारखे सासर-माहेर पासून तिसऱ्याच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना एव्हढा त्रास होत नाही बहुदा.
Dont worry much and try to enjoy ur time with the dear husband. नाहीतर दूर गेल्यावर त्याच्याबरोबरही नीट न राहिल्याचं दु:ख! :-( किती गोष्टींचा विचार करावा लागतो ना..... असो. Give it some time, change is always hard to digest....and this much change....too much to take. :-)
-Vidya.

Jaswandi said...

Chhaan lihilays... mahit nahi ka, vachun dolyat paani ala...

general, "pratyek dhagala chanderi kinar asate" vagaire mhantat loka.. te barobar aselch rather aahech pan tuza attitude thodasa ulta disayla laglay halli.. mhanje Chanderi kinar dakhavlyavar tu dhag dakhavtyes... tu je lihityes tyacha structure badalun bagh na thoda... vachnaryannahi te enjoy karata yeil manapasun! asa baba mala vatata.. obvsly mala tuzyaitka kalat nahi.. pan bagh vichar karun!

(ani sorry khup cliche example dilay)

Sneha said...

hmm jaswandi mhanatey tas malahi vatatay..

jast kahi bolat nahi lecture detey asa vatel but still vichar kar.. swatahala kahi prashn vichar..

सखी said...

संवादिनी, लिहिण्यातला प्रामाणिकपणा खरंच आवडला. आपल्याला जे वाटतं,जसं वाटतं ते आपण लिहावं...कुठेतरी मांडावं असं नक्कीच वाटत असतं. पण एक तुझ्या लिहिण्यातून डोकावलेला विचार म्हणजे..माहिती नाही कितपत बरोबर असेल;"पण जसं वाटतंय तसंच लिहीत जा "no doubt'त्याचबरोबर प्रत्येक पोस्ट टाकल्यानंतर दुस-या दिवशी परत एकदा नुसतीच वाचून काढ पण या वेळी संवादिनी म्हणून नाही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघ आणि हो दृष्टिकोनातून ’व्यक्तिमत्त्वातून नाही’. आपण स्वत: ब-याचदा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करु शकतो हेच आप्ण पाहत नाही. करुन बघ....तुझा फ़रक तुला नक्की जाणवेल."
अर्थात हे सगळं उपदेशाचे डोस म्हणून नक्कीच नाही...तुझे पोस्ट्स कुठेही अवास्तव वाटत नाहीत आणि एका मैत्रिणीला भेटल्यासारखं वाटतं म्हणून....

पूनम छत्रे said...

chhaan lihilay.. maaher soDawat naahI aaNi saasarashee ajoon poorN ekaroop hotaa yet naahee yaatalee stage ahe.. hotaa hai..

sagaLa neet hoilach, veL alee kee. all the best.

पूनम छत्रे said...

chhaan lihilay.. maaher soDawat naahI aaNi saasarashee ajoon poorN ekaroop hotaa yet naahee yaatalee stage ahe.. hotaa hai..

sagaLa neet hoilach, veL alee kee. all the best.

Bhagyashree said...

poonam shi agadi sahamat!
he vachlyavar vatta, baray mi sagla sodun lamb ch ale.. maher samor disat asel ani tarihi farvela jata yet nasel tar jo kahi sairbhair pana ala asta, to zala nahi!

i knw its very strange stage, but anyway enjoy! :)

संवादिनी said...

@ दीप - आय ऍम रिअली नॉट सॅड. कदाचित लिहिताना, ज्या गोष्टींना जनरली आउटलेट मिळत नाही, त्या गोष्टी लिहिल्या जात असतील. आय ऍम एनजॉयिंग टू. नॉट रायटींग अबाउट इट मे बी.

@ विद्या - तू म्हणतेस ते खरंच आहे. आपण शहरातंच नाही म्हटल्यावर घरी नसण्याचं दुःख कमी असणारंच. माझंही बहुतेक तसंच होईल. लग्न झाल्यावर नुस्ता विचारंच करतेय. काहीही करण्याआधी ह्याचा परिणाम काय होईल? ह्याचा विचार दहादा करावा लगतो.

@ जास्वंदी - तुला माझ्याइतकं कळत नाही? ह्याला आता विनय म्हणायचा की हरभऱ्याच्या झाडावर चढवणे. तू म्हणतेस ते कदाचित बरोबर असेलही. हल्ली मी ग्लास अर्धा रिकामा आहे असं जास्त म्हणते, अर्धा भरलाय असं कमी. पण लिखाणात कुठेतरी आपल्या मनात काय चाललंय ते उतरतंच ना? तसंच होत असावं. स्ट्रक्चर बदलण्याचं म्हणशील, तर मी काही स्ट्रक्चर कधी ठरवतंच नाही. जसं मनात येतं तसं लिहिते. म्हणूनही असेल.

@ स्नेहा - हं. हल्ली प्रश्न विचारणंच चाललंय. प्रॉब्लेम हा आहे की रेडिमेड उत्तरं नाहीत त्या प्रश्नांची. मग ही प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता कुठेतरी स्वतःवरचा विश्वास कमी होत चाललाय असं वाटायला लागतं. असो, अता मी लेक्चर देतेय असं वाटेल

@ सखी - तुझा अभिप्राय वाचून खूप आनंद झाला. मला ब्लॉग हे एक उत्तम आऊटलेट आहे. जास्त विचार न करता लिहिलं की मनात आहे तसं उतरतं आणि जसं तू म्हणतेस, तसं दुसऱ्या दिवशी वाचल्यावर काही उत्तरं सापडतात, काही नवे प्रश्नही पडतात. पण ऍज अ प्रोसेस इट गिव्हस मी अ लॉट.

@ पूनम - थँक्स अ लॉट. हं तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. माहेर सोडवत नाही आणि सासरी रुळलेले नाही. जसा वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल असं वाटतंय.

@ भाग्यश्री - हं. माझंही आता तसंच झालंय. फीलिंग मच बेटर.

Sneha said...

sam prashnanchi redimade uttar asati tar tya prashnanchii maja kay ga? mi jagatana prashn padalet mhanun kadhich radat nahi ..ti uttar majhyakade nasatat.. paN mala 1k vishwas asato te prashn maajhet.. maajhyaa vaatelaa aalele.. tyachii uttar milavaNyaachi kshamata nakkich maajhyaat aahe.. mhaNun maajhyaa vaatelaa te aalet...
aayushya jagat asataana pratyek veli olakhichi vaLaN yetilach asa naahii.. anolkhi vaLaNanvarun vaat kaadhun aapalya dhyeyakade pohachal kii tyaatahi anandach asato ga.. mala tar baryachada dukhatahi anad dadalela disato..

aata mi lecture detey..kadachit..tula majhya peksha nakkich jast kalat pan..still

Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.
संवादिनी said...

@ अनामिका - तू म्हणतेस ते अतिशय योग्य आहे. माझ्या सारखी सेल्फ सेंटर्ड, इगोइस्टिक मुलगी दुसरी सापडणार नाही.

Anamika Joshi said...
This comment has been removed by a blog administrator.
Anamika Joshi said...
This comment has been removed by a blog administrator.
Anamika Joshi said...
This comment has been removed by a blog administrator.