Thursday, August 27, 2009

आणखी एक गणपती

हा आठवडा गणपतीचा. गेल्या वर्षी आखातात होते गणपतीच्या वेळी. ह्या वर्षी इथे आहे. मी घरी नसतानाची ही दुसरी गणेश चतुर्थी. दोन वर्षापूर्वी आम्ही चौघेही घरी होतो. चौघे म्हणजे मी, माझा भाऊ आणि आई बाबा. गेल्या वर्षी एक मेंबर कमी. मी आणि ह्या वर्षी अजून एक मेंबर कमी, माझा भाऊ. आता आई आणि बाबा आणि आमचा सर्वांचा लाडका गणपती.

बाबाला सांगून ठेवलं होतं गणपती घरी आला की मला पहिला फोटो काढून पाठवायचा. आमचा गणपती कधीही बदलत नाही. म्हणजे मला कळायला लागल्यापासूनची जी मूर्ती आहे ती दर वर्षी तशीच असते, पण तरीही ह्या वर्षीची मूर्ती बघण्याची खूप उत्सुकता होती. मखरही पाहायचं होतं. माझा भाऊ नाही म्हणजे मखराची मजा नाहीच. त्याला मी कितीही शिव्या दिल्या तरी ह्या बाबतीत त्याचं फक्त कौतुकच होतं. ह्या वर्षी आईने केलं होतं मखर. कमळाची प्रतिकृती बनवली होती तिनं.

यंदा गणपती रविवारी आले. बरं वाटलं. सकाळी उठून बाप्पाची पूजा केली. म्हणजे आमच्या देवातल्या बाप्पाचीच. मग मोदक बनवायचा घाट घातलेला. घरी असताना आई बनवायची, आजीही बनवायची. दोन्हीकडे जाऊन मोदक खायचं काम आमचं. कधी मला स्वतःला मोदक बनवायची वेळ येईल ही रिऍलिटी तेव्हा उमजलीच नव्हती. ती परवा उमजली. आदल्या दिवशी आजीला फोन करून रेसिपी लिहून घेतली होती. आजीची रेसिपी म्हणजे गंमतच आहे. नारळ खोवून घे त्यात गूळ घाल. किती गूळ घालू? अगं घाल अंदाजाने. मीठ? अंदाजाने. तेल? अंदाजाने. पीठ? अंदाजाने. मग म्हणाली आईला फोन कर. आईने जरा सांगितलं व्यवस्थित. थोड्या वेळाने आजीचा पुन्हा फोन आला. म्हणाली नैवेद्याच्या मोदकाचं पुरण आधी चाखून बघायचं नसतं पण तू पहिल्यानेच करतेयस ना? मग पुरणाचा नैवेद्य दाखव आणि घे चव. हुश्श!

मोदक बरे झाले. मुख्य म्हणजे गोड असूनही नवऱ्याला आवडले. मला तर काय आवडतातच. मोदकाची शेंडी फोडून भरपूर तूप ओतून खाल्लेला मोदक म्हणजे जीव्हासुखाची परमावधीच. जेवणानंतर सोफ्यावर पडल्या पडल्या कधी डोळा लागला कळलंच नाही.

संध्याकाळच्या सावल्या पसरल्या आणि जाग आली. रविवारची संध्याकाळ म्हणजे सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. येणाऱ्या आठवड्याचं काम डोळ्यासमोर. इस्त्रीचा ढीग. घरातली उरलेली कामं डोळ्यासमोर दिसायला लागली. पण काही करावंसं वाटेना. घरचंच सगळं आठवत राहिलं. संध्याकाळी कोण कोण येईल? घरी बनवलेले खव्याचे मोदक कसे झाले असतील? या वर्षी गाणं होणार नाही म्हणून बाबा नाराज असेल का? खाली उत्सवात यंदा काय काय कार्यक्रम असतील? आरती म्हणताना अण्णांचा सूर जास्त टिकेल की माझ्या वयाच्या मुलांचा? यंदा मांडव घातला की घालून घेतला? हळदी कुंकू कधी आहे? मखर बनवायला माझा भाऊ नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याची आठवण काढली असेल का? माझ्या कोण कोण मैत्रिणी माहेरपणाला आल्या असतील? मी असते भारतात तर मी जाऊ शकले असते ना? उत्तरांतून प्रश्न आणि प्रश्नांतून उत्तरं असं चालू होतं.

आपल्या मनाला एक विलक्षण शाप आहे. जे आपल्याकडे नाही त्याचा विचार करत बसण्याचा आणि एक विलक्षण वरदान आहे. आपण जिथे नाही तिथे मनानेच जाऊन येण्याचं.

मी घरी गणपतीला नसण्याचा विचार करत बसले खरी. पण करता करता स्वतःच घरी एक फेरी मारून आले मनाने. आईने केलेले खव्याचे मोदक चाखले, आजीचे अंदाजपंचे बनवलेले उकडीचे मोदक अगदी शेंडी फोडून आत ओतलेल्या तुपासकट चाखून आले. उत्सवाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. दर चतुर्थीला करते तसा अण्णांना जाऊन नमस्कार करून आले. अगदी आमच्या बाईंचं गाणं पण ऐकून आले. अगदी उत्तरपूजेजे मंत्र म्हणताना झालेला बाबाचा कातर स्वरही ऐकला. आणि पुढच्या वर्षी लवकर ये, आमच्या हातून काही चूक झाली असेल तर माफ कर आणि तुझं दर्शन घेणाऱ्या सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं की डबडबायचे तसे डोळे डबडबलेही.

गणपती जोरात साजरे झाले हेच खरं!

15 comments:

Anonymous said...

अगदी गणपती शिरवतानाही डोळे डबडबणारी आजची पिढी रडकी कशी काय झाली? 'आमच्या' काळी (म्हणजे १८५७ इतक्या मागे नाही, तर अगदी अलीकडे पर्यंत) असे नव्हते हो. घरचे, दारचे गणपती उठत, उत्सव संपे, कोणीही उगीच गहिवरत वगैरे नसे. मराठी ब्लॉगविश्वावर वाहिल्या जाणार्‍या अश्रूंचा कोरड्या जमिनीला पुरवठा केला तर महाराष्ट्रातला दुष्काळाचा प्रश्न सहज सुटेल. पण ते असो.

एका आलतूफालतू विषयावर तुम्ही छान वाचनीय मजकूर लिहिला खरा.

Rohini said...

Hi,

Mazya ghari hi ganpati basto..ani ganpati uthato tevha man ghaivarta nakki....loved your post..yaa varshi me hi ghari nahi ganpatila, pahilyaandach swata ukdiche modak banvaycha prayatna hi kela :)

So ur post touched a chord :D

And read that anonymous comment on ur blog...I just wish ppl can keep their sarcasm with themselves when they comment....couldn't help reacting...

I guess too much of uninvited intrusion from my end ;)

Take Care,
Rohini

Dk said...

hey aata officat aahe jara ghait udya niwat vaachun commentTO :)

भानस said...

संवादिनी,भावली गं पोस्ट. मनाने मीही आईकडेच आहे. मग काय दररोज व्हिडीओ चॆटवर आरती करतेय त्यांच्याबरोबर, प्रसाद खातेय. मोदकही बनविले एकत्र-:). प्रत्यक्ष बरोबर नसलो तरी असल्यासारखे वाटले.

Anonymous said...

मनू,

खूप छान लिहिलंयस. तुझा मेल वाचून एकेक पायरी करत मराठी टाईप करता येऊ लागले आहे. आता मला तुझ्या ब्लोगवर दरवेली कमेंट देता येइल.

आपल्या घरातला एखादा मेंबर आपल्याला सोडून चालला आणि वर्षभर भेटणार नसेल तर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तुला गणपती तुझ्या घरातलाच एक वाटतो हा त्याचा अर्थ आहे.

Vidya Bhutkar said...

Just like Bhanas, I too celebrate Ganapati thru video chats and phone aarti.But at the same time, we have been celebrating it with one of our neighbours for last 4 years. I just realised that maybe if I am not here next year, I'll miss the neighbours and their Ganapati too.
At times, we do miss the home, but one doesnt realise he/she is making the new memories at the same time. :-) So enjoy what you have with you too.
-Vidya.

Anonymous said...

'संवादिनी' बाई: तुम्ही फारच छान लिहिता. मी इतक्यातच तुमचं लेखन वाचतो आहे, आणि आश्चर्य वाटतंय की मला आधी हे सदर कसं दिसलं नाही.

ताज्या लेखाविषयी एक नोंद: "सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत असं निःस्वार्थी गाऱ्हाणं बाबाने देवाला घातलं ..." -- आता 'इच्छा पूर्ण होवोत', हे एक स्वार्थी मागणं आहे. त्याला 'gaaRhaaN.n' म्हणण्याची परंपरा आहे खरी, पण 'निःस्वार्थी'? (जसा गोंधळाचा भक्ती-प्रकार आहे, तसाच बहुतेक गार्‍हाण्याचा असावा.) म्हणजे नुसतंच देवाला माझं थोबाड दाखवून एखादा भोळा सांब माझ्या इच्छा पूर्ण करत असेल तर माझी हरकत नाही. पण हा सगळा प्रकार बहुतांशी स्वार्थी आहे.

तुमचे बरेच जुने लेख वाचले. 'मला इतपतच येतं' हा तुमचा कायम सूर. तसं करू नका. तुम्ही अत्यंत फालतू विषयांवर लिहिता. स्वतःला कमी लेखू नका. तोडीतल्या अति-कोमल गांधाराचा प्रयत्न केलात तसा लिखाणाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करा. यश हाती लागू शकेल.

तुम्ही सध्या कुठे आहात, याचा उल्लेख का टाळता? काही कळत नाही. मुंबई, पुणे, आखात यांचा उल्लेख येतो. पण 'इकडची स्वारी' प्रमाणे 'मी सध्या इथे आहे' मधला 'इथे' म्हणजे कुणीकडची स्वारी आहे, अशी शंका येते. जुन्या ठिकाणांची नावनिशीवार यादी आहे. सध्याबद्दल गडीगूपचूप. अमेरिकन स्त्रिया सध्याच्या नवर्‍यापेक्षा एक्स-हजबंडस्‌ विषयी जास्त बोलतात, त्याची उगीच आठवण आली. हे गंमत म्हणून बरं का! राग मानू नका.

'बाईची जात' शब्द का वापरतात, हा तुमचा प्रश्न. 'माणसासारखा माणूस' हे पुरुषांनाच का ऐकावं लागतं, हे सांगा. बायकांसाठी संसदेपासून बस-आगगाडी पर्यंत राखीव जागा असतात; जहाज बुडताना पहिले बायकामुलांना जाऊ देतात. या सगळ्यासाठी बरीचशी समर्थनीय कारणं आहेत. पण ते एक असो. 'पुरुषाची जात' नावाचा एक चित्रपट होता. तेव्हा तो शब्दही कमी प्रमाणात का होईना पण वापरात आहे.

उत्तम वाचनाचा लाभ ओंजळीत घातल्याबद्दल मी आपला आभारी आहे.

सखी said...

खूप दिवसांनी कमेन्ट पोस्टतेय गं,मेल, आय डी असं जे काही चालंलंय त्यातून डायरेक्ट सुटका म्हणून. ;)
I hope तुला कळलं असेलच कोण ते!
मोदक करण्याच्या प्रक्रियेवरुन बर्‍याच गोष्टी आठवल्या बघ.

संवादिनी said...

@ ऍनॉनिमस १ - काका, वाचनीय मजकूर होता एवढं लिहिलंत ना? भरून पावले. तुमच्या कमेंट्वरून तुम्ही साधारण माझ्या बाबाच्याच वयाचे असाल असं वाटतं. पण मी त्यालाही भावूक होताना पाहिलं आहे. रडायचा मक्ता स्त्रीजातीकडे असल्याने तो रडत वगैरे नसे पण नक्कीच थोडा भावूक होत असे. मला वाटतं, गणपतीसाठी केलेली तयारी, लोकांचं घरी येणं, उत्सव साजरा करणं, ह्या गोष्टीच मनावर एक हवं हवंसं वाटणारं गारुड घालतात. हा आनंद जीवनात गणपती घरी आल्याने येतो. म्हणूनंच बहुतेक गणपती जाताना थोडं वाईट वाटत असावं. बाकी दुष्काळ आणि ब्लॉगीय अश्रूंचा सुकाळ ह्या बाबतीत पूर्ण सहमत.

@ रोहिणी - मला वाटतं घरापासून दूर राहणाऱ्या, शिक्षणाच्या, कामाच्या निमित्ताने, गणपतीच्या दिवसात घराची आठवण येऊन गेल्याशिवाय राहतंच नसेल. ऍनॉनिमस काकांची कमेंट एवढी मनावर नको घेऊ. त्यांच्या दृष्टीकोनातून कदाचित ते म्हणतात ते बरोबरही असेल. शेवटी प्रत्येक माणूस वेगळाच नाही का?

@ दीप - कल करे सो आज कर आज करे सो अब, असं कबीरानं उगीच नाही म्हटलंय !

@ भानस - हो विडिओ चॅट चा उपयोग आम्ही पण केला! फक्त टाईम डिफरन्स मुळे सकाळची आरती मिळाली. संध्याकाळची हुकली.

@ बाबा - ग्रेट. आता दर पोस्टाला तुझी कमेंट हवी बरं का? नाही आवडलं तरी कमेंट हवीच!

@ विद्या - तू म्हणतेस ते एकदंम योग्य आहे. मला ह्या ठिकाणी येताना, म्हणजे गेला मुक्काम हलवतानाही खूप वाईट वाटलं होतं. नकळत आपले ऋणानुबंध जुळत जातात प्रत्येक ठिकाणाशी. आपल्याला पत्ता देखील लागत नाही. पंढरा शहरं फिरल्यावर बहुतेक प्रत्येक दिवशी आठवण काढून वाईट वाटून घेणार मी बहुतेक

@ सखी - पक्कं कळलं. थँक्स

@ ऍनॉनिमस २ - तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मी तुमची आभारी आहे.

पहिलं गाऱ्हाण्याविषयी, गाऱ्हाणं घालताना मंडळी, माझी ही इच्छा पूर्ण कर. माझ्या मुलाला मार्क मिळूदेत, अमुक तमुक अशी घालतात. माझा बाबा मात्र तुझं दर्शन घेतलेल्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर असं घालतो. म्हणून मला ते निःस्वार्थी वाटतं. अर्थात तांत्रिकदृष्ट्या त्यात आम्ही सर्वही आलोच सो थोडा स्वार्थही आहेच त्यात!!

मला इतपतंच येतं ही अतिषयोक्ती नाहीये. मला खरंच काल्पनिक लिहिता येत नाही. मी अनेकदा प्रयत्न केला. पण घडलेली गोष्ट लिहिताना वेळ कमी लागतो, विचार कमी करावा लागतो आणि एकंदरीतंच स्क्रीप्ट डोळ्यासमोर असल्याने नुसतं उतरून काढायचं असतं. लिखाण हा माझा प्रांत आहे असं मला मनापासून वाटत नाही. गाण्यामध्ये किंवा अगदी नाटकातही मी प्रगोय करून बघायला माहे पुढे पाहत नाही. पण लिखाणात मला तसा वाव अहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळे कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी नाही केला असं नाही म्हणणार, पण फसला इतकं मात्र नक्की. पण तुम्हाला असं वाटलं की माझ्यात अजून क्षमता आहे, ह्याने खूप आनंद वाटला.

मी सध्या कुठे आहे, ते माझ्या संपर्कातल्या जवळ जवळ सर्व व्यक्तींना माहितेय. त्यामुळे इथे म्हटलं की त्यांना कळतं. पण सुरुवातीला असं नव्हतं. आणि नवीन ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यावर आपण बिनचूक कुठे आहोत काय करतो की माहिती ब्लॉगसारख्या सार्वजनिक माघ्यमात जाहीर करण्यातले धोके माहीत नव्हते.

बाईची जात वरील आपल्या मताशी सहमत आहे. प्रत्येकालाच आपल्यावर अन्याय होतो असं वाटत असतं. त्यातलीच मीही एक.

बाकी इतकी मोठी कमेंट लिहून माझ्या लेखनाबद्दल मला कळवल्याबद्दल. मी पुन्हा एकदा आपली आभारी आहे. निखळ लिखाण म्हणून माझ्या ब्लॉगकडे बघून त्यावर विचारही केल्याबद्धल खूप खूप आभारी आहे.

Anonymous said...

संवादिनी बाई: आपण माझ्या आधीच्या दोन नोंदींवर विस्ताराने प्रतिक्रिया दिलीत; त्यावर बरंच लिहू शकेन. पण सध्या काही दिवस निनावीच टिंगलटवाळी करण्याचा बेत असल्यामुळे त्यातल्या काही गोष्टी आत्ताच बोलत नाही. तरीही ही नोंद भरकटत जाणार अशी भीती वाटते आहे.

मी तुमच्या वडिलांच्या वयाचा नसलो तरी तुमच्यापेक्षा बराच मोठा आहे. आपल्यापुढली पिढी वाया गेलेली, रीत नसलेली, इत्यादि आहे, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तरीही इतक्यात झालेले बदल, ज्यातले बहुतांश अनिष्ट आहेत, ते आश्चर्यकारक आहेत. माझ्या एका मित्राला त्याच्या भावानी १९९० सुमारास 'मला एक शर्ट आणणे, जितका जास्त विचित्र तितकी मजा जास्त' असं पत्र पाठवलं होतं. माझा असा दावा आहे की १९८० साली, किंवा १९८५ सालीही, हे पत्र पाठवण्याची हिंमत फार कमी लोकांनी केली असती. ती संख्या प्रतिपच्चंद्रलेखेव वाढतेच आहे. असे कपडे घालून हा असामी स्वतःच्या आदर्श वर्तनाच्या बापासमोर कसा राहणार, याची मलाच चिंता होती. त्याच्या ते गावीही नव्हतं. त्याबरोबरच ही पिढी (हे दुसरं अनपेक्षित टोक) क्षुल्लक गोष्टींवर गहिवर काढण्यातही पुढे आहे. २५-३० वर्षांपूर्वी आमच्या वस्तीतल्या एरवी रडक्या मुलीही गणपती शिरवताना गहिवरत नसत. आणि मुलानी तर या प्रकारचा बावळटपणा केल्यास माझा एक मित्र, 'He needs to undergo sex-change surgery' असा शेरा मारत असे. आता त्या गहिवरण्याला प्रतिष्ठा मिळाली आहे, ज्याच्यामुळे एके काळी न येणारा गहिवर येतोही आणि आल्यावर तो आवरल्याही जात नाही. अपवादात्मक ही गोष्ट घडती तर ते मी समजू शकलो असतो. अजून एक बदल म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जे जमत नाही ते जाहीरपणे करू नये असा प्रत्येकानी मानलेला अलिखित दंडक होता, कारण वरच्या पिढीचा धाक. आजमितीला माझे मित्रही तो आधी मानलेला दंडक पाळत नाहीत, कारण तुमच्या पिढीनी त्यांनाही बिघडवलं. माझ्या एका मित्राला 'तू शास्त्रीय संगीतावर लिही' असा मी बराच आग्रह केला. पण तो आपला संकोच मोडू शकला नाही. याउलट पुढल्या पिढीतले काही 'कलाकार' असे की 'हा मूर्खपणा तू करायलाच हवा का' विचारायची इच्छा होते. कोणीही काही दीडदमडीचा प्रकार करायचा आणि इतरांनी 'वा, वा', 'कमाल आहे', 'भावलं' (आजकाल नुसतं 'आवडून' भागत नाही) अशी तोंडफाट स्तुती करायची, हा प्रकार बोकाळला. सध्याचे मराठी-हिंदी-इंग्रजीतले अनेक गचाळ ब्लॉग्ज आणि त्यांच्यावरली परस्परस्तुतीची चुंबाचुंबी, सुमार विनोद, लेखनाचे सुमार विषय, अडखळती भाषा, दोन गद्य शब्द न लिहिता येणार्‍यांच्या लांबलचक कविता या गोष्टी याला साक्ष आहेत. याउलट माझा एक मित्र चांगलं वाचलं तर मुद्‌दामच त्यात दोष काढून त्रास देतो. अशा या खत्रुड वाचकांमुळे आपण आपलं लेखन जास्त काटेकोरपणे पहिले स्वतः वाचून मगच लोकांपुढे ठेवण्याची सवय वाढते, असा त्या करमजनगिरीचा फायदा आहे.

तुमची भाषा प्रवाही आहे, मन संवेदनाशील आहे, दर्जेदार लेखनकार्याला आवश्यक असलेली नज़र तुम्हाला आहे. पण लेखनविषयांत दम नाही. जे रोजच्या आयुष्यात येणारे, ऑफीसात चहा पिताना बोलायला बरे ठरतील असे, अनुभव हा जाहीर लेखनाचा विषय होऊ शकतो, हेच मला मान्य नाही. पुरुषांतले ब्लॉगर्सही यांत मागे नाहीत. पण बायकांमधे या रोगाची फारच लागण आहे. म्हणजे नक्की काय करायला हवं हे मी विशेष सांगू शकणार नाही. लेखणी म्यान करणं हा तर अजिबात उपाय नाही. कारण गळा जसा गाता ठेवायला हवा, तसा हातही लिहिता हवा. पण सध्याच्या लेखनाच्या (अ)व्याप्तीविषयी मी तुमच्या मनात असमाधान निर्माण करू शकलो तर विषयांचा संकुचितपणा कमी करण्याची ती पहिली पायरी बनू शकते.

जेव्हा लिहिणार्‍या स्त्रिया कमी होत्या तेव्हा आघाडीच्या लेखिका, भले त्या मोजक्याच असतील, भव्य ध्येय वगैरे बाळगून मोठा पराक्रम करत्या झाल्या. यात आश्चर्य नाही. कारण प्रबळ प्रेरणा असल्याशिवाय तेव्हा बायकांना लेखन करण्याच्या मार्गातले अडथळे दूर करताच आले नसते. आता परिस्थिती उलट आहे. लिहिणार्‍या बायकांना पहिले सेन्सॉर बोर्डाची मान्यता घ्यायला लावली पाहिजे असा विचार येत राहतो. म्हणजे माझा एक-सदस्यीय बोर्ड, अर्थातच.

रटाळ शैली वा मजकूर हा संशोधनक्षेत्रात क्षम्य ठरू शकतो, पण तो इथे विषय नाहीच. आता मुळात ज्याच्यात लेखनगुण आहेत तो लेखक कशावरही चांगला लिहू शकतो हे खरं आहे. पण कुठले विषय निवडले याच्याशीही लिखाणाच्या दर्जाचा संबंध असतोच असतो. म्हणून हाताळलेले विषय कुठले हा माझ्या लेखी महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल काय हा ताप ('प्रसंग नसता लिहिले'), माझ्याच स्तंभाचा फायदा घेउन हा माणूस स्वतःच अनावर बडबड करत सुटलाय. आणि 'प्रतिक्रिया' शब्दाला न शोभणारी ही लांबलचक नोंद झाली खरी. तेव्हा क्षमा केली पाहिजे.

Anonymous said...

आधीच्या एका वाक्यावर स्पष्टीकरण: अजून एक बदल म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जे जमत नाही ते जाहीरपणे करू नये असा प्रत्येकानी मानलेला अलिखित दंडक होता, कारण वरच्या पिढीचा धाक.

हे ज़रा अतिरंजित चित्र आहे. आपण कलाकार आहोत असा गोड गैरसमज असलेली मंडळी आधीही होती. रामदासांच्या वेळेला कविता गवताऐसी उदंड वाढली होती. १९१० सुमारास गडकर्‍यांनी तत्कालीन भंकस कवितेवर टीका केली होती. पण त्या वैतागात 'आठवते ... बालकवींची रसवंती -- धीर ज़रा वाटे चित्ती' असा दिलासाही होता. आज जो कोडगेपणा दिसतो आहे त्याची चाहूल ठळकपणे लागली नव्हती, आणि ही घसरण थांबण्याची सध्या तरी लक्षणं दिसत नाहीत.

manish said...

ऍनॉनिमस, तुमचं म्हणणं इन प्रिन्सिपल पटतंय, पण ह्या ब्लॉगच्या संदर्भात बोलायचं तर एक उदाहरण देतो. मुग्धा वैशंपायन ने सारेगमप मधे लावणीगीत, भक्तीगीत, भावगीत, विरहगीत काहीही जरी गायलं तरी ते फ़क्त मुग्धागीत व्हायचं. त्यातही आपला एक वेगळा गोडवा असायचा, पण लावणी/भक्ती/भाव/विरह वुड गेट रिप्लेस्ड बाय मुग्धा.

ह्या ब्लॉगचंही तसंच आहे. संवादिनी ने दलितांचे प्रश्न, महिलांचे हक्क, बालकांचे शोषण, आर्थिक विषमता असे जड विषय जरी हाताळले, तरी तुमचं समाधान होऊ शकणार नाही. शेवटी ते लेखही ’टिपिकल संवादिनी’ वाटतील.

तेव्हा आहे ते तसंच राहू द्या. मिथुन जसा गरिबांचा अमिताभ होता, तशी संवादिनी मराठी ब्लॉगर्स ची वपु आहे. वपु काय किंवा कणेकर काय त्यांना जे चांगलं जमतं तेच फ़क्त लिहीत राहिले. तसं करणं योग्य होतं की नाही हा पुन्हा वादाचा विषय.

आणि ह्या ब्लॉगची जुनी पाने चाळून पहा. जेव्हा ऍनॉनिमस नी ढिगानी निषेधाच्या कमेंट टाकल्या तेव्हा त्या त्या पोस्ट्स ना तुफ़ान वाचकवर्ग मिळाला. तेव्हा जर हा ब्लॉग आवडत नसेल तर दुर्लक्ष करून ह्यावर कमेंट न टाकणंच योग्य.

आता माझ्या ह्या प्रतिक्रियेवर तुम्ही रागराग करू शकता, किंवा बारकाईने वाचून मी ही तुमच्याच विचारसरणीचा आहे हे समजून घेऊ शकता.

Anonymous said...

मनिषराव: संवादिनीबाई जे काही लिहितात त्यात वाचनीयता हा गुण हमखास असतोच याचा मी आवर्जून उल्लेख केला असताना 'हा ब्लॉग आवडत नसेल तर' चा प्रश्नच कुठे येतो? आणि माफ करा किंवा रागराग करा, पण तुमच्या चार ओळींत काही बारकाईनी वाचण्यासारखं आहे असं मला वाटत नाही.

या ब्लॉगची बरीच जुनी पानं मी चाळली आहेत, पण एक/अनेक एनॉनिमसनी ढीगभर निषेधात्मक प्रतिक्रिया नोंदवल्याचं उदाहरण पाहण्यात नाही. ते मूळ लेख कुठले (शीर्षक, लेखनकाल वगैरे) हे सांगू शकाल का? 'तुफान वाचकवर्ग' मिळण्याचं मला सुखदुःख काहीच नाही.

संवादिनी: तुमचे विषय नेहमीच हलके असतात अशी टीका करुनही हलक्या विषयांचं मला वावडं नाही, काल्पनिक लिखाणाचा विषय माझ्या डोक्यात आला नाही (पण तसा तुमचा समज झाला याचं आश्चर्यही नाही), आणि बालक-दलित-महिला-गरीब हे विषय तर मला अजिबात अभिप्रेत नव्हते. तुम्हाला याहीपेक्षा सकस लिहिता येईल, इतकाच माझा अर्थ होता. आणि ते तुम्हाला कळलंय. या अनुषंगानी पुढे आपल्यात चर्चा व्हायचीच असेल तर त्यासाठी अ‍ॅम्पल वेळ आहे. तेव्हा सध्या इतकंच पुरे.

संवादिनी said...

@ ऍनॉनिमस काका आणि मनीष - माझ्या ब्लॉगबद्दल तुम्ही केलेल्या विचाराबद्दल आभारी आहे. हे खरं आहे की पुर्वी निषेद्धाच्या कमेंट आल्या होत्या. त्यात माझीही तेवढीच चूक होती हेही मी मान्य करते. पण बहुतेक ते दिवस पाठी सरले आहेत. नव्या दमाने नवी सुरुवात केल्यावर पुर्वीइतकं प्रेम मिळत नसलं तरी द्वेषही मिळत नाहीये ही माझ्यासाठी जमेची बाजू आहे. आपण आपला हा संवाद (वादविवाद नव्हे) असाच चालू ठेऊया, माझा इ-मेल samvaadini@gmail.com आहे. तुम्हाला जर सोयिस्कर वाटत असेल तर आपली चर्चा आपण तिथे चालू ठेऊ.

Dk said...

wawa jordaar vadavadee chalu aahe aani te hi dusrichya eka khaajgee blogvar? tehi swatach naav lapvat hmmm... पण लेखनविषयांत दम नाही>> phukt vaachaayla milty aani var लेखनविषयांत दम naahi to aanaa wa great!! are dusraayane kaay kase lihaav he he aapn thrvnaar ka?

***
BTW tuzya mul postpekshaa jaast shbd prtikriyet kharch padlyet :P


रडायचा मक्ता स्त्रीजातीकडे असल्याने>> as kahi kharch aste ka? kunee purus radt naahi? radu shkt naahi coz EGO!! aani ithe var hi comment lihitaana EGOCH jaanvtoy swtach naav hi n deta...

sam :)))))