Thursday, August 20, 2009

मैत्रीण

सकाळी सकाळी स्टेशनला जायला निघाले. डोळ्यात पूर्ण न झालेली झोप होती. नव्या जबाबदारीचं थोडं टेन्शन.

माझा बॉस एकदम चक्रम आहे. कोणतीही व्यक्ती कोणतंही काम सहज करू शकते असा त्याचा गैरसमज आहे. म्या पामर ऍनालिस्टला त्याने सेल्स च्या कामाला जुंपलंय. काम तसं इंटरेस्टिंग आहे. म्हणजे नव्या क्लायंटला भेटणं, त्यांना आम्ही कसे चांगले आहोत च्या गोळ्या देणं वगैरे वगैरे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. ते म्हणजे साधारण तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं. अर्धा तास एक दोन एक दोन करीत स्टेशनला पोचलं की मग तास सव्वा तास रेल्वेमध्ये झोपा काढायच्या. मग साधारण अर्धा तास ट्रॅममध्ये डुगडुगून काढला की आलं क्लायंटचं ऑफिस. ह्या सगळ्या व्यवस्थेतली माझे पाय सोडून जी इतर वाहनं आहेत ती कधीही त्यांच्या मर्जीनुसार बंद, धीमी होऊ शकतात, त्यामुळे त्यासाठी अजून अर्धा तास. बरं गाडीत झोप वगैरे झाली असल्याने माझा चांगलाच अवतार होतो. तो अवतार ठीक ठाक करायला अजून पंधरा मिनिटं.

एवढं सगळं करून क्लायंटची मीटिंग मेली तासाभरात संपते. आणि पुन्हा दोन तासाची वणवण करीत मी घरी येते.

काही दिवस हे प्रकरण चाललंय. रोज नाही जायला लागत पण बऱ्याच वेळा लागतं. रोज गाडीत एक छोटी मुलगी आणि तिची आई दिसतात. गाडी तशी भरलेली असते, पण समहाऊ आम्ही दोन तीन वेळा समोरासमोर आलो. हसण्याइतपत ओळख झाली. मुलगी जाम गोड आहे. गोरी गोरी पान. गालांचे लाल लाल टोमॅटो. निळे डोळे. निळे म्हणजे अगदी निळे. नेत्रदानाच्या ऍडमध्ये ऐश्वर्या रायचे दिसायचे तसले. आणि सोनेरी केसांना लाल निळी रिबीन बांधून केलेल्या दोन शेपट्या. दप्तरासारखी बॅग आईच्या हातात.

एकदा झटकन माझ्या लक्षात आलं की माझ्या पर्स मध्ये दोन किटकॅटचा एक मिनी पॅक आहे. मग तिच्या आईला विचारून तिला दिली. मग एकदम बाईंची कळी खुलली. इतके दिवस नुसती हसायची. आता भरपूर बोलते. फक्त न चुकता मला किटकॅटचा मिनी पॅक न्यायला लागतो. तिची आई मला ओरडते चॉकलेट दिलं की. पण माझी ही छोटी मैत्रीण एकदम चुणचुणीत आहे. तीच आईला सांगते, की ह्या पॅकमध्ये दोन किटकॅट त्यातली अर्धी मी "शॅमा", (म्हणजे म)ला देणार, अर्धी तुला देणार, एक उरली की त्यातली अर्धी मी खाणार आणि अर्धी जेसन ला देणार. मग काय हरकत आहे? जेसन म्हणजे तिचा भाऊ.

मग उठून माझ्या शेजारी येऊन बसेल, आणि सांगत राहील "शॅमा, टीचर गेव्ह मी धिस" करून एखादी ट्रॉफी दाखवेल छोटीशी. आपल्याकडे उत्तेजनार्थ बक्षीस देतात ना तसं काहीतरी. शॅमा लुक ऍट धिस, शॅमा डू धिस, गिव्ह दॅट, अशा ऑर्डरी सुटत राहतात. तिची आई तिला ओरडते मध्ये मध्ये. पण मला बरं वाटतं. तेवढाच वेळ जातो.

परवा माझ्या पर्सशी खेळत होती आणि माझं पाकीट काढलं पैशाचं. आत नाणी होती खूप. नोटा नव्हत्या. म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.

परवा अशीच एक मोठी सहा तासाची वारी करून घरी आले. रोज संध्याकाळी माझ्या दिवसात काय काय झालं ह्याचे डिटेल्स नवऱ्याला कंटाळा येईपर्यंत ऐकवायला मला खूप आवडतात. बऱ्याच वेळा तो लॅपटॉप उघडून बसलेला असतो किंवा टीव्हीसमोर असतो, तेव्हा. असं? वाह! ओके, येस, अशी उत्तरं टाकून तो माझं बोलणं ऐकतोय असं दाखवत असतो. पण परवा साहेब मुडात होते कसल्या कोण जाणे पण एकदम ऐकून घेतलं, मला ट्रॅव्हेलिंगचा त्रास होतो, दमायला होतं म्हणून चहा वगैरे केला. आणि मग म्हणाला उद्यापासून नो प्रॉब्लेम. तू आपली गाडी घेऊन जा. मला लांबच्या साईटवर जायचंय म्हणून पुढचे तीन महिने कंपनीची गाडी आहे.

सही! म्हणजे आता सगळी कटकटंच मिटली. उद्यापासून मला गाडीने जाता येईल, वेळ वाचेल, कमी दमायला होईल, लवकर घरी येता येईल, पण..

पण माझी छोटी मैत्रीण आता भेटणार नाही. पर्समध्ये मिनी किटकॅट कुणासाठी ठेवू? शॅमा, शॅमा करून मला कोण हाक मारेल? मी नाही दिसले आठवडाभर तर ती नाराज होईल का? शॅमा कुठे म्हणून आईला विचारेल का? एक ना एक हजारो प्रश्न ...

रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो लाखो लोकं दिसतात. त्यातल्या एखाद दुसऱ्याशीच आपला असा सूर जुळतो. आनंद देतो, पण शेवटी विरूनच जातो.

तसं नको व्हायला. छोटीला भेटायला तरी पुन्हा कधीतरी ट्रेनने गेलंच पाहिजे.

4 comments:

Dk said...

"शॅमा" हीहाहाहा सही आहे हे.

अर्धा तास एक दोन एक दोन करीत >> बापरे दररोज अर्धा तास तू चालतेस? मी ही कल्पनाही सहन नाही करू शकणार. (हां आता मॉर्निंग वॉक वगैरे ठीक आहे पण... अर्धा तास स्टेशनला जायला म्हणजे टू मच) अगं त्या छोटुकलीच नाव नाही सांगितलस.

तासाभराच्या मीटिंगसाठी मला तीन तास आधी निघावं लागतं>> हेहे ह्या वेळात मी दरदिवसाआड पुणे-मुंबई अश्या फेर्‍या मारेन. ;)

म्हणाली शॅमा यू आर सो रिच. यू हॅव्ह सो मच मनी. एव्हन माय बँक डसंट हॅव सो मच. असं चाललेलं असतं.>> हम्म्म हे मात्र खरं आहे गं :)

सहही गाडी म्हणजे. आता गाडीने जाशील तेंव्हा त्या छोटुकलीला लिफ्ट दे कधीतरी. नाहीतर मग ट्रेनचा ऑप्शन आहेच.

काय गंमत आहे बघ माझ्या रोजच्या प्रवासातल्या गंमती जंमतीही साधारण अश्याच आहेत लिहेन कधीतरी त्याच्याबद्दल. बादवे प्रवास वरून आठवलं सानियाच "प्रवास" आलय मागच्याच आठवड्यात घेतलं पुण्यात पॉप्युलरमधून आणि वर्क फ्रॉम होम करत असताना वाचूनही काढलं सारं.

संवादिनी said...

दीपक, तिचं नाव जेसिका पण म्हणायचं जेस. तिला लिफ्ट नाही देऊ शकत कारण तिचा पत्ता मला माहीत नाही आणि मी उतरते तिथेही ती उतरत नाही. पण एखाद दिवस मुद्दाम खरंच जाऊन बघणारे, भेटते का ते. म्हणजे भेटेलंच. प्रवास? नाव ऐकलं नाहीये. तसंही सानियाची पुस्तकं मला खास आवडत नाहीत. म्हणजे मी एकंच वाचलंय ते नाही आवडलं. आता नावही आठवत नाहीये. असो शक्य झालं तर वाचेन. प्रवासातल्या गमती जमती नक्की लिही. मला दुसरं काही जमतंच नाही. म्हणून मी तेच लिहिते

भानस said...

सूर जुळलेल्या संवादात खंड पडायला नकोच,:)
आवडली गं पोस्ट.सानिया मला आवडते. पुन्हा एखादे वाचून पाहा,:)

Dr Prashant Mahale said...

chan lihites g tu. mazyakade aahe bharpur kahi sangnyasarkhe pan shabd julun yet nahit. tips de na mala jamle tar.